September 8, 2024
An Important Political Novel in Marathi Chimboreyudh
Home » मराठीतील महत्त्वपूर्ण राजकीय कादंबरी : चिंबोरेयुद्ध
सत्ता संघर्ष

मराठीतील महत्त्वपूर्ण राजकीय कादंबरी : चिंबोरेयुद्ध

चिंबोरे म्हणजे खेकडे त्यांच्या जीवनातील सद्य:स्थितीतील कलह- संघर्ष त्यांचे सामाजिक -सांस्कृतिक व्यापार राजकारणातील गट- तट आणि अस्तित्वाची लढाई याचे दर्शन चिंबोरी दर्शन “चिंबोरेयुद्ध” या कादंबरीत घडते. एक प्रकारे आपल्या सभोवताली जे घडते तेच प्रतिकात्मक किंवा रूपकात्मक पद्धतीने चिंबोऱ्यांच्या जीवनात घडते. आजच्या गतिमान जीवनात नव्या तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब, यासारखी माध्यमे आपला आपला संवाद इतरापर्यंत पोहोचविण्यात अग्रेसर बनली आहेत. आपली छायाचित्रे, क्लिप्स, ही संवाद साधने बनली आहेत. मात्र त्यातून इतरांची फसवणूक आर्थिक ,चुकीच्या गोष्टींचा प्रसार यासारखे घातक परिणाम दृष्टीस येतात. डिजिटल युगातील विकृतीही अजून मधून समोर येतात.

या कादंबरीतील कँली आणि कँलीसिटी याच गोष्टीची साक्ष देते. एकूणच आपल्या सभोवताली ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याची अवस्था चिंबोऱ्याच्या रूपात लेखकाने मांडले आहे. किंबहुना खेकडे हेच आपल्या विविध स्वरूपातील रूपकाच्या रूपात आपल्याला संदेश सांगण्याचा प्रयत्न करतात. युती आघाडीचे राजकारण नवीन नाही. यातून एकमेकांच्या साथीने सत्तेत येणे. आपला पक्ष वाढवणे. प्रसंगी दुसऱ्या मित्र पक्षाला दगा देऊन संपवले हे आपण पाहत आहोत. त्या संदर्भात या कादंबरीत जो उल्लेख येतो तो लक्षणीय आहे.

सध्याच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, घडामोडीचे काल्पनिक चित्र वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या कादंबरीतून लेखकाने केला आहे. “चिंबोरेयुद्ध” या नावात खेकड्यांनी एकमेकांचे पाय ओढण्याचे जे वैशिष्ट्य आहे हे या कादंबरीत अधोरेखित झाले आहे. या अर्थाने खऱ्या अर्थाने ही कादंबरी नाही. की याला फारसे सलग कथानकही नाही. पण आजकाल प्रत्येकाच्या मनात धोकावणारे असंख्य प्रश्न आणि त्या प्रश्नांचा गुणकार यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.सामान्य लोकांचे प्रश्न यातून पुढे येतात. जातीय, धार्मिकतेढ श्रेष्ठ- कनिष्ठ असे वाद, कनिष्ठ जातीला तुच्छ लेखनाची प्रवृत्ती आणि समाजाची ढोंगी प्रवृत्ती लेखकांनी मांडली आहे.

स्वाभाविकच सध्याच्या जीवनाचे वास्तव चित्र यातून साकारले आहे. सध्याचा जमाना ऑनलाईन आणि डिजिटलचा आहे. स्वाभाविकच त्याची प्रतिबिंब या पुस्तकात पडले आहे. ऑनलाइन सेल डिस्काउंटच्या फसव्या जाहिराती त्यातून सर्वसामान्यांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न याची चित्र कादंबरीत पडले आहे. यातील एक मोर्चा ज्या घोषणा देतो त्या लक्षवेधी आहेत.
,” सगळे कसं जोमात आहे
कोमात आहे
असे कसे देव
आहे मंदिरा बाहेर
यायचे बाहेर जोमात
आणि जोमात कशासाठी
कशासाठी सत्तेच्या खुर्चीसाठी”

चिंबोरे युद्धातील 19 व्या प्रकरणात कवच्या कंकाळ यांनी पक्षाची भूमिका मूळ धार्मिक भूमिकेपेक्षा दूर गेली असं कारण देऊ पक्षातील 55 आमदारांपैकी 40 आमदारांसोबत बंड केले. चिंबोरी विकास आघाडी सरकार कोसळले. कवच्याने खलणचिंबोरा यांना सर्वांना सोबत घेऊन चिलापी पक्षाची युती केली आणि चिंबोरवाडी युतीचे सरकार स्थापन केले व नवे मुख्यमंत्री म्हणून कवच्याने शपथ घेतली. या प्रकरणात मूळ शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गट हा भाजपसोबत सरकार स्थापन केल्याचा संदर्भ स्पष्टपणे जाणवतो. सगळे संदर्भ महाराष्ट्रातील दोन अडीच वर्षांपूर्वीच्या सत्तांतराची आठवण करून देतात. त्याच प्रकरणात शिवसेनेतील फुटीच्या संदर्भात जी न्यायालयीन लढाई सुरू झाली त्याचाही प्रत्यय येतो. याच प्रकरणात मध्यंतरी झालेल्या मराठा आरक्षणाच्या घटनांचा ही संदर्भ येतो. पाटील हे पात्र केलेल्या आंदोलनासाठी लेखकांनी प्रतिकात्मकरीत्या मांडले आहे.

50 खोक्यांची गाजलेली चर्चा याचाही संदर्भ या कादंबरीत येतो. एकूणच महाराष्ट्रातील सत्ता नाट्याची चित्र चिंबोरवाडीतील प्रतीकात्मकरित्या या लेखकांनी मांडले आहेत. खलणवीस, आबा, बाबा, राष्ट्रीय काका, आंग्रेस हे शब्द वापरून महाराष्ट्रातील राजकारण यात उलगडून दाखवले आहे. शिवसैनिक झालेल्या फुटीच्या बाबत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीचे संदर्भही चिंबोरा वीस मध्ये येतात हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे वर्ग करण्याचा अधिकार सरन्यायाधीश चिंबोरे डी वाय चंद्रचूर देतात. विधानसभा अध्यक्षांचे अधिकार कायम ठेवत विधिमंडळाच्या अधिकारात हस्तक्षेप करता येणार नाही हा त्या न्यायालयाने दिलेला निकाल याचा उल्लेख यात येतो. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या फुटीचे प्रकरण देखील प्रतिकात्मक रूपाने भाष्य केले आहे.

यात चिंबोरीमँन म्हणतो ,”राजकारण म्हणजे राजकारण घडत राहा घडवत रहा. कारण नाही नुसता कारण हा त्याला तो त्याला सारखा गंडवत असतो. नाही तरी राजकारणात कोण कोणाचा असतो.” यापेक्षा राजकारणावर कोणते मार्मिक भाष्य असू शकेल .”चिंबोरेयुद्ध” ही एक अभिनव प्रकारची किंवा जिला अ कादंबरी म्हणता येईल. ज्यात साहित्याचे सारे सिद्धांत वाद बाजूला सारून लेखन केले आहे अशी ही कादंबरी आहे.

या कादंबरीचे लेखक बाळासाहेब लबडे यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांची 16 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यात काव्य प्रतिभा पुरस्कार, नाशिकचा कुसुमाग्रज राज्यस्तरीय पुरस्कार आदींचा समावेश आहे .चित्रपटासाठी त्यांनी गाणीही लिहिली आहेत. चिंबोरेयुद्धमध्ये आबा बाबा, कवच्याकंकाळ, चिलापी, हातोडा चिंबोरा, ही सगळी पात्रे आजच्या राजकारणातील समकालीन पात्र आहेत. यात आजच्या राजकीय नाट्याचे प्रतिबिंब उमटले आहे. ते प्रभावी, लालीत्यपूर्ण, चिकित्सक, अन्वयार्थपणे आले आहे. त्यामुळे ही कादंबरी मराठीतील महत्त्वपूर्ण राजकीय कादंबरी आहे.

रामदास नेहुलकर
सहसंपादक, दैनिक केसरी.

पुस्तकाचे नाव – चिंबोरेयुद्ध
लेखक – बाळासाहेब लबडे
प्रकाशक – अथर्व पब्लिकेशन्स
किंमत – ४५० रुपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

भरडधान्य पिकांना भविष्यात मोठी मागणी

आषाढी वारी…

महात्मा फुले कृषी विद्यापीठात कृषी पदवीधर रोजगार मेळाव्याचे आयोजन

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading