लेखकाची जिद्द, चिकाटी व त्यांनी कष्टातून मिळवलेले यश आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. आत्मकथनाची भाषाशैली साधी सोपी असून वाचकांना खिळवून ठेवणारी आहे. डॉ. सुनीलकुमार लवटे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आणि पाठराखण लाभली आहे. निर्मिती प्रकाशन कोल्हापूर यांनी दर्जेदार पुस्तक निर्मिती केली आहे.एकंदरीत पुस्तक वाचनीय आणि नव्या पिढीला प्रेरणादायी झाले आहे.
प्रा.भास्कर बंगाळे,
पंढरपूर, मो. 9850377481
आत्मकथनांनी मराठी साहित्यामध्ये अत्यंत मोलाची भर घातली असून वाचकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्याचे दिसून येते. सुरुवातीच्या आत्मकथनांनी विशिष्ट जातीचे व समाजाचे प्रतिनिधित्व करत त्यापूर्वी साहित्यातून न आलेले भयान वास्तव समोर आणले आणि वाचक वर्ग आश्चर्यचकित झाला. नंतरच्या काळात लिहिल्या गेलेल्या आत्मकथनांमध्ये तोच तो पणा येत असला तरी नव्याने निर्माण होणाऱ्या वैयक्तिक आणि सामाजिक जाणीवांची त्यात भर पडत आलेली आहे. नाही तर प्रत्येकाचे जीवन हे एक स्वतंत्र कथानक असतेच. त्या दृष्टीने डॉ. खंडेराव शिंदे यांनी त्यांच्या बालपणापासून ते प्राध्यापक होईतोपर्यंतची संघर्षमय कहानी ‘पकाल्या’ या आत्मकथनातून तपशीलवार कथन केली आहे.
प्राथमिक शाळेत फारसा हुशार नसलेल्या, सामान्य बुद्धिमत्तेच्या खंडूला मोरे गुरुजी ‘पकाल्या’ म्हणायचे. तोच ‘पकाल्या’ वाटेल त्या प्रकारची अंग मेहनतीची कामे करून, प्रसंगी उपाशी राहून कॉलेजमध्ये ‘प्राध्यापक’ होतो. त्यांची संघर्ष गाथा वाचनीय तर झालेली आहेच शिवाय आजच्या पिढीला प्रेरणादायीही झालेली आहे. कुठल्या पदावर तुम्ही पोचलात यापेक्षा कोणते अडथळे पार करून तुम्ही यश गाठलेत यावर यशाचे मोजमाप झाले पाहिजे.
खंडेराव शिंदे हे चांभार समाजाचे. सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यात तुळशी हे त्यांचं छोटसं गाव. आई-वडील अशिक्षित. कधी गावीच तर कधी अकलूज,माळशिरस, वेळापूर या परिसरात कामाच्या शोधात, दुसऱ्याच्या शेतात काबाडकष्ट करून उपजीविका करणारं आणि जागा मिळेल तिथं झोपडी करून राहणारं कुटुंब!नाना आणि आय यांच्या फाटक्या संसारात खंडेरावला जे भोगावं लागलं तेही या आत्मकथनात सविस्तर आलेले आहे.
साधी साधी कामे करून मोठे झालेल्यांची अनेक उदाहरणे आहेत. कोण म्हणतो मी वर्तमान पत्रे टाकली, कोण म्हणतो मी चहा विकायचो, कोण म्हणतो मी रात्री रस्त्याकडेच्या दिव्याखाली अभ्यास केला… इत्यादी… पण खंडेराव यांना बालपणापासून कोणती कष्टाची कामे करावी लागली आणि कोणत्या संकटांना तोंड द्यावे लागले हे वाचून वाचकाला धक्काच बसतो. शालेय जीवनात खुरपण, शेंगा काढणे, कुळवावर बसणे, पिकाला पाणी पाजणे, ज्वारी गहू काढणे, खुडणी, मळणी… अशी कितीतरी कामे….आणि खायला साधी भाजी भाकरीही पोटभर नसायची. आंब्याच्या साली खाल्ल्या… कुया भाजून खाल्ल्या…
लेखक लिहितो, “सातवीला असताना पहिल्यांदा पुरी भाजी खाल्ली… तीही मित्राने खाऊ घातली.” वडा माहित नव्हता… त्यांना तो मोठा भजा वाटला, कामाला गेल्यावर दुपारी पातर, गवार, शेंगा तोंडी लावल्या…’अर्ध्या भाकरीवर माझी भूक भागायची नाही, तेव्हा पाणी जास्त पिऊन दिवस काढायचो’… हॉटेलात काम केले…ओढ्याला दुधाचे पातेलं घासताना साय खरवडून खाल्ली…. अंगाला अंगभर कपडे मिळाली नाहीत, शाळा शिकत असताना मला एकापेक्षा जास्त ड्रेस कधीच मिळाले नाहीत… दिवाळीला पहिल्यांदा नवीन ड्रेस घेतला…शाळेला चालत जायचे… परीक्षेला जाताना अंथरून, पांघरून, टॉवेल नव्हता…कधी पायात चप्पल नव्हती… दिवाळीला फटाकड्या नव्हत्या… नाना आजारी असताना औषधे व दवाखान्याला पैसे नव्हते इत्यादी…. यापेक्षा गरिबीची श्रीमंती अधिक काय हवी ? कसातरी लेखक दहावी पास झाला. पुढे काय?
लेखक ज्युनियर कॉलेज व सीनियर कॉलेजमध्ये गेला. माणसाच्या प्रगतीमध्ये चांगले मित्र आणि चांगले शिक्षक लाभणे भाग्याचे असते. लेखकाला दत्ता हिवराळे, केशव असे जिवलग मित्र आणि राजेंद्र दास सर, रणनवरे सर, माने सर, घोगरे सर असे शिक्षक भेटले. राष्ट्रीय समाजसेवा शिबिरांनी त्यांच्या जीवनाला दिशा मिळाली. तरी शारीरिक कष्टांनी त्यांची पाठ सोडली नाही. गवंड्याच्या हाताखाली बिगारी, गुऱ्हाळात चोचऱ्या वाहणे, विहिरीवर काम करणे, पाव विकणे, खत उपसणे, बाग खंदने, धनुरा काढणे, पाण्याचा दंड तासणे, ब्रास काढणे, ऊसातली कामे….करावी लागली. ब्रास काढणे आणि ऊसातली कष्टाची कामे करताना आतडी कशी गळ्याला येतात आणि अंगाची कशी लाहीलाही होते हे ज्यांनी ही कामे केली आहेत त्यांना किंवा खंडेरावला विचारा ! वेळ कोणासाठी थांबत नाही. जो अशा संकटांना तोंड देत, वाटचाल करत मार्ग काढतो तोच आयुष्यात काहीतरी करून दाखवतो.
खंडेराव शिंदे इतिहास विषयात बी.ए. झाले. पुढे काय? अर्ज करूनही नोकरी मिळत नव्हती. एम.ए. करावेच लागणार होते. जवळपासच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचे चालले होते पण प्रा.रणनवरे सर या हितचिंतक प्राध्यापकाने प्रेमाची धमकी दिली, “तू एम.ए.शिवाजी विद्यापीठात करायचे. इतर ठिकाणी करणार असशील तर एम.ए. करू नको. शिक्षण बंद कर!”
पण पैशाचे काय करायचे?
दिगंबर इनामके आणि भीमराव साळुंखे या मित्रांनी प्रवेशासाठी पाचशे रुपये जमवून दिले आणि लेखकाने कोल्हापूर गाठले. इतिहास विभाग व वसतीगृहाला प्रवेश घेतला. ट्रंक, पोत्याची पट्टी आणि वाकळ घेऊन गेलेल्या खंडेरावला एका मित्राने चादर सतरंजी दिली. तेथेही मित्रांची त्यांना खूप मदत व्हायची. खर्च भागवण्यासाठी लेखकाने कोल्हापूरमध्ये कामासाठी धडपड केली. माने सरांनी मार्गदर्शन करणारे पत्र पाठवले. उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुट्टीत गावी आल्यावर कष्टाची कामे करावी लागायची. सुरज वाघमारे या मित्राने ‘बीएड करू नको, प्राध्यापकच हो!’ असा सल्ला दिला.
हाताने स्वयंपाक करून प्रसंगी मित्रांचे राहिलेले जेवण खाऊन लेखकाने धडपडून अभ्यास केला आणि 65 टक्के गुण मिळवून एम.ए. पूर्ण केले आणि राजर्षी शाहू व कला महाविद्यालय, रूकडी येथे इतिहासाचे प्राध्यापक झाले. शारीरिक कष्ट, दैन्य दारिद्र्य पळाले आणि नव्या सन्मानाचे जीवन सुरू झाले.
लेखकाची जिद्द, चिकाटी व त्यांनी कष्टातून मिळवलेले यश आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे.
तरी या आत्मकथनात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर व इतर समाज सुधारकांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त व्हायला हवी होती.
आत्मकथनाची भाषाशैली साधी सोपी असून वाचकांना खिळवून ठेवणारी आहे. डॉ. सुनीलकुमार लवटे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना आणि पाठराखण लाभली आहे. निर्मिती प्रकाशन कोल्हापूर यांनी दर्जेदार पुस्तक निर्मिती केली आहे.एकंदरीत पुस्तक वाचनीय आणि नव्या पिढीला प्रेरणादायी झाले आहे.
पुस्तकाचे नावः पकाल्या
लेखकः डॉ. खंडेराव शिंदे
प्रकाशकः निर्मिती प्रकाशन, कोल्हापूर मोबाईल – 9822472109, 9890554340
किंमतः ३५० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.