November 12, 2024
plants seeds embeded in Calendar Ashish Ghevde theme
Home » दिनदर्शिकेतून उगवतात रोपे…अनोखा उपक्रम
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

दिनदर्शिकेतून उगवतात रोपे…अनोखा उपक्रम

गेल्या चार वर्षात दिनदर्शिकेतून विविध संकल्पना मांडण्यात आल्या आहेत. पर्यावरणासंदर्भात जागृती संदेश, पाणी वाचवा, झाडे जगवा, सेंद्रिय खत, उर्जा बचत, गडकोट किल्ले संवर्धन अशा विविध संकल्पनाही यातून आशिष यांनी मांडल्या आहेत. याची छपाई सुद्धा स्क्रिन प्रिन्टिंग पद्धतीने करण्यात येते. त्यामुळे बिया खराब होण्याचा धोका नसतो. तसेच यासाठी नैसर्गिक रंगांचा वापरही केला जातो.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

जमीन तापायला लागली, उकाडा असह्य व्हायला लागला की, झाडांचे महत्त्व वाटू लागते. निश्चितच नैसर्गिक गारवा देणारे वृक्ष आपणास हवे हवेसे वाटतात. पण आपल्या गरजा जशा वाढल्या आहेत तशा या वृक्षांची छाटणी होते आहे. पर्यावरणपुरक जीवनशैलीच आपण भावीकाळात अमलात आणायला हवी तरच माणसाचे जीवन सुखकर होणार आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पर्यावरणपुरक जीवनशैली विकसित करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. नुसत्या बोलक्या चळवळी कामाच्या नाहीत तर प्रत्यक्ष अंमलबजावणी करून आदर्श निर्माण करणाऱ्या चळवळी उभ्या राहायला हव्यात. काही व्यक्ती आपापल्या परीने प्रयत्न करत असतात. अशा व्यक्तींच्या कल्पनांना प्रोत्साहनही द्यायला हवे.

पर्यावरण संवर्धन शास्त्रोक्त पद्धतीने व्हायला हवे. परदेशी वृक्षांची लागवड वाढत आहे. याचे तोटेही विचारात घ्यायला हवेत. झाडे लावा झाडे जगवा चळवळीला शास्त्रोक्त नियमांची जोड द्यायला हवी. तरच पर्यावरण संवर्धनाचा खरा उद्देश साधता येईल. कचऱ्याचे प्रदुषणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या कचऱ्याच्या पुर्नवापराचे प्रयत्न व्हायला हवेत. झाडांच्यापासून कागदाची निर्मिती होते. या कागदांचा कचराही मोठ्या प्रमाणात होत आहे. पर्यावरणाचा विचार करता या कागदांचा पूर्नवापर कसा करता येईल यावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. एकदा वापरलेला लिफाफा उलटा करून त्याचा वापर पूर्वीच्याकाळी केला जात होता. अशाने लिफाफ्याचा खर्चही वाचत होता व त्याचा पूर्नवापरही होत असे. असे दोन्ही उद्देश साध्य होत होते. कागदमुक्त काम (पेपरलेस वर्क) करण्याचा प्रयत्नही आता नव्या पिढीत केला जात आहे. पण तरीही कागदांचा कचरा हा वाढतच आहे. अशा रद्दी कागदांचा पूर्नवापर शक्य आहे. त्यापासून हॅन्डमेड पेपर ( हाताने तयार केलेला कागद) केला जातो. पर्यावरण संवर्धनासाठी असे प्रयोग आता वाढायला हवेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील कॉन्झरव्हेशन फाऊंडेशन ऑफ इंडिया या संस्थेच्यावतीने पर्यावरण संवर्धनाचे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. फाऊंडेशनच्या माध्यमातून आशिष घेवडे हे यासाठी नेहमीच तत्पर असतात. त्यांचे वडील अशोक घेवडे यांनी या फाऊंडेशनची स्थापना १९९३ साली केली आहे. त्यांच्याकडूनच आशिष यांना पर्यावरण जागृतीचे बाळकडू मिळाले. सुंदरलाल बहुगुणा यांच्या चिपको आंदोलनापासून त्यांना पर्यावरण संवर्धनाबाबत प्रेरणा मिळाली. वाढत्या रद्दी कागदांचे करायचे काय ? हा प्रश्न त्यांना नेहमी पडायचा. यातूनच त्यांना बिया असणारे कागद (सीड पेपर) तयार करण्याची कल्पना सुचली. कागदाच्या रद्दीवर प्रक्रिया करून त्यापासून नवा कागद तयार केला जातो. ही प्रक्रिया करताना त्यामध्ये झेंडू, तुळस, पालक, मिक्स फ्लॉवर, वाईल्ड फ्लॉवर, टोमॅटो, मिरची, कॉक्सकोंब अशा विविध वनस्पतींच्या बिया मिसळण्यात येतात. या कागदापासून दिनदर्शिका, लिफाफे, लेटरपॅड, व्हिजिटींग कार्ड तयार केले जातात.

गेल्या चार वर्षांपासून दि कॉन्झर्वेशन फाऊंडेशन ऑफ इंडियामार्फत पुर्नप्रक्रिया केल्या गेलेल्या कागदापासून दिनदर्शिका तयार करत आहे. ज्याच्या प्रत्येक कागद निर्मितीच्या मिश्रणामध्ये विविध वनस्पतींच्या उच्च उगवण क्षमता असणाऱ्या, जसे फुले, भाजीपाला व औषधी वनस्पतींच्या बीया समाविष्ट केलेल्या असतात. दर दोन महिन्यांसाठी एक अशी सहा पाने या दिनदर्शिकेत असून महिने संपतील त्याप्रमाणे तो कागद रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी जमिनीत रोपण करायचा. अवघ्या तीन चार दिवसातच त्यातील बिया रुजतात. या बियांना काही दिवस दैनंदिन पाणी मारल्यास त्यातील बियांपासून विविध वनस्पती उगवतात व सोबत असणार्‍या पुर्नप्रक्रिया केलेल्या कागदाचे खत बनते. अशी ही संकल्पना आहे.

गेल्या चार वर्षात दिनदर्शिकेतून विविध संकल्पना मांडण्यात आल्या आहेत. पर्यावरणासंदर्भात जागृती संदेश, पाणी वाचवा, झाडे जगवा, सेंद्रिय खत, उर्जा बचत, गडकोट किल्ले संवर्धन अशा विविध संकल्पनाही यातून आशिष यांनी मांडल्या आहेत. याची छपाई सुद्धा स्क्रिन प्रिन्टिंग पद्धतीने करण्यात येते. त्यामुळे बिया खराब होण्याचा धोका नसतो. तसेच यासाठी नैसर्गिक रंगांचा वापरही केला जातो. त्यामुळे कृत्रिम रंगांच्यामुळे होणारे प्रदुषणही टाळले जाते. वाईल्ड फ्लॉवरमध्ये विशेषता दुर्मिळ अशा वनस्पतींच्या बियांचा समावेश केला जातो. पठारावर उगवणाऱ्या या वनस्पतींच्या बिया गोळा करून त्याचे संवर्धन करण्यात येते. अशा हा पर्यावरण पुरक प्रबोधनात्मक उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading