March 28, 2024
article on Marathi TV serials woman by Sunetra Joshi
Home » किती खरे किती खोटे…
मुक्त संवाद

किती खरे किती खोटे…

बाईला देवीचा दर्जा देऊन नुसतेच मखरात बसवू नका किंवा भोगदासी समजून मनोरंजनाची वस्तू समजू नका तर माणुस म्हणुन तिला समजून घ्या आणि मान द्या.
सौ सुनेत्रा विजय जोशी

रत्नागिरी

आपण खुपदा नुसत्या भ्रमात किंवा स्वप्नात जगत असतो. आणि वास्तव वेगळेच असते. समाजात आणि प्रसारमाध्यमात पण अशीच तफावत दिसून येते. कागदावर आणि प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते. आता हेच बघा ना स्त्रियांचे जीवनातले संसारातले वास्तव वेगळेच आहे, पण आजकाल ज्या मालिका आपण दुरदर्शनवर बघतो ते बघून हसावे की रडावे हेच कळत नाही.

म्हणजे मला मान्य आहेच की काहीतरी मसाला घातल्याशिवाय भाजी सुद्धा चांगली होत नाही तर इथे तर लाखो रुपये खर्चून ते चित्रपट किंवा मालिका बनवतात तर मिर्चमसाला तर टाकणारच. पण किती असावा तर चवीपुरता. जास्त झाला तर जशी पदार्थासोबत तोंडाची चव जाते तसे होते मग. कुणी म्हणतात मनोरंजन म्हणून बघायचे आणि सोडून द्यायचे. पण किती नी काय काय सोडायचे…

बाकी राहू दे पण स्त्रियांचे चित्रण इतके भडक रंगवतात की विचारू नका. सासू सुनच बघा. ठीक आहे की या नात्यात गोडवा नसेलही. कारण आई ती आईच. पण तरीही नात्यात इतकी कडवाहट नक्कीच नसते. शिवाय आपल्याला आई आहे तशी नवर्‍याला पण आई असणारच ना. पण इतके टोकाचे भांडण दाखवतात की एकतर मुलगा आईला अजिबातच विचारत नाही किंवा मग आईचे ऐकून बायकोशी वाईट वागणार. प्रसंगी अंगावर हात उचलणार असे. आणि थोबाडीत मारणे तर सर्वच मालिकात सर्रास पाहायला मिळते की ते विचारूच नका. खरे तर प्रत्यक्षात आपण मुलांना सुद्धा मारत नाही. इतर नातेवाईकांना सोडाच. पण इथे आई मुलाच्या किंवा जाऊ जावेच्या जरा काही झाले की देते एक ठेवून.

दोन जावा या तर अगदी दुश्मन वागणार नाही असा एकमेकींचे पाण उतारा करताना रंगवतात. तसेही आजकाल एकत्र कुटुंब खुपच कमी आहेत. आणि अशा मालिका बघून मग नवीन पिढीला वाटते की बापरे नकोच एकत्र राहणे. खरेतर प्रत्यक्षात एकमेकींची इतकी मदत होत असते. तरीही आम्ही बायका ते खूप आवडीने बघतो. त्यावर बोलतो पण त्यावर विचार मात्र करत नाही. नणंदेचे नाते खूप छान असू शकते हे तर कुठे त्यांना माहितच नाही. वहिनी आली की तिला कसा त्रास द्यायचा हा विचार करुनच जणू काही त्या भावाच्या लग्नाची वाट बघत असतात की काय असे वाटते.

खरे तर ती घरात आल्यावर आपल्या आईवडीलांची काळजी घेणार कुणी आलं म्हणून ती सासरी निर्धास्त असते. शिवाय आपण माहेरी आल्यावर आपले पण लाड करते. पण नाही ? इथे कथानकात मात्र ती माहेरी येवून भांडण लावूनच जाणारी दाखवतात. आणि भरीत भर म्हणजे यावर घरातले कुणीच काही बोलत नाही. समज देणे तर सोडाच. हे तर खूपच कमी म्हणून मग दोन बहिणींचे सुध्दा इतके वाईट संबंध दाखवतात की विचारू नका. अगदी एक जण दुसरीच्या भरल्या संसारात सुध्दा विष कालवते.

अगदी लाखात एखादे उदाहरण अशा वाईट वागणाऱ्या स्त्रियांचे असेलही पण जवळपास प्रत्येक मालिकेमधे अशाच प्रकारचे थोड्याफार फरकाने असेच चित्रण दिसते. आणि मग असे नकारात्मक बघून वातावरण अजून बिघडते. उलट आजुबाजुला घडणारे सकारात्मक कथानक आणि व्यक्तीमत्व जर दाखवण्यात आले तर कदाचित थोडी आशेला जागा आहे. अजुनही वेळ गेलेली नाही. माझ्या बघण्यात ज्या काही दोनशे पाचशे स्त्रिया आल्या त्यात कुणीही असे वागत असलेली मी तरी बघितली नाही. उलट स्त्री नेहमीच सगळ्या कुटुंबाला सावरून संसार करण्याचा विचार करत असते.

बारीकसारीक त्रास सहन करूनसुद्धा.. तुम्हाला काय वाटते? खरे तर ती खूप सोशिक किंवा अन्याय सहन करणारी दाखवावी असे म्हणणे नाहीच. पण वास्तवात जशी ती काही बदल स्वतःमधे करते किंवा काही बदल घरातले तिच्या साठी करतात असे करुनच संसार हा सुरळीत चालतो असे दाखवायला काय हरकत आहे. नात्यांची हीच तर गंमत असते. थोडा राग लोभ असतोच पण तो अगदी पदार्थातील मिठाइतका.बायकांचे असे चित्रण दाखवून त्यांच्या वास्तवातील आयुष्यावर वाईट परिणाम होतो. तिची प्रतिमा समाजात मलिन होते. सगळ्याच बायका अशा नसतात. जसे काही पुरूष वाईट असतात तसेच हे.

बाईला देवीचा दर्जा देऊन नुसतेच मखरात बसवू नका किंवा भोगदासी समजून मनोरंजनाची वस्तू समजू नका तर माणुस म्हणुन तिला समजून घ्या आणि मान द्या. जाहिरात दाढीच्या रेझरची असेल तर तिथे कमी कपड्यातील बाईची काय गरज आहे ? मला वाटते यात बायका स्वतःच जोपर्यंत असे आम्ही करणार नाही म्हणत नाही तोपर्यंत हे चालतच राहणार. पण आता ती वेळ आली आहे की तिने स्वतः स्वतःला आधी मान द्यावा म्हणजे इतर आपोआप देतीलच. कितीतरी ऐतिहासिक आणि पौराणिक आधार आहे की स्त्री ही नेहमीच कर्तबगार आणि प्रेमळ अशीच आहे. अर्थात ही माझी मते आहेत. बघा पटतात का?अपवादात्मक काही असतीलही पण… त्यामुळे पडद्यावर दाखवतात नव्हे रंगवतात तशा आम्ही बायका नाही आहोत हेच इथे सांगावे वाटते. शेवटी त्यातले किती खरे किती खोटे हे सुजाण प्रेक्षक जाणतात.

Related posts

राजा अन् नवाब फुलपाखरे…

बोली भाषेच्या संवर्धनाचा जागर…

झाडीबोली भाषेत माय माऊलींच्या संस्काराचा खजिना- बंडोपंत बोढेकर

1 comment

Meenal Amit Oak August 26, 2021 at 11:50 AM

Khup chan

Reply

Leave a Comment