April 18, 2024
Know about Rufos Treepie Prakash Patil article
Home » Photos : सुरात गाणारा टकाचोर…
फोटो फिचर

Photos : सुरात गाणारा टकाचोर…

शेतातील निसर्ग नेहमीच टिपण्यासाठी आकर्षित करतो. त्यातच पक्षांचा किलबिलाट आणि झाडातून येणारा किरं आवाज छायाचित्रणाला अधिकच प्रोत्साहित करतो.

प्रकाश पाटील

राशिवडे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर
मोबाईल -8668679275

निसर्ग आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकवत असतो, अगदी रोजच ! फक्त आपण त्याकडे त्या दृष्टीने पाहायला हवे. सुट्टी असल्याने खूप दिवसांनी गावी गेलो होतो. दुपारी शेतावर फेरफटका मारला. नेहमी प्रमाणे सोबत कॅमेरा होताच. शेतातील निसर्ग नेहमीच टिपण्यासाठी आकर्षित करतो. त्यातच पक्षांचा किलबिलाट आणि झाडातून येणारा किरं आवाज छायाचित्रणाला अधिकच प्रोत्साहित करतो.

एका झाडावरून मधुर आवाज आला. जवळ जाऊन त्या झाडावर पाहीले तर एक सुंदर पक्षी दिसला. त्याचे काही फोटो घेतले. पक्षांची छायाचित्रे घेताना आवाज होता कामा नये. अन्यथा पक्षी लगेच उडून जातात. ही काळजी घेत दबक्या पावलांनीच त्याची छबी टिपत होतो. पक्षी दिसायला सुंदरच होता. त्यामुळे वेगवेगळ्या कोनातून त्याची छबी टिपण्याचे मी प्रयत्न करत होतो. उंच झाडावर असल्यामुळे पाणे आडवी येत होती. त्यातच येणारे अडथळे दुर करत मी त्याची छबी टिपली.

या पक्षाबद्दल जाणून घेण्याचा माझा मोह काही आवरला नाही. पक्षीमित्र सुहास वायंगणकर यांना या पक्ष्याची छायाचित्रे पाठवली. त्यांनी लगेचच या पक्ष्याबद्दल माहिती दिली. याचे नाव टकाचोर इंग्रजीमध्ये याला Rufos Treepie म्हणतात. Dendrocitta vagabunda असे त्याचे शास्त्रीय नाव आहे. भारतीय खंड आणि दक्षिणपूर्व आशियामध्ये तो मुख्यतः आढळतो.

टकाचोरबद्दल थोडक्यात..

टकाचोर आणि आपल्या आजूबाजूला नेहमी दिसणारा कावळा हे एकाच कुळातले. टकाचोरला पाहताना ते थोडंसं जाणवतं देखील. परंतु, कावळा हा पक्षी लोकांना फारसा काही आवडत नाही, तसं कारणही नाही आवडण्याचं. हा आधीच कोळशासारखा काळा कुळकुळीत आणि त्यावर त्याचा आवाजही कर्णकर्कश. टकाचोर मात्र या दोन्ही गोष्टींमध्ये अगदीच वेगळा आहे. दिसायला तर हे महाशय सुंदर आहेतच पण गातात सुद्धा सुरात.आकाराने टकाचोर कावळ्यापेक्षा थोडासा लहान आणि सडपातळ पक्षी आहे. नर आणि मादी बऱ्यापैकी सारखेच दिसतात. डोक्याचा आणि मानेचा रंग पूर्ण काळा, मानेपासून खाली मंद तपकिरी आणि पुन्हा शेपटी निळसर करड्या रंगाची असते. चोचीचा रंग काळा असून टोकाला ती गळासारखी अर्धवक्राकार असते. समोरच्या बाजूने पाहिल्यास शेपटीवर काळा आणि निळसर करड्या रंगाचे प्रत्येकी दोन पट्टे दिसतात. पंखांवर बाहेरच्या बाजूने काळ्या रंगाची कड आणि त्याला लागून लगेच पांढऱ्या रंगाची पट्टी असते आणि पुढे पुन्हा मग तपकिरी रंग येतो. या हटके रंगसंगतीमुळे टकाचोर अगदी उठून दिसतो. सौंदर्यामध्ये आणखी एक भर पडते ती शेपटीच्या लांबीमुळे. टकाचोरची शेपटी ही मुख्य शरीराच्या दीड पट लांब असते.

Related posts

बोधातूनच गुरू शिष्याला आत्मज्ञानी करतात

ज्यांनी जात नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत, तेच साहित्यिक भरवताहेत जातीनुसार संमेलने

शेतकऱ्यांचे नवे रुप – अॅग्रीप्रिन्युअर

Leave a Comment