September 8, 2024
Need of conservation of barren rocky or stony wasteland
Home » सडे संवर्धन काळाची गरज
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सडे संवर्धन काळाची गरज

सड्यावर येणारा एकत्रित मोठा फुलोरा हा अनेक कीटक, फुलपाखरे, पतंग आणि पक्षी यांना मधुरस पिण्यासाठी आकर्षित करतो. ह्या वनस्पतींचे परागीभवन होण्यासाठी ही मधुरसाची बक्षिसी मोठ्या प्रमाणात दिली जाते. श्रावणात उन्ह पडू लागली की अनेक प्रकारच्या मधमाश्या आणि कीटकांची रेलचेल या सड्यावर दिसू लागते.

प्रतिक मोरे

पर्यावरण अभ्यासक

दख्खनच्या विस्तीर्ण पठाराचा सह्याद्री पर्वतरांगेमुळे जिथे अंत होतो ती पश्चिम कडा आणि पश्चिमेकडील समुद्रकिनार पट्टीच्या मध्यभागी वसलेली चिंचोळी पट्टी म्हणजेच कोकण मलबार भूमी. पश्चिम महाराष्ट्रामधील उंच कडे, कातळाची पठारे, ते किनारपट्टीवरील सडे एवढी प्रचंड भौगोलिक विविधता असणारी ही भूमी सौंदर्याचं वरदान लाभलेली भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. कोकणातून उभे राहिलेले आणि घाटावर अगदी सपाटीला पसरलेले हे कातळ सडे वर्षानुवर्षे घडत असलेल्या बसाल्ट खडकाच्या भौगोलिक आणि रासायनिक झिजेचा परिणाम आहेत. यामुळेच खडकाळ प्रदेश किंवा नुसताच दगडाने भरलेला नापिक भूभाग, मोठमोठी झाडे नसणारा, झुडपी जंगल असणारा गवताळ प्रदेश अश्या प्रकारे या सड्यांचे वर्णन ठिकठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येते.

नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी ( national remote sensing agency) करत असलेल्या वेस्टलॅंड अॅटलस ऑफ इंडिया ( Wasteland atlas of India ) ने सुद्धा कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मधील सड्यांचा समावेश कॅटेगरी २२ म्हणजेच बॅरन रॉकी ऑर स्टोनी वेस्टलँड ( barren rocky or stony wasteland) मध्ये केलेला आहे (2010). परंतु प्रत्यक्षात मात्र हे कातळ सडे प्रचंड जैव विविधतेचे भांडार आहेत. आणि शासन दरबारी दुर्लक्षित ठरलेल्या अश्या सड्यांवर वेगवेगळ्या प्रकारची अतिक्रमणे जोराने चालू आहेत. यामुळेच कातळसड्यांचे पर्यावरणीय महत्त्व, सड्यांवर अवलंबून असलेली मानवी जीवनशैली आणि त्यांची सद्यपरिस्थिती याचा आढावा घेणे गरजेचे बनले आहे.

अगदी प्राचीन काळापासून सड्यांवर जीवन बहरत आहे. जरी सड्यावरचे जीवन कठोर असलं तरी इथल्या वनस्पती, प्राणी आणि जीवसृष्टी या कठोर परिस्थितीना अनुकुलीत झाली आहे. केवळ पावसाळ्याचे चार ते पाच महिने असणारे पाणी इथे परिवर्तनाचे चक्र निर्माण करतं. कठीण परिस्थिती मध्ये कंद निर्माण करून जमिनीत दडून बसलेल्या दिपकाडी, चोहोळा, चिचुर कांदा, गडांबी कांदा, मुसळी अश्या अनेक वनस्पती या काळात प्रकट होतात,आणि फुलतात. माती आणि पोषणमूल्यांची कमतरता दूर करता यावी म्हणून गवती दवबिंदू, सीतेची आसवे अश्या वनस्पती कीटक आणि सूक्ष्मजीव भक्षक बनलेल्या पाहायला मिळतात. तर कोचे, भुईगेंद, सोनकी, तेरडा अश्या नानाविध प्रकारच्या वनस्पतीचे सडे निवासस्थान आहे. तर पाणी साचून बनलेल्या डबक्यात वायतुरा, विस्नेरिया, कुमुदिनी, पाण तिळवण अशी अनेक फुले उमलतात.

अनेक प्रकारचे बेडूक, मासे, उभयचर, साप, पाली, पक्षी आणि प्राण्यांचे अस्तित्व सड्यावर अगदी सहज दिसून येते. यामुळेच मानवी जीवन सुद्धा अगदी आदिम काळापासून सड्यावर बहरले आहे. ठिकठिकाणी आढललेली कातळशिल्पे, गुहा, आदिम हत्यारे ही या सहसबंधाची निशाणी आहेत. सड्यांवर असणारी अनेक देवळे, प्रथा परंपरा याची साक्ष देतात. टाकळा, कर्टुले, कवळा, फोडशी, कुडा, कूर्डू अश्या अनेक रानभाज्या सड्यांवर मिळतात. तर शतावरी, मुसळी, नरक्या, भुई चक्र सारख्या अनेक औषधी वनस्पतींचे सडे हे भांडार आहेत. मासे, खेकडे कोळंबी असे नेहमीच्या आहारात समावेश असणारे अनेक घटक इथे मुबलक प्रमाणात मिळतात.अश्या जैवविविधतेचे भांडार असलेल्या परिपूर्ण परिसंस्थेला नापीक म्हणणे हे एक कारस्थानच म्हटले पाहिजे.

सड्यांचे सर्वात महत्त्वाचे पर्यावरणीय कार्य म्हणजे पाण्याची उपलब्धता. सडे मुख्यत्वे करून कातळ खडकापासून तयार झालेले आहेत आणि या खडकात पाणी जिरण्याचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे हे विस्तीर्ण सडे एकप्रकारे पावसाचे पाणी साठवण्याचे (rain catchment) काम करतात. काही ठिकाणी असणाऱ्या भेगा, तडे यातून हे पाणी भूगर्भात जाते, भूजल पातळी वाढवायला मदत करते आणि उतारावरील गावांना पाण्याचा वर्षभर पुरणारा पाणीसाठा प्रदान करते. कोकणातील अनेक गावांची रचना पाहिली तर उंचांवर असणारे सडे आणि त्यांच्या पायथ्याला सभोवताली वसलेली गावे ही या पाणीसाठ्याची देणं आहेत. अनेक गावात तर सड्यावरून पाट काढून बागायती क्षेत्र विकसित झाल्याचं दिसून येत.

सड्यावर येणारा एकत्रित मोठा फुलोरा हा अनेक कीटक, फुलपाखरे, पतंग आणि पक्षी यांना मधुरस पिण्यासाठी आकर्षित करतो. ह्या वनस्पतींचे परागीभवन होण्यासाठी ही मधुरसाची बक्षिसी मोठ्या प्रमाणात दिली जाते. श्रावणात उन्ह पडू लागली की अनेक प्रकारच्या मधमाश्या आणि कीटकांची रेलचेल या सड्यावर दिसू लागते. एका अर्थी या परागीभवन करणाऱ्या कीटकांना पावसाळी काळात ज्यावेळी इतर झाडांना फुलोरा कमी असतो त्या काळात अन्न देण्याचे महत्त्वाचे काम सडे करत असतात. हेच परागीभवन करणारे जीव सड्यांच्या आजूबाजूला वसलेल्या फळबागांचे, शेतीचे पिकांचे परागीभवन करत असतात. म्हणजेच सड्यांच्या या पोलीनेशन सुविधेमुळे आजूबाजूच्या पिकांचे उत्पन्न वाढ होण्यास मदत होते.

शेती आणि पशुपालन करण्यासाठी सड्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. जिथे कातळ कमी आहे आणि वाहून आणलेल्या मातीचे प्रमाण जास्त आहे अश्या भागात भात, नाचणी, वरी ची पिके घेतली जातात. दगडाची झीज होऊन निर्माण झालेल्या या मातीत अनेक वेळा पोषकद्रव्ये सुद्धा बऱ्यापैकी मिळून येतात. शेळ्या, मेंढ्या आणि गुरांसाठी तर चारा मिळवण्यासाठी सडे हा एकमेव स्त्रोत आहे. नियंत्रित पद्धतीने चराई करून बहुसंख्य लोकांना यातून रोजगार आणि पैश्याची उपलब्धता होते. अनेक ठिकाणी आंबा आणि इतर पिकांची लागवड सुद्धा सड्यांवर केलेली आढळते. कातळात खड्डा मारून केलेली ही आंबा लागवड काही ठिकाणी यशस्वी झाली आहे. परंतु गेल्या काही वर्षात लोकसंख्येचा वाढता ताण आता या परिसंस्थावर सुद्धा ताण निर्माण करत आहे. घरांसाठी लागणारे चिरे, इतर गौण खनिजांच्या खाणी मोठ्या प्रमाणात याठिकाणी आढळतात. किनारी भागात तर या सड्यावर अनेक मोठमोठे रासायनिक, विद्युत निर्मिती प्रकल्प, बंदरे प्रस्तावित करण्यात आली आहेत.

अंजनवेलचा एनरॉन, जयगडचा जिंदाल, गोळप मधील फिनोलेक्स, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, प्रस्तावित ऑईल रिफायनरी, रत्नागिरी आणि चीपी विमानतळ, बारसु एमआयडीसी हे सर्व प्रकल्प सडे मध्यभागी ठेऊन नियोजित केले गेले आहेत. रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण करण्याची आश्वासने देऊन इथल्या जैव विविधतेचे नुकसान होणार असल्याचे मात्र सातत्याने लपवून ठेवले आहे. शेती, पर्यटन, विंडमिल प्रकल्प हेही या नाजूक परिसंस्थेवरील ताण वाढवत आहेत. कास पठारावर झालेल्या अति पर्यटनामुळे अनेक दुष्परिणाम समोर आले आहेत. तसेच कुंपण घातल्यामुळे अनेक वनस्पतींच्या प्रसारावर बंधन आले आहे. अनेक ठिकाणी जल संवर्धनाचे उपाय म्हणून बांधण्यात आलेली धरणे, पाझर तलाव जैव विविधतेवर परिणाम करणारे ठरले आहेत.

हौशी पर्यावरण प्रेमींनी सुद्धा सड्यांना उजाड ठरवून अनेक ठिकाणी वृक्षरोपणाचे कार्यक्रम राबवले आहेत जे इथल्या जैवविविधतेला घातक ठरले आहेत. मानवी हस्तक्षेपामुळे रानमोडी, टनटनी, सुबाभूळ, गिरिपुष्प सारख्या आक्रमक आणि विदेशी मूळच्या वनस्पती सड्यावर वेगाने पसरत आहेत. एकंदरीत पाहता सड्यांची सद्यस्थिती राखून ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलणे आता गरजेचे बनले आहे.गेल्या काही वर्षात वनस्पती, प्राणी, कीटक यांच्या अनेक नव्या प्रजातींचा शोध या परिसंस्थेमध्ये लागला आहे. अन्नसाखळीमध्ये महत्त्वाचे असणारे अनेक घटक इथे आढळत असल्याने पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी सड्यांचे महत्त्व अपरंपार आहे. तसेच जनुकीय विविधता टिकून राहण्यासाठी अशी विविधता असणे अत्यंत महत्त्वाचे असते.

ही जैव विविधता राखता येईल आणि लोकसहभागातून त्यांचं जतन, संवर्धन होईल यासाठी समूह संरक्षित सडे सारखी संकल्पना राबवणे गरजेचे आहे. इथली कातळ शिल्प, मंदिरे, भौगोलिक वारसा, फुलोरा यांचे जतन होईल आणि ते करताना इको फ्रेंडली टूरिझममधून अर्थार्जन ही होईल अश्या पॉलिसी निर्माण करणे ही काळाची गरज आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात लोकप्रबोधन लोकचळवळ ही आता येणाऱ्या काळाची हाक आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

साहित्यिक महादेव मोरे यांना आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार जाहीर

सत्ता गाते गाणे…

वैनाकाठ फाऊंडेशनतर्फे साहित्य पुरस्कारांचे वितरण

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading