प्रत्येकातील कलागुण वेगवेगळे असतात. प्रत्येकाचा नंबर पहिला येतो का ? याचा विचार व्हायला हवा. लहान असतानाच मुलाला जर तुला हे जमत नाही तर काय झाले तुला अमुकतमुक तर छान जमते ना तू ते कर.. त्यात पारंगत हो. असे समजावून सांगायला हवे.
सौ सुनेत्रा विजय जोशी
रत्नागिरी
आजकाल एक नवीनच फॅड निघाले.. कुणी काही केले की हाऊ स्वीट. क्यूट. वगैरे म्हणायचे.. एखाद्या मित्र किंवा मैत्रिणीने कुठली स्टाईल केली आणि ती तिला शोभत नसली तरी. सुध्दा वाव.. मस्त दिसते गं.. असे म्हणायचे. खरे तर आरसा आपल्याला खरे काय ते सांगत असतोच. पण… तिची त्यामध्ये अजुनच शोभा होत असते. नंतर मागे काय घाण दिसते म्हणून हसे होत असते. पण तिला कुणी सत्य परिस्थिती सांगून सावध मात्र कुणी करत नाही.
खरे तर आपण चांगले मित्र असू तर सगळ्या समोर नको पण तिला एकटीला सांगू शकतो की हे तुला शोभत नाही, तर तिची किंवा त्याची पुढची होणारी शोभा टळेल. प्रोत्साहन नक्की द्यावे, यात काही वाद नाही. पण सरसकट सगळ्या गोष्टींना चांगले म्हणण्याचा अट्टाहास का ? तसेच कुणी काही केले की, म्हणजे रांगोळी काढली किंवा चित्र काढले किंवा काही लिहीले किंवा गाणे म्हटले तरी वा वा असेच म्हणायचे…. कुणाला नाराज करु नका किंवा एकदम बकवास असे म्हणा असे माझे म्हणणे अजिबात नाही. पण त्याला सौम्य शब्दात असे तर आपण नक्कीच सांगू शकतो ना की बाबा रे ठीक आहे पण अजून रियाज करण्याची किंवा नीट म्हणण्याची गरज आहे… तरच त्या व्यक्तीला आपण खरेच कुठल्या पायरीवर आहोत हे कळेल. आणि सुधारणा करता येईल. तसेच जे सत्य आहे ते स्विकारण्याची सवय लागेल आणि भ्रमात जगणे बंद होईल.
प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला कशी येईल. तसे असते तर सगळेच लता मंगेशकर किंवा किशोरकुमार किंवा तत्सम विषयात पारंगत झाले असते. पण तसे नसते, प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. प्रत्येकातील कलागुण वेगवेगळे असतात. प्रत्येकाचा नंबर पहिला येतो का ? याचा विचार व्हायला हवा. लहान असतानाच मुलाला जर तुला हे जमत नाही तर काय झाले तुला अमुकतमुक तर छान जमते ना तू ते कर.. त्यात पारंगत हो. असे समजावून सांगायला हवे. नाहीतर पुढे मग या स्पर्धेच्या युगात त्याचा टिकाव लागणार नाही. मग ते अपयश सहन होत नाही, कारण आपण त्याला हे कधी सांगतच नाही के हे तुला जमत नाहीये. तू तुला आवडेल आणि जमेल तेच कर हे पण सांगायला हवेच ना..
कधीकधी यातून मग आत्महत्या सारखे प्रकार पण घडतात तेव्हा पश्चाताप होऊन काही फायदा नसतो… तसेच आजकाल जे शोज होतात त्यात पण किती लाईक येतात ते गुणात धरतात. अरे पण एखाद्याचे ओळखीचे खूप लोक असतील तर साहजिकच त्याला जास्त लाईक आणि कमेंट्स येणार. एखाद्याचे नसले तर कमी पण म्हणून त्याची गुणवत्ता कमी होते का ? नाही पण तो पुरस्कार मिळवण्यापासून वंचित होतो. हे कितपत योग्य आहे..
खरा विजेता बाजुला राहून दुसराच कुणीतरी मिरवतो. पण याबद्दल कुणीच आवाज उठवणे सोडा बोलत पण नाही.. कुणामध्ये एखादा गुण आहे हे लक्षात आले तर त्याला तो गुण वाढवायला प्रेरीत नक्की करावे. पण नसेल येत तर त्याला पण हे सौम्य शब्दात नक्की सांगावे की हा तुझा प्रांत नाही. तू दुसरे क्षेत्र निवड… म्हणजे बरीच वर्षे घालवून अपयश पदरी पडल्याने होणारे मोठे दुःख टळेल… असे मला वाटते.. पण लाईक आणि कमेंट्स ची ही दुनिया आहे. सगळ्यांनाच इथे प्रत्येक क्षेत्रात पहिलेच यायचे आहे बाय हूक ऑर क्रुक… काय करणार ? पण एकदा तरी असा विचार करून बघाच अशी माझी विनंती मात्र आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.