October 8, 2024
article on Spirituality by rajendra ghorpade
Home » Privacy Policy » आध्यात्मिक तेज कशाला म्हणतात ?
विश्वाचे आर्त

आध्यात्मिक तेज कशाला म्हणतात ?

आपण आपल्या लहानपणी विविध स्त्रोत्र, आरत्या पाठ केल्या. त्या आजही पाठ असतील. पण त्याचा प्रत्यक्ष जीवनात आपण किती लाभ करून घेतला याचा विचार कधी आपण केला आहे का ? इतकेच काय त्यांचा अर्थ तरी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का ? आरत्या पाठ करण्याची सक्ती केली म्हणून आपण त्या पाठ केल्या. पण त्या नुसत्या पाठ आहेत. बाकी अर्थ सगळा सपाट आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६

ऐसे ईश्वराकडे निज । धांवे आपसया सहज ।
तयां नांव तेज । आध्यात्मिक तें ।। १८९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा

ओवीचा अर्थ – अशा प्रकारे परमेश्वराकडे अंतःकरण सहज आपोआप धाव घेते. त्याला आध्यात्मिक तेज म्हणतात.

भौतिक विकासामुळे माणसाच्या जीवनात अनेक सुखदायी सोयीसुविधा झाल्या आहेत. पण त्या मिळाव्यात यासाठीच त्याची धडपड सुरु आहे. त्या मिळाल्यातरच त्याला शांती मिळते अन्यथा त्या मिळवण्यातच तो गुरफटला जातो. अशाने त्याचे जीवनही ताणतणावाचे झाले आहे. याचा त्याच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. पण त्याकडेही त्याला लक्ष द्यायला वेळ नाही. अशी काहींशी अवस्था त्याची झाली आहे. व्यस्त, व्यस्त, व्यस्त अशी त्याची स्थिती झाली आहे. अशाने नव्यापिढीला अध्यात्माबद्दल फारशी ओढ किंवा त्याचे ज्ञान नाही. धार्मिक विधी किंवा धार्मिक पर्यटन म्हणजे अध्यात्म असा त्यांचा ग्रह झाला आहे. धकाधकीच्या या जीवनशैलीमुळे धार्मिक ग्रंथाचे वाचन आता कमी झाले आहे. पोटापाण्याचा व्यवसाय अधिक महत्त्वाच्या झाल्याने यातच मनुष्य अधिक गुरफटलेला आहे. अशाने नवीपिढी खऱ्या आध्यात्मिक विचारापासून खूप दूर लोटली जात आहे.

पैसा कमवल्यानंतर विरंगुळा म्हणून धार्मिक पर्यटन याकडे कल अधिक वाढला आहे. धार्मिक पर्यटन म्हणजेच अध्यात्म हाच अर्थ आता नव्या पिढीत रुजलेला पाहायला मिळत आहे. त्यातच काहीसे ऐतिहासिक संदर्भ घेऊन त्यावर वाद-विवाद चर्चा करण्यातच ही पिढी गुरफटलेली पाहायला मिळते. मुळ अध्यात्माच्या अभ्यासाकडे याचा कल दिसत नाही. इतकेच नव्हे तर ते जाणून घेण्याचीही त्यांची फारशी इच्छा दिसत नाही. अशाने अध्यात्म म्हणजे काय हेच आता नव्यापिढीला माहीत नाही. साधना करणे म्हणजे स्वतःचा वेळ फुकट घालवणे अशी मानसिकताही अनेकांची झाल्याची पाहायला मिळते. तसा हा बदल अपेक्षितच आहे. कारण विज्ञान समजले तरच अध्यात्म समजू शकते. विज्ञानातूनच ज्ञान यासाठीच सांगितले गेले आहे. हे विचारात घ्यायला हवे.

अध्यात्म हे अनुभव शास्त्र आहे. त्याची अनुभुती आल्याशिवाय हे शास्त्र समजणे कठीण आहे. भौतिक विकासातून आलेला शिण घालवण्यासाठी विरंगुळा म्हणून धार्मिक पर्यटन हे अध्यात्म नाही. हे जेंव्हा त्याच्या लक्षात येईल. याची अनुभुती येईल तेंव्हात ते खऱ्या अध्यात्माकडे वळतील. नव्यापिढीला जबरदस्तीने इकडे वळवण्याचीही गरज नाही. कारण अध्यात्म हे सक्ती करून शिकवण्याचे शास्त्र नाही. सक्ती करून, नियम लादून हे शास्त्र शिकवता येत नाही. हे शास्त्र समजण्यासाठी आंतरिक ओढ असावी लागते. अंतःकरणातून, मनातून या विषयाची गोडी असावी लागते. तरच ते शास्त्र रुचते, पटते. यासाठीच नवीपिढी काय करते आहे हे त्यांना खुशाल करू द्यावे. त्यांना अध्यात्म शिकवण्याच्या फंदात पडू नये. नियम, अटी लावून ते शिकणार नाहीत.

आपण आपल्या लहानपणी विविध स्त्रोत्र, आरत्या पाठ केल्या. त्या आजही पाठ असतील. पण त्याचा प्रत्यक्ष जीवनात आपण किती लाभ करून घेतला याचा विचार कधी आपण केला आहे का ? इतकेच काय त्यांचा अर्थ तरी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का ? आरत्या पाठ करण्याची सक्ती केली म्हणून आपण त्या पाठ केल्या. पण त्या नुसत्या पाठ आहेत. बाकी अर्थ सगळा सपाट आहे. इतकेच काय आता आपण किती ग्रंथांचे पारायण करतो ? नुसते पाठांतर म्हणजे अध्यात्म नव्हे. पारायणातही प्रथम सर्व अर्थ समजेल असे नाही. पण अर्थ समजून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न होणे हे सुद्धा अध्यात्म आहे, हे समजून घ्यायला हवे. सक्तीने अभ्यासाला बसवले तर तो विषय आपणास किती समजतो ? मग सक्ती करून अध्यात्म आपण किती शिकलो याचा विचार आपण करायला नको का ? नव्यापिढीवर अध्यात्म लादताना हा विचार जरूर करावा.

अध्यात्म हे शिकवायचे नसते. ते आपोआप आत्मसात होते. त्याची गोडी, ओढ आपणास आपोआप लागते. ते शिकण्याची इच्छा असेल तरच ते शास्त्र निट समजते. तशी मानसिक तयारीही असावी लागते. मनाची तयारी झाल्यानंतरच हे शास्त्र सहज समजू शकते. चुकीच्या पद्धतीजरी यात शिकवण्याचा प्रयत्न केला तरी चुक काय अन् बरोबर काय हे सुद्धा समजण्याइतके पारंगत आपण त्यात होतो. विज्ञान समजले तरच अध्यात्म आपणास समजणे सोपे जाते. कारण अज्ञान दूर होण्यासाठी विज्ञान समजने गरजेचे आहे. विज्ञान जिथे संपते तेथून पुढे अध्यात्म सुरु होते. या सर्व गोष्टी अभ्यासाने समजून घ्यायच्या आहेत. अध्यात्म शिकण्याची इच्छा जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा मन आपोआप त्याकडे वळते. मनापासून ते शास्त्र शिकण्याची इच्छा जेंव्हा होईल यालाच आध्यात्मिक तेज असे म्हणतात. हे तेज आपोआप आपल्यात उत्पन्न होते. पण यासाठी मनाची तयारी होणे गरजेचे आहे. सक्ती, जबरदस्तीने हे तेज येत नाही. ही ओढ अंतःकरणातून लागते. अशा अवस्थेनंतरच खरे अध्यात्माचे स्वरुप समजू शकते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading