बहुजनांनो, आपला मेंदू आपल्याच मस्तकात ठेवा
‘बाबासाहेबांचे विचार आणि आजचा काळ’ व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन
महापरिनिर्वाण दिनानिमित्त कणकवलीत व्याख्यान
कणकवली – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आधी समाज सुधारणा नंतरच राजकीय सुधारणा याला महत्त्व दिले. मात्र आपल्या देशात समाज सुधारणेला प्राधान्य न देता सत्तेवर येण्याच्या चढाओढीत राजकारणाला प्राधान्य दिले गेले. यातूनच बहुजनांचा मेंदू ताब्यात घेण्यात आला. यापुढे मात्र बहुजनांनी आपला मेंदू आपल्याच मस्तकात ठेवला नाही तर देशात अराजकता माजायला वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन कवी आणि स्तंभलेखक अजय कांडर यांनी ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि आजचा काळ’ या विषयावर येथे आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात येथे केले.
महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंधेला कणकवली तालुका बौद्ध विकास संघातर्फे येथील बौद्ध विहाराच्या सभागृहात कवी कांडर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी कांडर यांनी बाबासाहेबांना समजून घ्यायचं असेल तर आधी त्यांच्या विरोधकांना समजून घ्यायला हवे, तरच बाबासाहेब कळणे शक्य आहे असेही आग्रहाने सांगितले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ, सतीश पवार, कणकवली तालुका बौद्ध विकास संघ मुंबई शाखाध्यक्ष अंकुश कदम, मुंबई अध्यक्ष अनिल कदम, वसंत कदम, संजय कदम, सुनील तांबे, सुप्रिया सरपे, विश्वनाथ कदम, स्वप्निल भरणकर, सायली कासले, नीलम तांबे, शैलेश तांबे, संदीप कदम, नरेंद्र तांबे उपस्थित होते. यावेळी व्याख्यानानंतर डॉ सतीश पवार यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
कवी कांडर म्हणाले, बाबासाहेबांनी तू गुलाम आहेस याची जाणीव आधी गुलामाला करून द्या असे सांगितले. कारण ती जाणीव जोपर्यंत त्याला होत नाही तोपर्यंत त्याच्यासह जातीच्या उतरंडीवरील शोषितांची सामाजिक सुधारणा होणार नाही. बाबासाहेब किती द्रष्टे होते हे आता लक्षात येते. कारण गेल्या काही वर्षात गुलामाला अधिक गुलाम बनविण्याची प्रक्रिया नव्याने सुरू झाली आहे. काही जातीय आणि धार्मिक संघटना छुप्या पद्धतीने नाहीच तर जाहीरपणेही या प्रक्रिया घडवीत आहेत. म्हणजे गुलामाला गुलाम ठेवायचं आणि वरच्या जातीने त्यावर सत्ता गाजवायची; बाबासाहेबांनी तर अशा सत्तेला सुरुंगच लावला. मात्र आजही आपण अशा संघटनांना पाठबळ देणे स्वतःची प्रतिष्ठा मानतो. हे सगळ्यात दुर्दैवी आहे.अतिउच्च जातीतला कुठला माणूस रस्त्यावर झेंडा घेऊ उतरलेला दिसत नाही. मात्र जातीय – धार्मिक संघटना बहुजनांचा योग्य प्रकारे वापर करताना दिसतात.
कलबुर्गी, गौरी लंकेश, पानसरे, दाभोळकर यांच्या हत्या झाल्या. यांच्या हत्त्ये मागे कोण सूत्रधार होते आणि या सगळ्यांची हत्या कोणी केली ? या घटनांमागील बहुजनांची नावे जेव्हा समोर येतात तेव्हा आपण चक्रावून जातो. जर बाबासाहेबांनी सांगितलेला स्वतःच्या स्वाभिमानाचा विचार बहुजनानी अमलात आणला असता तर ही वेळच त्यांच्यावर आली नसती.
बाबासाहेबांनी धम्म दीक्षा घेण्याची जी घोषणा केली आणि तिचा जो स्वीकार केला ही या देशातली स्वातंत्र्यानंतरची सगळ्यात मोठी क्रांती आहे. या जगात सर्वाधिक बुद्ध विचाराचे लोक राहतात आणि आपल्याकडे बुद्ध विचार म्हणजे ज्यांचं सर्वाधिक शोषण होतं त्या वर्गाचा विचार असं समजलं जातं. पण असे समजणारे जे बहुसंख्येने या देशात राहतात त्यांना हे माहीत नाही तुम्ही तुमच्या मुळाशी गेलात तर इथली संस्कृती बुद्ध संस्कृतीच होती. सांस्कृतिक राजकारण ज्याला उत्तम करता येतं तोच खऱ्या राजकारणात अधिक यशस्वी होऊ शकतो असे बाबासाहेबाना वाटत होते. आज मात्र काही धार्मिक संघटनांनी हेच दाखवून दिले आहे.
सध्या दुसऱ्यांचा मेंदू ताब्यात घेणाऱ्या संघटना आधी सांस्कृतिक राजकारण करतात, लोकांची त्यातून डोके भडकवतात आणि मग त्यांच्या राजकीय संघटनेला सत्ता मिळवून देतात. हेच बाबासाहेबांनी साठ वर्षांपूर्वी वर्षांपूर्वी सांगितले. आज आपले विरोधक मात्र बहुजनांना सोबत घेऊन त्याची अंमलबजावणी करताना दिसतायत.
पंढरपूरची विठ्ठल मूर्ती ही बुद्ध मूर्ती आहे. हे बाबासाहेबांनीच पुराव्यानिशी दाखवून दिल आहे. संत बहिणाबाई, संत जनाबाई यांच्या अभंगांमध्ये याचा संदर्भ आढळतो. मग याचा उलटा विचार केल्यावर वारीमध्ये समतेची भाषा बोलली जाते किंवा वारीही समता आहे असं म्हटलं जातं. त्याचं कारण काय याचा शोध आपल्याला घेता येतो. या वारीमध्ये हिंदू तर सहभागी असतो , मुस्लिमही सहभागी असतो आणि इतर धर्मातलेही लोक सहभागी असतात. ही एकात्मता बुद्ध विचाराची आहे.
हे आपण समजून घ्यायला आहे, असेही कांडर म्हणाले.
अंकुश कदम यांनी प्रस्तावना केली. वसंत कदम यांनी सूत्रसंचालन केले तर विश्वनाथ कदम यांनी आभार मानले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.