गारगोटी – कोनवडे (ता. भुदरगड) येथील कवी आणि प्रयोगशील शिक्षक गोविंद पाटील यांच्या ‘थुई थुई आभाळ’ या बालकवितासंग्रहाचा समावेश शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अभ्यासमंडळाकडून एम. ए. भाग एकच्या वर्गासाठी सुधारित अभ्यासक्रम गठीत करण्यात आला आहे.
त्या अंतर्गत प्रथम सत्रासाठी तयार केलेल्या ‘बालसाहित्य’ या विशेष अभ्यासपत्रिकेमध्ये क्रमिक पुस्तक म्हणून या बालकवितासंग्रहाचा समावेश केला आहे. सांगलीच्या सृजन प्रकाशनाने हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. अल्पावधीतच या संग्रहाच्या दोन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.
कवी गोविंद पाटील यांचे यापूर्वी ‘गावकिर्तन’, ‘धूळधाण’, आणि ‘उध्वस्त ऋतुंच्या कविता’ हे तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. कवितालेखनासाठी त्यांना महाराष्ट्रातील राज्यस्तरावरचे प्रतिष्ठेचे पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार, यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार मिळाले आहेत. विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून परिचित असलेल्या श्री. पाटील यांनी लहान मुलांमधील सर्जनशील वृत्ती वाढीस लागावी म्हणून प्राथमिक स्तरावर लेखन कार्यशाळा, विद्यार्थी साहित्य संमेलने इत्यादी विविध वाङ्मयीन उपक्रम राबविले आहेत. पुरोगामी शिक्षक समितीचे सक्रिय कार्यकर्ते असलेले श्री.पाटील सध्या रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे प्राथमिक शिक्षक म्हणून काम पाहातात.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.