December 5, 2024
Search for a new poem by Sushil Dhasakte
Home » सुशील धसकटे यांचा नव्या कवितेचा शोध
मुक्त संवाद

सुशील धसकटे यांचा नव्या कवितेचा शोध

माणूस, माणूसपण, त्याची निर्मळ भावना आणि गुणवत्ता कस्पटासमान झाली आहे. या गोष्टी पूर्वी कधी घडत नव्हत्या असं नव्हे; मात्र आज त्यांचं प्रमाण पूर्वीपेक्षा शतपटीने वाढलेलं आहे हे निश्चित. शिवाय त्यातील क्रूरता, अमानुषता आणि अविश्वासही शब्दांच्या पलीकडे गेलेला आहे. अशा शब्दात आजच्या जगण्याचं वास्तव नेमकेपणाने धसकटे यांनी परंतु दिवाळी अंकाच्या माणुसकी लिमिटेड विशेषांक निमित्ताने मांडलं आहे.

अजय कांडर
लेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत. ९४०४३९५१५५

कादंबरीकार सुशील धसकटे हे एक नेमस्त लेखक आहेत. लिहिण्याची आणि जगण्याची पक्की भूमिका असणारा हा साहित्यिक आहे. कुणाच्याही अमिषाला बळी न पडणे या त्यांच्या चांगुलपणामुळे साहित्य व्यवस्थेशी मिळतं जुळतं घेऊन राहणारे लोक त्यांच्या पासून सावधपणे दूर राहतात. धसकटे यांचं लेखन तर उत्तम असतंच; परंतु साहित्याच्या उत्तम ग्रंथ निर्मिती बद्दल त्यांचा नावलौकिक आहे. आपल्या लेखनातून नव भान देणाऱ्या साहित्यिकांचा ते सतत शोध घेत असतात.

दोन वर्षांपूर्वी त्यांनी परंतु दिवाळी अंकाचा प्रसिद्ध केलेला ‘गांधी विशेषांक’ लोकप्रिय झाला होता. यावर्षी त्यांनी माणुसकी अनलिमिटेड हा विषय घेऊन परंतु चा दिवाळी अंक प्रसिद्ध केला. त्यालाही वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मराठीतल्या नव्या कवयित्रींचा शोध घेऊन त्यांच्या कविता प्रसिद्ध केल्या आहेत. आणि आजच्या मराठी कवितेत लिहिल्या जाणाऱ्या कवयित्रींच्या कवितांचा चेहरा कसा आहे याचे प्रतिबिंब वाचकांसमोर त्यांनी ठेवले आहे. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.

आज सगळ्याच कलाक्षेत्राचं सपाटीकरण चालू असतानाच्या काळात ‘कविता जोखमीने लिहिणे आणि कवितेतलं कवितापण टिकवणे’ ही अपवादात्मकच गोष्ट ठरते आहे. या पार्श्वभूमीवर प्रसिद्धीपासून दूर राहून नव्या पिढीतील उत्तम कविता लिहिणाऱ्या कवयित्रींचा शोध घेण्याची धसकटे यांची दृष्टी त्यांच्या चोखंदळ संपादकीय दृष्टीची साक्ष देते.मानवी जगणं हे ‘स्त्री आणि पुरुष ‘ यात दुजाभाव करणारे आहे. मानवाची निर्मिती झाली तेव्हा खरं तर कोणताच भेद नव्हता, हे विज्ञानाने सिद्ध केलं आहे आणि ते विवेकबुद्धीनेही स्वीकारलं गेलं आहे. मात्र भारतासारख्या भूमीत विज्ञानाला दूर सारून आणि विवेकबुद्धीच्या कसोटीवर न उतरवता स्त्री आणि पुरुष यामध्ये कमालीचा भेदभाव केला गेला. यात स्त्रीला अति दुय्यमस्थान दिलं गेलं. जातीच्या उतरंडीवर जो शेवटचा शोषित घटक आहे, अशा प्रकारचं स्थान हे स्त्रीचं आहे. मग ती स्त्री-जातीच्या उतरंडीवरची कुठल्याही स्तरावरची असू दे, तिचं शोषण सर्व स्तरात चालूच असतं.

स्त्रीच्या दबल्या गेलेल्या आवाजाला आणि तिचा माणूस म्हणून स्वीकार करण्याला अधिक न्याय मिळावा म्हणून विविध चळवळी राबविल्या गेल्या. स्त्रीमुक्ती चळवळ हा यातला महत्त्वाचा घटक आहे. आपल्या महाराष्ट्रात स्त्री मुक्ती चळवळ गेली पाच दशके चालू असली तरी स्त्रीच्या मुक्तीच्या आवाजाचे ध्वनी इथल्या भूमीत खूप पूर्वीपासून ऐकू येत होते. त्यामुळे स्त्री मुक्तीची ललकारी ही काही इतर देशातून आयात केलेली नाही. संत जनाबाई असो, संत बहिणाबाई असो, की स्त्रीला शिक्षणाचे स्वातंत्र्य मिळवून देणारे महात्मा ज्योतिराव फुले किंवा स्त्रीला संपूर्ण स्वातंत्र्य देण्यासंदर्भात कायदा निर्माण करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत सर्वांनीच स्त्री मुक्तीचा विचार आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. एवढेच काय तर या देशातील पहिल्या वैद्यकीय उपचार करणाऱ्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत असो.

सगळ्यांचे खऱ्या अर्थाने स्त्री मुक्तीतील कृतिशील योगदान अनन्यसाधारण असे आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठी कवयित्रींची कविता स्वतःला म्हणजेच स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून लिहिली गेली. अर्थात या कवितेचा आपण प्रांजळपणे स्वीकारच केला पाहिजे.मात्र तरी स्त्री स्वातंत्र्याचा उदो उदो केल्या जाणाऱ्या या काळात आज लिहिणाऱ्या कवयित्री एकूणच मानवी जगण्याला समग्रपणे भिडून समकाळाचं एकूणच जगणं, त्या जगण्याचे ताणेबाणे आणि विशेष म्हणजे त्यातून स्व-अस्तित्वाचा शोध कशाप्रकारे घेत आहेत हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या पार्श्वभूमीवर परंतु च्या दिवाळी अंकात निवडलेल्या गेलेल्या कवयित्रींच्या कवितांचाही विचार करावा लागतो.

आज जी मराठीत कविता लिहिली जात आहे, त्यात शहरी भागाबरोबरच निमशहरी आणि अतिशय दुर्गम भागापर्यंत लिहित्या कवी – कवयित्रींचा समावेश होतो. एका बाजूला जागतिकीकरणाच्या रेट्यात गाव आणि शहर एक होताना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला गावाला शहर कब्जा करताना दिसत असलं तरी गावालाच शहराकडे जायची घाई झालेली दिसते. म्हणजे शहराचे पूर्णपणे आधुनिकीकरण झालं आहे आणि गाव आधुनिकीकरणाच्या उंबरठ्यावर आहे. अशावेळी शहर आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या कलावंताची मानसिकता एकच कशी काय असू शकेल? असा प्रश्न साहजिकच सुज्ञ व्यक्तीला पडू शकतो. त्यामुळे या दोन स्तरावर राहणाऱ्या कवयित्रींच्या मानसिक आंदोलनाचा स्वतंत्र विचार आपल्याला करावा लागतो.याच पातळीवर त्यांची कविताही समजून घ्यावी लागते.

सुशील धसकटे म्हणतात, ‘सामान्य व्यक्तींपासून ते प्रतिष्ठित व्यक्तींपर्यंत बोलली जाणारी अभद्र विधाने हल्ली नित्याची झाली आहेत.’ हे आजचं समाजवास्तव आहे. खून, मारामाऱ्या, भांडण, बलात्कार, फसवणूक, गंडवणे, स्वार्थीपणा द्वेष आदींच्या संख्येत आज अतिशय लक्षणीयरित्या वाढ झाल्याचे दिसते. दैनंदिन जगण्यात पैसा, संपत्ती, सत्ता आदी अनेक इतक्या बाबी वरचढ ठरत आहेत की यापुढे माणूस, माणूसपण, त्याची निर्मळ भावना आणि गुणवत्ता कस्पटासमान झाली आहे. या गोष्टी पूर्वी कधी घडत नव्हत्या असं नव्हे; मात्र आज त्यांचं प्रमाण पूर्वीपेक्षा शतपटीने वाढलेलं आहे हे निश्चित. शिवाय त्यातील क्रूरता, अमानुषता आणि अविश्वासही शब्दांच्या पलीकडे गेलेला आहे. अशा शब्दात आजच्या जगण्याचं वास्तव नेमकेपणाने धसकटे यांनी परंतु दिवाळी अंकाच्या माणुसकी लिमिटेड विशेषांक निमित्ताने मांडलं आहे.

धसकटे यांचे हे निरीक्षण म्हणजे आजच शतखंडीत जगणं आहे. शतखंडीत जगणं म्हणजे आता घेतलेला अनुभव काही क्षणात न टिकता पुन्हा दुसरा त्यापेक्षा भयानक अनुभव आपल्याला घ्यावा लागतो. मग अशावेळी कवयित्रीने स्त्रीमुक्तीचीच कविता लिहिणे क्रमप्राप्त आहे का? की ती कविता लिहिता लिहिता समग्र जगण्याला भिडणारी कविता लिहिली गेली पाहिजे. तर याचं उत्तर होय असच असल्याने वाचकांनीही समग्र जगण्याला भिडणाऱ्या लिहिलेल्या गेलेल्या कवितेचा शोध घ्यायला हवा. आणि असा नव्या जाणिवेच्या कवयित्रींच्या कवितेचा शोध धसकटे यांनी यावर्षीच्या परंतु दिवाळी अंकाच्या माध्यमातून घेतला आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading