जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर भय हे येतच राहाते. पण या भयाला नष्ट करणारी बुद्धी योग्यवेळी हृदयात प्रकट झाल्यास जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात. बऱ्याचदा आपली बुद्धी चालत नाही. तेंव्हा मात्र हे भय आपणाला खायला उटते. ही भितीच जीवनात प्रलय आणते. या प्रलयाचा सामना करण्याचे सामर्थ्य हवे. यासाठीच जीवनाचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
अर्जुना ते पुण्यवशें । जरी अल्पचि हृदयी बुद्धि प्रकाशे ।
तरी अशेषही नाशें । संसारभय ।। २३७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय २ रा
ओवीचा अर्थ – अर्जुना, ती बुद्धि पुण्याईच्या योग्यतेने जर थोडीशी हृदयांत प्रकट होईल, तर संसाराचे सर्व भय नाहीसें होईल.
आयुष्यात आपण व्यर्थ काळजी करत असतो. विकासासाठी काळजी, हुरहुर ही असायलाच हवी. पण त्यालाही एक मर्यादा असावी. नको ती चिंता करून आपण त्यात गुरफटत राहातो. सर्वच गोष्टीत देवावर सोडून चालत नसते. आपणही काही कृती करावी लागते, तेंव्हाच देव मदतीला धावतो हे लक्षात घ्यायला हवे. पण काळजीत गुंतून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा देवावर सोडणेही चांगले असते. संसारात सुख-दुःखे ही येतच असतात. जीवनात चढ-उतार हे येतच असतात. यासाठी बुद्धीची स्थिरता ढळेल इतका विचार करणेही योग्य नाही.
जन्माला आल्यानंतर आपणास काहीच माहीत नसल्याने आपण सर्व गोष्टींचा उपभोग घेत असतो. बालपण हे त्यामुळेच आनंदी असते. कारण आपणाला कशाचीही काळजी नसते. सर्व काही आपणाला इतरांकडून मिळत असते. भुक लागली की रडायचा अवकाश आई जेवणाचा घास भरवते. मग ते श्रीमंत असो वा गरीब परिस्थितीनुसार सर्व सुख दुःखे ही येत असतात. पण बालपणात आपणास काळजी नसते त्यामुळे आपण सुखी असतो. ठराविक वयोमर्यादेनंतर मात्र आपणाला समज येणे गरजेचे असते. या अकलेबरोबरच जीवनात सुख – दुःखे ही येत राहतात. संसार समजायला लागल्यानंतर मग त्याचे भयही वाटू लागते. विद्यार्थी दशेत अभ्यासाची भिती असते. शिक्षणाचीही भिती असते. पण योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर त्याचे भयही दूर होते. उतारवयात मृत्यूचे भय असते. आजारपणाच्या त्रासाने ते भय अधिकच बळावते. यासाठीच सतसंग हा असावा लागतो.
जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर भय हे येतच राहाते. पण या भयाला नष्ट करणारी बुद्धी योग्यवेळी हृदयात प्रकट झाल्यास जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात. बऱ्याचदा आपली बुद्धी चालत नाही. तेंव्हा मात्र हे भय आपणाला खायला उटते. ही भितीच जीवनात प्रलय आणते. या प्रलयाचा सामना करण्याचे सामर्थ्य हवे. यासाठीच जीवनाचा खरा अर्थ समजून घ्यायला हवा. संसार भय नाहीसे झाले तर जीवन निश्चितच आनंदी होऊ शकते. यासाठीच शाश्वत जीवनशैलीचा अभ्यास हा गरजेचा आहे. शाश्वत आनंद त्यातूनच मिळू शकतो. तो कसा मिळतो यासाठी प्रयत्न करणे हे गरजेचे आहे.
भय दूर करणारी बुद्धि ही साधनेने प्रकट होते. साधनेमध्ये बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपणास मिळतात. सोहम साधना ही आपल्या जीवनाचे मर्म सांगणारी साधना आहे. मी कोण आहे ? याचे गुपीत सांगणारी साधना आहे. जीवनात आपणाला आपली ओळख झाली, तर सर्व प्रश्न मिटू शकतात. सर्व भय हे दूर होऊ शकते. आत्मज्ञानाची अनुभुतीच जीवनातील सर्व भय दूर करते. हे आत्मज्ञान साधनेने थोडे जरी हृदयात प्रकट झाले तरी संसारातील सर्व भय दूर होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.