April 17, 2024
Water conservation Movement article by Bhakti Jadhav
Home » जलसंवर्धन चळवळीतून पाणी प्रश्नावर तोडगा
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जलसंवर्धन चळवळीतून पाणी प्रश्नावर तोडगा

महाराष्ट्रातील पाणी प्रश्न व उपाययोजना जलसंवर्धन : काळाची गरज

पाण्याचा अभाव हाच अनेक अडचणीचा प्रारंभ आहे. नव्या तलाव व धरणांसाठी जागा त्याचा खर्च – अडथळे पार करण्यापेक्षा आहेत त्या जलसाठयांची क्षमता वाढवणे हे तुलनेने कमी त्रासाचे व कमी खर्चाचे आहे. शेतकऱ्यांमध्ये पिकांबाबत तसेच शहरी लोकांमध्ये पाणी बचती बाबत जाणीव जागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. गाळाची उपयुक्तता, शेतीची सुपिकता, सेंद्रिय पिके त्यामुळे होणारे फायदे-तोटे या सर्वाबद्दल जागृती होणे गरजेचे आहे.

जलकन्या भक्ती जाधव

जलसंवर्धन अभियान – सोलापूर
meetbhaktikirti@gmail.com

पाणी हे जीवन आहे हे अनेकांना कळते पण ते वाचवण्यासाठी कृती घडत नाही. विचारांची योग्य दिशा व त्याला कृतीची जोड याचा मेळ झाल्याशिवाय परीवर्तन घडत नाही. जलसंवर्धनसाठी नव्या धरणांऐवजी जुनीच धरणे व पाणीसाठे यांच्या जीर्णोदार करणे सोईचे ठरेल. आपले जीवनमान पाण्यावरच अवलंबून आहे. एखाद्या भागाचा विकास झाला की नाही हे पाण्याशीच निगडीत असते. निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी व अनियमित होत आहे. पिण्यासाठी शेतीसाठी जनावरांच्या चाऱ्यासाठी, उद्योग धंद्यांसाठी पाणी अपुरे पडू लागले आहे. याला उपाय एकच पडणाऱ्या थेंबनथेंब अडविला गेला पाहिजे साठवला गेला पाहिजे व जमिनित मुरवला गेला पाहिजे. तरच पाण्याची समस्या सुटेल.

अलिकडच्या काळात जलव्यवस्थापनात कुठेतरी त्रुटी रहात आहेत असे वाटते. त्यामुळे पाण्याच्या विभाजनातही उणे – अधिक होत असलेले जाणवते. रोख रक्कम देणारे पिक म्हणून उसाकडे अधिक ध्यान आकर्षित झाले आहे. अन्य पिके गौण मानली जातात पण उस या पिकाला लागणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन ही झाले पाहिजे. ड्रिप ( ठिबक सिंचन) करूनही पाण्यातील इ गारामुळे त्याचे होल बूजून अनेक ठिकाणी ठिबक सिंचन फोल ठरल्याचे तसेच लाखो रूपये वाया गेल्याचा अनुभव आहे. वरून पडणाऱ्या पावसाचे नियोजन – साठवण – त्याचा जरूरीपूरता काटकसरीने वापर याचे नियोजन चुकते. जुन्या विहिरी कोरडया पडल्या बोअरवेल वाढल्या कसेही आणि कितीही बेसुमार पाणी उपसा सुरू झाला भुजल पातळी वरचेवर खाली गेली. याचे चटके सर्वानांच बसू लागलेत. निसर्गाला ओरबडण्याच्या मानवी वृत्तीमुळेही हे जलसंकट आपल्यावर ओढावले आहे.
बऱ्याच ठिकाणचे जलसाठे गाळाने भरले आहेत. त्यांची साठवणक्षमता कमी झाली आहे. पाण्याअभावी अनेक गोष्टींवर परीणाम झाला आहे. शेतीची उत्पादन क्षमता कमी झाली, त्याचा पोत बिघडला परीणामी बेरोजगारी वाढली त्यातूनच खेडयाकडून शहराकडे कामासाठी जाणाऱ्यांचे लोंढे वाढले.

पाण्याचा अभाव हाच अनेक अडचणीचा प्रारंभ आहे. नव्या तलाव व धरणांसाठी जागा त्याचा खर्च – अडथळे पार करण्यापेक्षा आहेत त्या जलसाठयांची क्षमता वाढवणे हे तुलनेने कमी त्रासाचे व कमी खर्चाचे आहे. शेतकऱ्यांमध्ये पिकांबाबत तसेच शहरी लोकांमध्ये पाणी बचती बाबत जाणीव जागृती होणे अत्यंत गरजेचे आहे. गाळाची उपयुक्तता, शेतीची सुपिकता, सेंद्रिय पिके त्यामुळे होणारे फायदे-तोटे या सर्वाबद्दल जागृती होणे गरजेचे आहे.

विकसित राष्ट्रांचा विचार केला तर असे जाणवते की पाणी मोठया प्रमाणात वापरले जाते. तसेच त्याच्या पुनर्रवापराकडेही लक्ष दिले जाते. विकसनशिल व अविकसित राष्ट्रांचा अभ्यास करताना पाणी या विषयाकडे जास्त लक्ष केंद्रित होते. अज्ञान व अंधश्रध्दा यातून पाणी शिळे होते हे चूकीची संकल्पना अजूनही रूढ आहे. पाणी सर्रास फेकून दिले जाते. पाणी टंचाई भविष्यात अराजकता माजवू शकते किंवा युध्दजन्य परीस्थितीही निर्माण करू शकते. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे गांभिर्याने पहाणे गरजेचे आहे. पाण्याची उपलब्धता व्यवस्थापन हि काळाची गरज आहे. भविष्यातील गरज ओळखून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. भूजल पातळी झपाटयाने कमी होत आहे. अमर्याद पाणी उपस्थावर निर्बंध घालणे गरजेचे आहे. हे काम कठिण असले तरी अशक्य नाही. यासाठी अधिक समाज प्रबोधनाची गरज आहे.

दुष्काळ मानवनिर्मित आहे. अमार्याद जंगलतोड, बेबंद पाणी उपसा, अविवेकी पाणी वापर, नियोजनाचा अभाव, अपुरा अभ्यास, संकुचित वृत्ती, सिंचन सुविधांचा अभाव अशा अनेक गोष्टी पाणी टंचाईस कारणीभूत आहेत. शास्त्रीय नियोजन पाणी वाटप पध्दती, पिक पध्दती, वृक्षारोपण व संगोपन, लागवडी बाबत चे ज्ञान यावरही विचार होणे गरजेचे आहे.

पाणीटंचाई अधिक तीव्र होवू नये यासाठी वेळीच उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. जलसंवर्धन बाबत काम करणाऱ्या व इतर जागरूक मंडळींना आर्थिक तसेच तांत्रिक बाबतीत मदत मिळणे गरजेचे आहे. नद्या – तलाव – पाणलोट क्षेत्र – विहिरी – जमिनीचा पोत – पर्जन्यमानलोकांची तसेच शेतकऱ्यांची मानसिकता राजकिय पैलू – सुस्थितीत उपलब्ध साधनसामग्री – वर्तमान तसेच भविष्याचा कल – निसर्गाचा लहरीपणा या सर्व बाबींवर दृष्टीक्षेप टाकणे आवश्यक आहे. आज पाणी विकत ध्यावे लागत आहे. भविष्यातील युध्द ही पाण्यासाठी होतील असेही म्हंटले जाते. पाण्यासाठी भांडणे होत आहेत. काहिंना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. काहिनी पाण्याच्या शोधात शिक्षणही सोडले. कित्येक किलोमिटर वणवण – पायपीट या पाण्यासाठी अनेकजण करतात. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च केले जातात. काही ठिकाणी हा प्रयोग यशस्वी तर काहि ठिकाणी फुकट गेल्याचा अनुभव येतो. चारा छावण्या कमी होत नाहीत. पाणी हि दुर्मिळ संपत्ती बनत चालली आहे. ही संपत्ती काटकसरीने व नियोजन पूर्वक नाही वापरली गेली तर येणारा काळ भयावह आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून वागले पाहिले.

सोलापूर जिल्हातील 11 तालुक्यातुन विविध गावांमधून आम्ही जलसंवर्धन अभियानाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे झटत आहोत. पूर्ण जिल्हातून पाणी पातळी वाढवण्यासाठी आमचे काम सुरू आहे. सोलापूर शहर व परीसरातील तलाव- ओढे- विहिरी स्वच्छ करून त्यातील गाळ काढून जलसाठे वाढवण्याचे व त्यातील झरे जिवंत व शुध्द करण्याचे काम आम्ही करतोय. आजवरच्या कामातून सुमारे 82000 हायवा ट्रक गाळ ( 5 ब्रासाचा एक ट्रक यानुसार) उपसा करून तो सुपिक गाळ, माती सुमारे 6500 शेतकऱ्यांना मोफत त्यांच्या शेतात टाकण्यास दिला आहे. आजवरच्या कामातून सुमारे 110 कोटी लिटर पाणीसाठा वाढवण्यात आम्हास यश आले. शेतकऱ्यांची हजारो हेक्टर शेती सुपिक होवून त्यांची उत्पादन क्षमता वाढली. लाखो लोकांना पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध करून दिले. 12 लाख सोलापूरकरांची तहान भागवण्यात काही प्रमाणात यश मिळाल. शेतीचा पोत सुधारून शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले आहे. सुमारे 224 मजुरांना काम उपलब्ध झाले. त्यातून त्यांचे स्थलांतर थांबविले पाणवठयावर देशी – विदेशी हजारो पक्षांचे थवे येवू लागलेत. एक सुंदर पर्यटन स्थळ म्हणूनही याचा उदय होत आहे. तलावाभोवतालच्या विहिरी – बोअरवेल यांच्याही पाणीपातळीत वाढ झाली आहे. दुष्काळामुळे वर्षानुवर्षे पडीक पडलेल्या माळरानावर हिरवीगार शेती फुलत आहे. पाणी साठा वाढल्याने त्यातून उद्योगधंदे वाढीला पण चालना मिळत आहे.

जिद्द – आत्मविश्वास – प्रबळ इच्छाशक्ती प्रामाणिक काम हेतू शुध्द असेल तर किती मोठी क्रांती घडू शकते हे माझ्या सारख्या सामान्य स्त्रीने जलसंवर्धन अभियानाच्या जलचळवळी मधून दाखवून दिले आहे. काम करताना कुटुंबिय व मित्रपरीवार यांची साथ मिळणे हे खूप भाग्याचे आहे. आणि याबाबत मी खूपच भाग्यवान ठरलेय. आजची युवापिढी वाह्यात गेलेली, मोबाईलच्या आहारी गेलेली, व्यसनाच्या आहारी गेलेली असे बोलले जाते. पण मनात आणलं तर याच साधनांचा योग्य व समाज उपयोगी वापर करून आजची ही यंग जनरेशन किती मोठी क्रांती घडवू शकते हे आमच्या जलसंवर्धन अभियान च्या माध्यमातून आम्ही सिध्द केले आहे. या कामासाठी आजवर वेगवेगळया 24 पुरस्कारांनी आम्हास पुरूस्कृत केले गेले.

पाणी म्हणजे विकास व समृध्दी पाणी अडवण्यसाठी प्रयत्न व्हायला हवेत. शेतीला आधुनिक तंत्राची जोड देवून ठिबक सिंचन तुषार सिंचन यासारख्या उपाययोजनांची कास धरायला हमी. पीक समजून घेणं गरजेच आहे. शहरवासियांनी पाणी वापराबाबत गांभिर्य ठेवले पाहिजे. प्रदुषण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी रेन वॉटर हार्वोस्टिंगचा वापर जास्त प्रमाणत करणे गरजेचे आहे. जी तलाव – धरणे – विहिरी अस्तित्त्वात आहेत त्यांचे पुर्नजिवन करणे आवश्यक आहे.

अडचणी कितीही आल्या तरी चिपको आंदोलनापासून भारताच्या गावागावातील विविध आंदोलन व चळवळीत स्त्रियांचा सहभाग लक्षणिय राहिला आहे. इतिहास साक्षी आहे. जिथ जिथे स्त्रिया चळवळीत उतरल्या तिथे तिथे भरघोस यश मिळाले आहे. या पार्श्वभूमिवर आमची जलसंवर्धन अभियान ही चळवळ पण उच्च शिखर गाठेल असा विश्वास वाटतो.

Related posts

गझल, काव्य लेखन कार्यशाळा व काव्य संमेलनाचे आयोजन

देशी अन् विदेशी गायीच्या दुधातील फरक

फुलासारखं जपणं…

Leave a Comment