March 29, 2024
Know Nature speech Need of Uniformity
Home » एकरुपता साधल्यास निसर्ग ब्रह्मही बोलते
विश्वाचे आर्त

एकरुपता साधल्यास निसर्ग ब्रह्मही बोलते

वादळ येईल हे आपणास समजतही नाही किंवा त्याचे ज्ञानही होत नाही. त्याचे अनुमानही शोधून सांगता येत नाही. बऱ्याचदा त्याचे अंदाज चुकतात. पण या निसर्गाशी जेव्हा आपण एकरूप होऊ तेव्हा तो निसर्ग आपणाशी बोलू लागतो. त्याचे रुप तो दाखवतो. त्याची अनुभुती तो देतो. यासाठी निसर्गाशी एकरूप होऊन तो समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

जे ज्ञानासि न चोजवे । ध्यानासिही जें नागवें ।
तें अगोचर फावे । गोठीमाजीं ।। 16 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा

ओवीचा अर्थ – जें ज्ञानाला कळत नाही व ध्यानासहि सापडत नाही, असें जें निर्विषय ब्रह्म तें त्याच्या बोलण्यांत सापडते.

बोलणे कसे आहे यावर खूप काही अवलंबून आहे. काही लोक नुसत्या बोलण्यावर इतरांची मने जिंकून घेतात. इतरांना आपलेसे करून घेतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. तसा तो परिस्थितीनुसार बदलतही असतो. काहींना अध्यात्म आवडते तर काहींना आवडत नाही. हा ज्याचा त्याचा भाग आहे. पण काहीवेळा ते अनुभवातूनही समजते. अनुभूतीतून ते प्रकट होते. एखादा सर्वसामान्य माणूस अध्यात्मावर तज्ज्ञापेक्षाही अधिक प्रभावी बोलत असल्याची उदाहरणे आपणास पाहायला मिळतात. कारण अध्यात्म हे अनुभवायचे शास्त्र आहे.

प्रत्येकाच्या घरात नवरा-बायकोचे वाद हे होत असतात. पण त्यातही गोडवा असतो. भांड्याला भाडे लागल्यानंतर आवाज हा होणारच. तसे संसारतही दोन भांडी एकत्र आल्यावर आवाज हा होणारच. सर्व काही सुखाने सुरु असेल तर त्यात काही दिवसांनी कंटाळा वाटायला लागतो. त्या संसारात मजा येत नाही. सुखाचे महत्त्व दुःख झाल्यानंतर कळते. संसारात होणारे वादाचे प्रसंग हे खऱ्या प्रेमाची, सुखाची अनुभुती देऊन जातात. सर्वकाही शांततेत सुरू असेल तर त्या जीवनात रस वाटत नाही. थोडे दिवस सुखी वाटतात पण नंतर त्यात अस्वस्थता वाटायला लागते.

वादळ येण्यापूर्वी हवेत प्रखर उष्मा असतो अन् शांतताही असते. हा उष्मा खायला उटतो. तर शांततेमुळे बदलाची अपेक्षा मनात प्रकट होत असते. अचानक हवेत बदल होते सोसाट्याचा वारा सुटतो अन् वादळी पावसाला सुरुवात होते. या पावसाने होणारा गारवा मनाला सुखद आनंद देतो. पण वादळ-वाऱ्याने नुकसानही होते. निसर्ग नियमांच्या विरोधात गेलो तर नुकसान हे होणारच. निसर्गाशी स्पर्धा करून चालत नाही. त्याच्याशी लढा देऊन काहीही मिळत नाही तर त्याच्याशी एकरूप व्हायला हवे. तो निसर्ग समजून घ्यायला हवा. निसर्गाशी लढत राहीला तर ती लढाई कधीच संपणारी नाही. सतत लढतच राहावे लागेल पण त्याला समजून घेऊन त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला तर तो आपणाशी सुखकारक वाटेल. त्याच्या रौद्र रुपातही सौंदर्यही वाटू लागते. वादळ येईल हे आपणास समजतही नाही किंवा त्याचे ज्ञानही होत नाही. त्याचे अनुमानही शोधून सांगता येत नाही. बऱ्याचदा त्याचे अंदाज चुकतात. पण या निसर्गाशी जेव्हा आपण एकरूप होऊ तेव्हा तो निसर्ग आपणाशी बोलू लागतो. त्याचे रुप तो दाखवतो. त्याची अनुभुती तो देतो. यासाठी निसर्गाशी एकरूप होऊन तो समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा.

माणसाच्या बोलण्यातून त्याचा स्वभाव कसा आहे हे समजते. त्याच्या मनात कोणते विचार सुरू आहेत हे समजते. अनेकदा गुन्हेगारांच्या आवाजावरून त्याने गुन्हा केला आहे की नाही हे ओळखले जाते. जो निर्दोष असतो त्याला कशाचीही भिती नसते त्याचा आवाज फरक पडत नाही. पण गुन्हेगाराच्या आवाजात फरक जाणवतो. बोलण्यातून माणसाच्या मनाचा ठावठिकाणा समजतो. बोलण्यातून हे प्रकट होत असते. पण समोरचा अभिनय करत असेल तर मात्र आपण त्यात फसतो. ही फसवणूक ही मोठी असते. अभिनय करून दुसऱ्याला अंधारात ठेऊ शकता. त्याने शोधण्याचा प्रयत्न केला तरीही त्याला तुम्ही सापडला नाही. तरी तुमच्या बोलण्यावरून तो तुमचा अभिनय ओळखू शकतो.

अध्यात्मातही असेच आहे. जरी ज्ञान झाले नाही. ध्यानातही तो सोहमचा स्वर सापडला नाही. तरी तो स्वर तुमच्या बोलण्यातून प्रकट होतो असतो. त्याची अनुभुती बोलण्यातून प्रकट होत असते. यासाठी त्या ब्रह्माशी एकरूप होण्याचा प्रयत्न आपण करायला हवे. ध्यानतही एकरूपता साधली नाही किंवा त्याचे ज्ञान झाले नाही तरी त्याची एकरुपता आपल्या बोलण्यात प्रकट होते हा विश्वास ठेऊन कार्यरत राहायला हवे. सतसंग हा यासाठीच आहे. शुद्ध विचारातून मनाची शुद्धता साधायची असते. कारण ती आपल्या कृतीतून, वागण्यातून, बोलण्यातून प्रकट होते.

Related posts

कुठे चुकतेय का ?

ज्ञानदानाच्या प्रसादाने तृप्ती

रक्तातही प्लास्टिक

Leave a Comment