संपूर्ण कादंबरी लेखकाने मराठवाडी बोलीभाषेत लिहिली असूनही ती वाचताना कुठेही अडल्यासारखे होत नाही, हे लेखकाचे यश म्हणायला हवे. ढसर, डेंग डेंग, निपटार असे तिकडील अनेक शब्दही वाचायला मिळतात. एकूण ही कादंबरी सद्य:स्थितीचे वास्तव दर्शन घडविणारी संवेदनशील मनाला विचार करायला लावणारी आहे.
अशोक बेंडखळे
भटक्या-विमुक्त समाजावर लेखन करणारे अशोक पवार एक कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. याअगोदर ‘बिराड’ हे आत्मकथन आणि पडझड, यळनमाळ, दर कोस दर मुक्काम आणि ‘तसव्या’ अशा वेगळ्या विषयावरील त्यांच्या कादंबर्या प्रसिद्ध झाल्या आहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘भुईभेद’ या कादंबरीत त्यांनी वेगळा विषय मांडला आहे. वेगळ्या विश्वाचं दर्शन घडविले आहे. या कादंबरीत लेखकानं सुशिक्षित बेरोजगारांचे, तासिका तत्त्वावरच्या प्राध्यापकांचं कटे कंगाल जगणं आणि राजकारणी शिक्षण सम्राटांनी निर्माण केलेल्या शिक्षण संस्था या तरुण प्राध्यापकांचे करीत असलेले शोषण दाखवलं आहे, तसेच खेड्यातील वयोवृद्ध लोकांचं, बकाल होणार्या गावखेड्यात कंगाल शेतकर्यांचं, कवी-लेखकांचं, माय-बापाचं, गावातील भ्रष्टाचारी तथाकथित लीडर लोकांचं, पती-पत्नीचं भ्रष्टाचाराचं, व्यसनाधीनतेचं, मोडत चाललेल्या लोकांचं आणि बेबाक झालेल्या शेतकरी-पाटीलकीचं आजचं भयावह जगणं मांडलं आहे.
दगडवाडी या खेड्यात राहून एम. ए. पर्यंत शिकलेला आनंदा रामा कोंबडे हा या कादंबरीचा नायक आहे. त्याच्या निवेदनातून या कादंबरीची कथा उलगडत जाते. त्याच गावातील एम. ए. पीएच.डी.पर्यंत शिकून खेडुतांसाठी, गावाच्या विकासासाठी झटणारी अनिता तुकाराम दाभाडे या कथेची नायिका. कादंबरीचा नायक परिस्थितीमुळे पराभूत झालेला आहे, तर नायिका आपल्या कर्तृत्वाने यशस्वी झाली आहे. या दोघांच्या कथांमधून शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार तसेच जिद्दीने, मेहनतीने खेडेगावचे दारुण चित्र कसे बदलता येते, ते लेखकाने दाखवले आहे. या मुख्य कथानकाबरोबर खेडेगावातील वयोवृद्ध लोकांचं जगणं, शेतकर्यांच्या आत्महत्या, व्यसनाधीनता, रोजगार हमी योजनेतील वास्तवही समोर येतं. कादंबरीच्या मुख्य कथानकाकडे जाण्यापूर्वी गावातील खेडुतांच्या कथा आजच्या परिस्थितीवर बोट ठेवणार्या आहेत.
भुर्या भगत हा पंचक्रोशीतला नावाजलेला वैद्य. तो सर्वांचा इलाज फुकट करणारा. त्याची कर्मकहाणी तो सांगतो. त्याने मुलाला शिकवलं, साहेब बनवलं, त्यानं जिंतूरला घर बांधायला काढलं आणि वडिलांना गावचं वावर, घर विकायला लावलं. त्याच्या घरी तो आई – वडिलांना वाईट वागणूक देऊ लागला. शेवटी ते कंटाळून परत गावी येतात आणि झोपडी बांधून राहू लागतात. ज्ञानेश्वर पाटील यांची आणखी वाईट कथा. त्यांनी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून चार पोरींची झोकात लग्नं केली. शेतात दोन-तीन वर्षे काही पिकलं नाही. कर्जाचा तगादा कंपनीने लावला. लोकांमध्ये त्यांची नामुष्की होते म्हणून त्यांनी वावरात जाऊन झाडाला फाशी लावून घेतली.
पोलीस आले आणि त्यांनी ग्यानाला खूप बदडला. लोकांनी पोलिसांना पळवून लावले; पण पोलीस परत मोठी फौज घेऊन आले आणि त्यांनी गावात धिंगाणा केला. बायका-पोरींवर अत्याचार केले. सगळे खेडूत आडगावला येतात आणि कांबळे लीडरला भेटतात. या भ्रष्टाचारी लीडरने या साध्या लोकांना चांगले गोत्यात आणले. कंगाल बँकवाल्यांनी अनेक गावकर्यांना कर्ज दिले होते. त्यात तुकाराम दाभाडे होता. तुकाराम आपले कर्ज काही परत करू शकला नाही. तो बायको, मुलगी अनिता आणि मुलगा संभ्या यांना घेऊन सरळ मुंबईला गेला. मुंबईला कामाला जातो. पैसा कमावून आणतो आणि कर्ज फेडतो, असे म्हणून त्याने गाव सोडले. माणिकही आपल्या वृद्ध बापाला गावच्या हवाली करून बायका-मुलांसह मुंबईला कामधंद्यासाठी जातो. आठ दिवसांत माणिकचा बुढ्ढा खंडू मरतो. त्याला फोन केल्यावर तो म्हणतो, “म्या, मुंबईला आठ दिवस अगोदरच आलो. जवळ एक ध्येला नाही. कामही नाही. तिकिटाला पैसा नाही. तुम्हीच निपटून टाका.”
कोंबड्या विकणार्या किसन पाटीलची अशीच कथा. त्याने शेती विकून पैसा भरून दोन मुलांना नोकरी लावली आणि किसन भूमिहीन झाला. त्यांचा मुलगा आई-वडिलांना उपाशी ठेवू लागला. 20 हजार देऊन घेतलेल्या कुत्र्याला स्पेशल खोली; परंतु आई-वडील जेवले का, याची काळजी नाही. एके दिवशी पाहुण्यांसमोर लाज वाटते म्हणून त्यांना कोंडून ठेवले. शेवटी किसन पाटील बायकोसह गावाकडे आले. अशा या गावकर्यांच्या मन हेलावणार्या दर्दभर्या कहाण्या आनंदाचे वडील रामा कोंबडे पहिली शिकल्यामुळे सही करणारा गावातील एकमेव खेडूत त्यांच्याकडे थोडी शेती होती; पण पाऊस नसल्यामुळे काही पिकायचे नाही, त्यामुळे वडील कोंबड्या-शेळ्या पाळू लागले. बाजारात जाऊन विकू लागले. आईही गोंद वेचायचे काम करायची. या आधारावर आनंदाचे शिक्षण होत होते. मुलानं चांगलं शिकून नोकरी करावी, गावात बंगला बांधावा, ही आई-वडिलांची इच्छा होती. आनंदाही समजूतदार मुलगा होता. ‘एमए’ पास झाला आणि नोकरीच्या शोधात फॉर्म भरू लागला. मुलाखत देत होता. त्याला ‘एमए’ आणि ‘नेट’ परीक्षेत चांगले मार्क्स असूनही दुसर्याच उमेदवाराचा नंबर लागायचा. वडील एकदा म्हणाले, “लखपत्याची पोरगी कर. सासर्याकडून हुंडा नको; पण नोकरीसाठी पैसे भरायला लावू.” पैशाबिगर प्राध्यापकाची नोकरी लागत नाही, हे जेव्हा आनंदाच्या लक्षात येतं, तेव्हा तो एकनाथ पाटलांची मुलगी माधुरीशी लग्न करायला तयार होतो. पाटील संस्थेच्या अध्यक्षांकडे चार लाख देतात आणि जिंतूरच्या कॉलेजमध्ये आनंदाला प्राध्यापकाची नोकरी लागते; पण नोकरी टेम्पररी असते आणि तिथून आनंदाची कर्मकहाणी सुरू होते.
माधुरीबरोबर लग्न होते; पण ती छोट्या खोलीत राहायला तयार होत नाही. पुढे संस्थेचे अध्यक्ष आणखी दोन लाखांची मागणी करतात. आनंदाचे वडील त्यांची एक किडनी विकून ते पैसे भरतात. तरीही नोकरी कायम झाली नाही. आता सासर्यांनी त्यांचे चार लाख रुपये परत मागायला सुरुवात केली. माधुरीनेही फारकत घेतली. एकूण आनंदाच्या आयुष्याचा धिंगाणा झाला. तुकाराम दाभाड्यांच्या, अनिताच्या जिद्दीची वेगळी कहाणी समोर येते. ज्या अनिताला आनंदाने ती गरीब म्हणून नाकारलं. ती एमए पीएचडी शिकून मानव मुक्तीचे काम करायला आपल्या गावी आडगावला येते. तिच्या आई-वडिलांची दृष्टी गेली होती, त्यांनाही ती सांभाळत होती आणि गावाचा कायापालट करण्याच्या मागे लागली होती. आनंदाने आयुष्याला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. जिंतूरच्या खोलीत गळ्यात लुंगीचा फास टाकून डबा लोटणार, तोच अनिता त्याच्या खोलीवर येते आणि त्याला समजावते.
सिद्धांताने चालायचे, असे सांगून गावाला येण्याचा सल्ला देते. आनंदा गावी येतो. अनिताने गावात पाण्याची मोठी टाकी लिफ्ट इरिगेशनने आणली होती. वावरं हिरवीगार करून टाकली होती. वयोवृद्ध माणसांकडून तिने काम करून घेतली. त्यांना मानसन्मान मिळवून दिला. गाव स्वयंपूर्ण बनविले. गावात लोकांसाठी समाज मंदिर उभारलं. वाचनालय सुरू केले. वाचनालयात रात्रीपर्यंत मुले अभ्यास करू लागली. गावच्या अशा सुधारणांमुळे गाव सोडून पोट भरायला शहरात गेलेले लोक गावात परत येऊ लागले. प्रत्येक जण परिसर स्वच्छ ठेवू लागला. बचतगट तयार झाले. गावात गाव फंडं योजना आली. दारू पिणारे, तंबाखू-बिडी ओढेल त्याला विरोध होऊ लागला. टमरेल घेऊन जाणार त्याला घरचे लोकच रोखू लागले. अनिता गावचा कायापालट करीत होती. वृद्ध मंडळींमध्ये हिम्मत निर्माण करत होती. मात्र, ब्लड कॅन्सर या असाध्य रोगाने ती डाव अर्धवट सोडून जाते. आता आनंदा ज्या भ्रष्टाचारामुळे आपला बळी गेला, त्याविरुद्ध लढण्याचे ठरवितो आणि सायकल रॅली गावोगावी नेण्याची व्यवस्था करतो. या सकारात्मक दृष्टिकोनावर कादंबरी संपते.
कादंबरीत समाजातल्या काही किळसवाण्या प्रवृत्तींचे दर्शन लेखकाने घडविले आहे.
दुष्काळ पडला की, सरकारतर्फे रोजगार हमीची कामे सुरू होतात. दगडवाडीतही कामे सुरू होतात. इथं राजरोस भ्रष्टाचार चालतो, त्याचे दर्शन घडते. चौकीदार पुर्या रोजीवर मजुरांचे अंगठे घेतो आणि अर्धीच रोजी त्यांना देतो. कुणी आवाज केला तर त्याला कामावरून कमी केले जाते. आडगावचा कांबळे लीडर असाच भ्रष्टाचारी, भिंतीवर शिवाजी महाराजांचे अनेक नेत्यांचे फोटो लावतो आणि काम करण्यासाठी सरळ सरळ पैशांची मागणी करतो. सर्व पक्षांच्या पुढार्यांची चांगले संबंध ठेवून समतेचे पालन करीत असतो.
प्राचार्य मनोहर पाटील संस्थेच्या अध्यक्षांच्या विधवा बहिणीशी लग्न करून प्राचार्य पद मिळवतात. भाषणात फुले-आंबेडकरांचे विचार मांडतात. नीतिमत्ता सांगतात आणि आपल्या गरीब विद्यार्थ्याला नोकरीसाठी चार लाख अध्यक्षांना देण्याचे निर्लज्जपणे सुचवतात. संस्थेचे अध्यक्ष तर वरकरणी शिवाजी महाराज-महात्मा फुले यांना मानणारे मात्र गरीब विद्यार्थ्यांकडून प्राध्यापकाच्या नोकरीत पर्मनंट करण्यासाठी दिवसाढवळ्या लाखोंची लाच घेतात. अण्णा हजारे सोबत त्यांचा फोटो आणि खाली ‘भ्रष्टाचार थांबवा, देश वाचवा’ हे लिहिलेले केवळ लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी.
संपूर्ण कादंबरी लेखकाने मराठवाडी बोलीभाषेत लिहिली असूनही ती वाचताना कुठेही अडल्यासारखे होत नाही, हे लेखकाचे यश म्हणायला हवे. ढसर, डेंग डेंग, निपटार असे तिकडील अनेक शब्दही वाचायला मिळतात. एकूण ही कादंबरी सद्य:स्थितीचे वास्तव दर्शन घडविणारी संवेदनशील मनाला विचार करायला लावणारी आहे.
पुस्तकाचे नाव – भुईभेद
लेखक – अशोक पवार
प्रकाशन – संधिकाल प्रकाशन
मुखपृष्ठ – सुनील यावलीकर
पृष्ठे – २८८, मूल्य – ३००रुपये
पुस्तकासाठी संपर्क ०९८२०५ ९५२८२
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.