March 29, 2024
powari-boli-and-powari-community-after-globalization-article-by-lakhansingh-katre
Home » जागतिकीकरणानंतरच्या पोवार समाजाचे अन् पोवारी बोलीचे वास्तव
विशेष संपादकीय

जागतिकीकरणानंतरच्या पोवार समाजाचे अन् पोवारी बोलीचे वास्तव

जागतिकीकरणानंतरचे पोवार समाजाचे व त्यांच्या पोवारी बोलीचेकोणतीही बोली ही फक्त संभाषण, संप्रेषण, कम्युनिकेशन पुरतीच मर्यादित नसून तिच्याद्वारे त्या-त्या बोली-बोलकांच्या सांस्कृतिक, आनुवंशिक, सामाजिक इतिहासाचे रक्षण व संवर्धन सुद्धा होत असते. त्यामुळे त्या-त्या बोली-बोलकांना/अभ्यासकांना आपापली बोली टिकविणे व तिचे संवर्धन करून तिचे लिखित स्वरूपात जतन करणे आवश्यक व अनिवार्य वाटू लागले. अगदी अशीच स्थिती पोवारी/पवारी(?)/पंवारी बोलीच्या बोली-बोलकांना/अभ्यासकांना सुद्धा भेडसावू लागली व या बोलीच्या संवर्धन, विकसन, लेखन (लिपीबद्ध), संकलनासाठी पोवारी-बोली-बोलक/अभ्यासक जागृत झाले.

ॲड.लखनसिंह कटरे

बोरकन्हार(झाडीपट्टी)
ता.आमगांव, जि.गोंदिया 441902,

मुख्यतः मध्यप्रदेश, महाराष्ट्र (विदर्भ), राजस्थान(अंशतः) या भागात वसलेल्या अल्पसंख्य पोवार/पंवार समाजाबद्दल इतर समाज बांधवात भरपूर गैर, भ्रामक व अपसमज आहेत. या पोवार समाजाची आपली एक वेगळीच प्राचीनतम बोलीभाषा असून तिला पोवारी/पंवारी/पवारी(?) बोली या नावाने ओळखले जाते. ही बोली अजूनही ध्वनीनिष्ठ/ध्वनीबद्धच असून आता हळूहळू तिला लिपीनिष्ठ/लिपीबद्ध करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

महाराष्ट्रातील विदर्भ भागातील गोंदिया, भंडारा, तथा अंशतः नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यात पोवार समाज मुख्यतः नद्यांच्या सान्निध्यात वसलेला आढळून येतो. पोवार समाजाची प्राचीनतम पोवारी बोली सध्या लुप्तप्राय होत असल्याचे आढळून येते. शिक्षण, नोकरी, व्यवसाय या निमित्ताने मूळ शेती या आतबट्ट्याच्या व्यवसायातून हा समाज काहीसा तुटत शहरवासी होऊ लागल्याने व आपली पोवारी बोली बोलायला संकोच वाटत असल्याने शहरवासी झालेल्या पोवार समाजातून पोवारी बोली हळूहळू हद्दपार होत चालली आहे. म्हणजे ही बोली टिकविण्याची मुख्य जबाबदारी ज्यांनी उचलणे आवश्यक होते, तेच शिक्षित कुटूंब या बोलीपासून दूर जात असल्याची दुर्दैवी बाब लक्षात आल्यावर तिच्या संरक्षण, विकासाची चिंता काही अभ्यासकांना जाणवू लागली. आणि अशा अभ्यासकांनी स्वतः पुढाकार घेऊन पोवारी बोली विषयक न्यूनगंड दूर करण्यासाठी प्रयत्न आरंभिले. अशा अभ्यासकांमध्ये डाॅ. ज्ञानेश्वर टेंभरे, जयपालसिंह पटले सारख्या नागपूर निवासी झालेल्या पण मूळचे ग्रामवासी असलेल्या तथा लखनसिंह कटरे, देवेंद्र चौधरी सारख्या सद्यकालीनही ग्रामवासीच असलेल्यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

भाषा ही सर्व प्रकारच्या विकासाला कारणीभूत असते. कोणत्याही समाजाची बोली-भाषा ही त्या समाजाच्या इतिहास, संस्कृती, रिती-रिवाज, पर्यावरण, समाजकारण; यांची प्रत्यक्ष वाहक व साक्ष असते. पर्यायाने आजच्या या युगात आपापल्या “मूळाकडे पाहण्याच्या” दृष्टीने बोलीचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात आल्याने तिच्या अस्तित्वरक्षणासाठी व संवर्धनासाठी जागरूक समाज-मन व जन सज्ज झाले आहेत. भारतीय अर्थकारण, राजकारण, समाजकारण, साहित्यकारण, विचारपद्धती व ग्राहक व्यवस्थेवर सकारात्मक/नकारात्मक असे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष परिणाम आणि प्रभाव पाडणाऱ्या उजाखा (उदारीकरण, जागतिकीकरण व खाजगीकरण)च्या प्रभावाला व अस्तित्वाला कोणालाही नाकारता येत नाही.

तथापि १९९१ नंतरच्या या संथ बदलाचे परिणाम व प्रभाव प्रारंभी “विशेष न जाणवणारे” असे राहिल्याने सुमारे २000 पर्यंत या बदलांची विशेष अशी दखल साहित्य क्षेत्रात व पर्यायाने भाषा व बोली क्षेत्रात प्रामुख्याने घेण्यात आल्याचे दिसत नाही. परंतु २००० नंतर हे बदल प्रत्येक भारतीयाच्या अंगावर, मनावर, इच्छेवर, विचारपद्धतीवर अगदी जोमाने आदळू लागल्यावर त्याचा प्रभाव व परिणाम प्रत्येकच भारतीय भाषेतील साहित्यावर जाणवू लागला. अशा या संक्रमण अवस्थेत बोलींचे भवितव्य काय, हा प्रश्न प्रत्येक बोली-बोलीभाषीकांना व त्याच्या अभ्यासकांना भेडसावू लागला.

कारण कोणतीही बोली ही फक्त संभाषण, संप्रेषण, कम्युनिकेशन पुरतीच मर्यादित नसून तिच्याद्वारे त्या-त्या बोली-बोलकांच्या सांस्कृतिक, आनुवंशिक, सामाजिक इतिहासाचे रक्षण व संवर्धन सुद्धा होत असते. त्यामुळे त्या-त्या बोली-बोलकांना/अभ्यासकांना आपापली बोली टिकविणे व तिचे संवर्धन करून तिचे लिखित स्वरूपात जतन करणे आवश्यक व अनिवार्य वाटू लागले. अगदी अशीच स्थिती पोवारी/पवारी(?)/पंवारी बोलीच्या बोली-बोलकांना/अभ्यासकांना सुद्धा भेडसावू लागली व या बोलीच्या संवर्धन, विकसन, लेखन (लिपीबद्ध), संकलनासाठी पोवारी-बोली-बोलक/अभ्यासक जागृत झाले. अशातच या इतिहास-प्रसिद्ध पोवारी/पंवारी/पवारी(?) बोलीच्या “नावा”बद्दल काही भ्रम सुद्धा उद्भवू लागले.

पोवारी नाव कसे पडले ?

वस्तूतः महाराष्ट्रात या बोलीवर मराठी, झाडीबोली, गोंडीबोली यांच्या संगतीचा स्वाभाविक अभिसरण होऊन तिला “पोवारी” असे नाव पडले तर मध्यप्रदेशात हिंदीच्या संगतीने तिला “पंवारी/पवारी(?)” असे नाव पडले. एकंदरीत या बोलीच्या “नावा”वर “संगतीचा परिणाम”(?) व्हायचा तो झालाच. सारांशाने म्हणावयाचे म्हणजे पोवारी/पंवारी/पवारी(?) ही नावे स्थलभेदामुळे वेगळी-वेगळी वाटत(?) असली तरी ती एकाच बोलीची “नावे” आहेत, हे स्पष्ट व्हावे.

महाराष्ट्रातील गोंदिया, भंडारा व काहीसा चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांत तथा नागपूर जिल्ह्यातील रामटेक, मौदा तसेच वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील काही भागातील काही मोठ्या गावांमध्ये पोवार मालगुजार व पाटील असल्याने त्या-त्या गावात दुसऱ्या समाजातील लोकं सुद्धा पोवारी बोलीचा सर्रास वापर करीत करतात, असे आढळून येते. अशीच वस्तुस्थिती मध्यप्रदेशातील बालाघाट, शिवनी, छिंदवाडा व बैतूल जिल्ह्यातही पहावयास मिळते. म्हणजेच पोवारी बोली ही फक्त पोवार समाजापूरती मर्यादित न राहता पोवार-बाहुल्य गावातून पोवारी बोलीला लोक-बोलीचे रूपही मिळाले होते, असेही आढळून येते.

या ऐतिहासिक पोवारीबोलीचा उगम कसा झाला याचे निदान संशोधक करतीलच, तसे संशोधन सुरू सुद्धा आहे. वास्तविकरित्या कोणतीही बोली ही “ध्वनीनिष्ठ” असते तर प्रमाण भाषा ही “लिपीनिष्ठ” असते. आणि त्यामुळेच बोलींना जेव्हा जेव्हा लिपीबद्ध करण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा ‘लिपीची मर्यादा’ त्यासाठी अडसर ठरू लागते व बोलीचा इतिहास शोधणे दुष्कर होऊन बसते.

बोली आणि प्रमाण भाषा यांच्या आंतरसंबंधाबद्दल तज्ज्ञांची मते

“प्राचीन काळी संस्कृत भाषेत ‘व्याख्या’ या शब्दासाठी ‘भाषा’ शब्दाचा उपयोग होत असे. पण ‘भाषा’ या शब्दात एक लपलेला अर्थ आहे, तो म्हणजे ‘आवाज, ध्वनी’. खास करून केवळ लिपी असणाऱ्या बोलीसच भाषा समजण्याच्या दहशतवादी प्रवृत्तीस शह द्यायचा असेल तर भाषा म्हणजे बोली किंवा बोल – अर्थात ‘आवाज’ मानणेच सयुक्तिक होईल.”

गणेश देवी

जागतिक किर्तीचे तत्वज्ञ, भाषाशास्त्री

“भारतीय भाषांचा मूळस्रोत त्या भाषांच्या अंगणात व परसघरात आहे. पण ह्याही पलीकडे जाऊन असे स्वीकारले पाहिजे, की मान्य भाषांच्या अस्तित्वाची व प्रगतीची गुरुकिल्ली पोटभाषांच्या (बोलींच्या) हाती आहे.”

यू. आर. अनंतमूर्ती

कन्नड कादंबरीकार

यावरून बोलींचे व बोली टिकवून ठेवण्याचे महत्व किती परमावश्यक आहे, हे स्पष्ट व्हावे.

गणेश देवी यांचे यासंबंधीचे (भाषा व पोटभाषा/बोली संबंधीचे) विचार येथे पुन्हा उद्घृत करावेसे वाटतात. ते म्हणतात, “मानवी उत्क्रांतीतील कितीतरी गोष्टी अशा आहेत, की ज्यांविषयी कोणतेही शास्त्रीय विधान करणे अशक्य बनावे. त्यासंबंधी केवळ ठोकताळे बांधता यावेत आणि तेही असे की थेट त्यांच्या विरुद्धचे ठोकताळेही तेवढेच तर्कशुद्ध वाटावेत. भाषा या सामाजिक संस्थेची सुरुवात, तिच्या उद्भवाची नेमकी कारणे, तिच्या सुरुवातीच्या जडणघडणीतील घटनाक्रम हे उत्क्रांतीच्या ग्रंथातील सुरुवातीच्या व अस्पष्ट अक्षरांत लिहिलेल्या पानांप्रमाणे आहेत.”

ते पुढे म्हणतात की, “विश्वाची उत्पत्ती होत असताना कोणत्या प्रकारचा ध्वनी निर्माण झाला होता किंवा नाही, ह्यासंबंधी मत व्यक्त करणे शक्य असले तरीही ते मत सिद्ध करणे अशक्य आहे. ईश्वर अपौरुषेय आहे किंवा नाही यावर मत व्यक्त करण्यासारखेच तेही मत केवळ तत्त्वज्ञानात्मक तर्कसिद्धांताच्या स्वरूपाचे राहील. मानवाला व मानवाआधीच्या इतर प्राणिमात्राला, ध्वनिसंवेदन प्राप्त होण्याआधी, ध्वनी निर्माण झाला होता किंवा नाही हेही निश्चित करणे अशक्य आहे. अतीन्द्रिय अनुभवातून ऐकू येणारा सततचा ध्वनी – अनाहत नाद आणि स्वरयंत्रातून श्वास तोडून–जोडून बनविलेला ध्वनी हे दोन्ही एकाच प्रवृत्तीचे असतात किंवा नाही हे सांगणेही कठीण आहे. शिवाय अर्थव्यवहारासाठी (येथे आर्थिकव्यवहार अपेक्षित नसून शब्दार्थव्यवहार ध्वनित आहे) केवळ ध्वनीनियंत्रणाचाच मार्ग मनुष्यप्राण्याने का निवडला, डोळ्यांची भाषा विकसित करून अर्थ – व्यवहार करण्याची क्षमता उपलब्ध असतानाही ती पूर्णपणे विकसित का केली नाही, हे सारे प्रश्न जरी विचारता आले तरीही त्यांची उत्तरे केवळ तर्काच्यापलीकडे नीटशी स्पष्टपणे मांडता येत नाहीत.” हे थोडेसे लांबलेले उद्-घृत, बोलीविषयक अभ्यासाचे व बोलीच्या जतनाचे महत्व तथा बोलीचे भाषाव्यवहारातील स्थान- महात्म्य स्पष्ट करीत असल्याने हे धाडस केले आहे.

पोवारी बोली संदर्भातील काही ऐतिहासित तथ्य

यासंदर्भात पोवारी बोलीचा विचार करताना काही ऐतिहासिक तथ्य सुद्धा विचारात घ्यावे लागतात हे स्पष्ट आहे. त्या अनुषंगाने इ.स.१०१० ते १०५५ या कालावधीदरम्यान होऊन गेलेले सम्राट राजा भोज हे पोवार समाजाचे प्रमुख पूर्वज असून ते स्वतः संस्कृतादि भाषांचे विद्वान होते, ते एक उत्कृष्ट व अपराजित शासकच नव्हे तर विविध विद्वत्तापूर्ण ग्रंथांचे कर्ते होते, त्यांच्या दरबारात उत्कृष्ट लेखकांची/विद्वानांची “हजेरी” असायची, हे ऐतिहासिक तथ्य लक्षात घेऊन ते आजच्या घडीला या पोवारी बोलीचे मुख्य प्रवर्तक मानल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे सम्राट राजा भोज यांच्या बृहद अशा राज्यपरिसरातील मालवा, धार या भागातील भाषिक व बोलीक संस्कृतीचे संस्कार या पोवारीबोलीवर असणे स्वाभाविकच आहे. म्हणूनच या बोलीत आज इतक्या संक्रमणानंतरही मारवाडी, राजस्थानी, गुजराती, मालवी, निमाडी, आदि भाषा/बोलींचे अंश सापडतात.

अकराव्या–बाराव्या शतकातील व त्यानंतरच्या मुस्लिम वंशीय आक्रमकांच्या आक्रमणानंतर तसेच नागपूर परिसरातील तत्कालीन परमार(पोवार) राज्यकर्त्यांच्या आगमनानंतर पोवार समाजात दीर्घकालीन स्थलांतराची प्रक्रिया घडून हा पोवार समाज वैनगंगा, वाघ, पांगोली नद्यांच्या सुपीक प्रदेशात स्थायिक झाला. शिवाय राजा जगदेव यांच्या नगरधन (रामटेक) येथील राज्य स्थापनेनंतर सुद्धा पोवार समाजातील योद्ध्यांचे विदर्भात स्थलांतर झाले व बदलत्या समयानुकुल या पोवार समाजाने तलवार त्यागून नांगर हाती धरला. या कामी गोंडवन भागातील गोंड राजांनी पोवार समाजाला जमीनदारी, मालगुजारी देऊन त्यांना शेतीसाठी जंगल/जमीन उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका निभावल्याचे आजवरच्या प्राथमिक संशोधनातून निष्पन्न होत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड किल्ला आणि पोंभुर्णा/गोंडपिपरी येथील संशोधन सुद्धा या पोवार समाजाच्या विदर्भातील तत्कालीन अस्तित्वाची साक्ष देतात. शिवाय मराठा/नागपूरकर भोसले यांच्या कालावधीत सध्याच्या गोंदिया जिल्ह्यातील कामठा या तत्कालीन परगण्याचे तत्कालीन प्रमुख चिमणाजी बहेकार यांच्या नेतृत्वाखाली पोवार योद्ध्यांनी कटक-युद्धात बजावलेल्या जबरदस्त कामगिरीने खुश होऊन त्या-त्या पोवार योद्ध्यांना मालगुजारी/जमीनदारी देण्यात आली, असेही काही इतिहासकारांचे निदान आहे.

पुरातन बोलीपासून संस्कृत

जागतिकीकरणाच्या या “उठ, जा आणि खा!” (उजाखा*) च्या युगात अचानकच प्रत्येक मानव – घटकामध्ये आपले मूळ शोधण्याची प्रेरणा कशी काय जागृत झाली, हा संशोधनाचाच विषय ठरावा. मात्र आनंदाची व कदाचित आश्चर्याची सुद्धा बाब म्हणजे या प्रेरणेने विविधतेचा दुस्वास न उमलता विविधतेतील एकता शोधण्याची प्रक्रिया सुद्धा मानव-घटकात अनायासेच कार्यान्वित झाली असल्याचे दिसून येते. त्या दृष्टीने विचार करता अशाच एका झाडीबोलीच्या एका संशोधक/अभ्यासकाचे मत या प्रकरणी विचारार्ह ठरते. त्यानुसार झाडीबोली ही मराठी भाषेची आजीच मानली जावी असे त्यांचे प्रतिपादन आहे. कारण संस्कृत ही सर्व आधुनिक भाषांची जननी मानली तर संस्कृत ची जननी, जी मूळ बोली/झाडीबोली, ही त्या आधुनिक भाषांची आजीच होणार ना ! वस्तूतः संस्कृत ही काही स्वयंस्फूर्त/स्वनिर्मित भाषा नव्हे. म्हणजे संस्कृत ही संस्कारित भाषा कोणत्यातरी पुरातन बोलीपासून/बोलीतून तयार (!) झाली हे स्पष्टच आहे. आणि झाडीबोलीचे कूळ व मूळ अजूनतरी कोणालाही शोधता आले नसून झाडीबोलीतील खूप सारे शब्द मात्र संस्कृतात थोड्याबहुत फरकाने जसेच्या तसे स्वीकारले/वापरले गेले असल्याचे झाडीबोलीच्या या संशोधक/अभ्यासकाचे निष्कर्ष आहेत.

पर्यायाने झाडीबोली —> संस्कृत –> मराठी या क्रमाने झाडीबोली ही मराठीची आजी लागते, असा त्या संशोधकाचा आढावा आहे. अशाच प्रकारे पोवारी बोलीचे सुद्धा कूळ व मूळ अजूनही शोधले गेले नसल्याने पोवारी बोली सुद्धा संस्कृतची आई/मावसी(?)च शोभावी! या संदर्भात एका पौराणिक मिथकाची हकीगत अशी की, परशुरामाने काही विशिष्ट कारणांमुळे क्रोधप्रवण होऊन संपूर्ण पृथ्वी निःक्षत्रिय करण्यासाठी एकवीस वेळा तत्कालीन क्षत्रियांची सरसकट कत्तल केली. तेव्हा समाजात राजाअभावी माजलेल्या अनागोंदी, अराजक, भयावह स्थितीने आतंकित, भयकंपित व आशंकित होऊन ऋषी वशिष्ठ यांनी क्षत्रिय-उत्पत्ती साठी यज्ञ करून त्या यज्ञाग्निमधून चार क्षत्रिय वीर उत्पन्न/निर्माण(!) केले. यज्ञातून उत्पत्ती झाल्याने त्यांना “अग्नीवंशी क्षत्रिय” असे संबोधिले गेले. त्या चार वीरांपैकी एक महावीर म्हणजे पोवारांचा सर्वप्रथम पूर्वज, परमार किंवा प्रमार असे त्याचे तत्कालीन सर्वसमावेशक नामाभिधान! या परमार/प्रमार चा अपभ्रंश होता होता अखेर पोवार/पंवार/पवार(?) हे नाव काळाच्या अंगणात स्थिर झाले. तर या तत्कालीन परमार/प्रमारांची बोली/भाषा म्हणजेच आजची ही संस्कारित पोवारी/पंवारी/पवारी(?) बोली होय. असे हे पौराणिक मिथक लक्षात घेता पोवारी बोलीचे कूळ व मूळ शोधणे कसे व किती दुष्कर आहे हे स्पष्ट होऊन गणेश देवी यांचे यासंबंधीचे मत किती सयुक्तिक व प्रासंगिक आहे हे सुद्धा स्पष्ट होते.

पोवार समाजाचा उद्गम

शिवाय डाॅ. दशरथ स्वामी यांच्या संशोधनपर लिखाणाचे (अग्निपुराण, पंवार वंश) अवलोकन केले असता असे दिसून येते की, सम्राट अशोकाच्या अहिंसात्मक बौद्धधर्म प्रसाराच्या परिणामांमुळे त्याच्या पूत्र-पौत्रांच्या राज्यकालावधीत (इ.स.पूर्व 232 – 215) युद्धाशिवाय राज्य टिकविणे असंभव झाल्याच्या काळात लढवैय्या व योद्धा असलेल्या पोवार समाजाचा उद्गम झाला असावा, असा कयास वर्तवण्यात येतो. यावरूनही वर नमूद केलेले श्री.गणेश देवी यांच्या यासंबंधीच्या मताची महतीच अधोरेखित होते.

पोवार समाज शिवपुजक

पोवार समाजात प्रारंभी मूर्तीपूजा अस्तित्वात नव्हती असे दिसून येते. देवघरात एक, पुढच्या बाजूला अतिलघु चौकोन चिकटलेला थोडासा मोठा मातीचा चौकोनी बोहोला ( ओटा ) व अंगणात दुसरा तसाच मातीचाच चौकोनी बोहोला, एवढेच पोवार समाजाचे मुख्य देव म्हणता येतील. वर्षातून दोनदा या बोहल्यांवरील काल्पनिक देवांची व लोखंडी वा इतर धातूच्या पणतीची जागा मात्र कुटूंब प्रमुखाद्वारे पूजा करून आलटून पालटून बदलली जाते. याला “देव उतरवणे” असे म्हटले जाते. हे बोहले म्हणजे शिवाचे/शिवलिंगाचे प्रतीक मानले जातात. म्हणजेच पोवार समाज शिवपूजक होता/आहे, हे स्पष्ट होते. आता इतर समाजाच्या संपर्कात आल्यानंतर मात्र पोवार समाजातही बहू-मूर्तीपूजेने आपले स्थान निश्चित केले आहे. तसेच पोवार समाजाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आजही पोवार समाजात हुंडापद्धत अस्तित्वात नाही. (इतर समाजाची देखासिखी मुळे काही क्षुल्लक अपवाद आढळून येतात, तेव्हा त्यांच्यावर अत्यधिक सामाजिक दबाव निर्माण होऊन त्यांनाही यापासून परावृत्त करण्याचे कार्य केले जाते.) याउलट ४०-५० वर्षांपूर्वी गरीब पोवार कुटूंबात वधूपक्षाला वरपक्षाकडून “दक्षिणा” देण्याची पद्धत होती. पोवार समाजाची ही वैशिष्ट्ये इतर समाजावर सकारात्मक प्रभाव टाकत असत. परंतु सध्याच्या या “उजाखा”च्या युगात पारिवारीक, विभक्त कुटुंबे, परस्परांतील अंतर, वाढल्याने व्यक्ती-महत्वापोटी असे सर्वच सामाजिक प्रभाव प्रभावहीन ठरू लागले आहेत.

शिवाय आणखी एक अद्भुत वैशिष्ट्य म्हणजे पोवार समाजात “भिकारी” अजिबात नाहीत. तसेच पोवार समाजातील एकाही वृद्धाला (स्त्री/पुरुष) अजून तरी वृध्दाश्रमात जायची/रहायची पाळी आलेली नाही, अशी पोवार समाजाची सुदृढ कुटूंब-व्यवस्था अजूनही टिकून आहे.

पोवारी बोलणाऱ्या भाषकांचा क्रमांक ४२ वा

भारत सरकारच्या एका जुन्या सर्वेक्षणानुसार हिंदी ची उपभाषा/पोटभाषा/बोली म्हणून पोवारी बोलीचा/भाषेचा उल्लेख भाषासूचीत केलेला आहे. त्यानुसार पोवारी बोलणाऱ्या भाषकांचा क्रमांक 42 वा असून 38-40 लक्ष लोकसंख्या असलेल्या पोवार समाजातील 4,25,745 पोवार लोक बोलचालीत अजूनही पोवारी बोली/भाषेचा वापर करतात, असे नमूद आहे. (ही आकडेवारी जुनीच आहे.); पोवारी बोली/भाषेवर सर्वप्रथम इंग्रजी भाषातज्ज्ञ सर जाॅर्ज अब्राहम गियर्सन यांनी संशोधन केले. दुसरे इंग्रजी विद्वान आर.व्ही.रसेल यांनी त्यांच्या “CASTS AND TRIBES OF C.P. AND BERAR” या ग्रंथात पोवारी बोली/भाषेचा आणखी थोडासा अभ्यास मांडला. नागपूर विद्यापीठातील डाॅ. सु. बा. कुलकर्णी यांनी प्रथमच, 1972 मध्ये पोवारी बोली/भाषेचा शास्त्रोक्त अभ्यास करून Ph.D. साठी प्रबंध सादर केला व त्यांना नागपूर विद्यापीठाद्वारे ती पदवी प्रदान करण्यात आली. 1999 मध्ये डाॅ.मंजू अवस्थी यांनी बालाघाट जिल्ह्यातील बोलींचा (पोवारी ही मुख्य बोली) अभ्यास सादर करून रायपूर विद्यापीठाची D.Lit. पदवी प्राप्त केली. त्यानंतर डाॅ. ज्ञानेश्वर टेंभरे यांनी 2011 पासून पोवारी बोली/भाषेचा भाषावैज्ञानिक पद्धतीने अभ्यासाचा विडा उचलला असून त्यांनी “पवारी ज्ञानदीप” हा महत्वाचा ग्रंथ सिद्ध केला आहे. नागपूरचेच जयपालसिंह पटले यांनी “पवार गाथा” व अन्य 5-6 पुस्तके पोवारी बोली/भाषेत प्रकाशित केली आहेत.

शिवाय आता पोवारी बोलीतील साहित्य निर्मितीला चांगलीच चालना मिळाली असून अद्ययावत व आधुनिक विचारसरणीला अनुसरणारे साहित्य प्रसवणारी सुमारे आठ-दहा पुस्तके उपलब्ध झाली आहेत. या श्रृंखलेत लखनसिंह कटरे यांच्या “पोवारी साहित्य मंजूषा” या कविता, कथा, लेख, संस्मरण आदि असलेल्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा उल्लेख अस्थानी ठरू नये. ;यापूर्वी नमूद केल्याप्रमाणे पोवारांचा विदर्भ संपर्क ही एक दीर्घकालीन स्थलांतराची प्रक्रिया आहे. अकराव्या शतकात नागपूरकडील प्रदेश मध्यप्रदेशातील धारच्या परमारवंशीय राजांच्या (राजा भोजशी संबंधित) मांडलिकीखाली होता. याची साक्ष भांदक येथील शके 1068 च्या नागनाथ मंदिरातील मराठी शिलालेखात आढळून येते. या शिलालेखात धर्मशील राजा पवार(?) याने मंदिराचा जीर्णोद्धार व नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली असे म्हटले आहे.

नागपूरकर भोसल्यांच्या कारकीर्दीत तर अनेक पोवारांनी कटकपर्यंत स्वाऱ्या करून समशेर गाजविली आणि आपण शूर क्षत्रियांचे वंशज आहोत हे सिद्ध केले. समशेरीप्रमाणेच नांगर धरण्यातही पोवारांचा हात कोणी धरणार नाही. त्यांनी पूर्व विदर्भात व पश्चिम मध्य प्रदेशात गावोगावी तलाव बांधून वैनगंगेचे खोरे सुजलाम आणि सुफलाम करून टाकले आहे. पूर्व वैदर्भीय पोवारांच्या या दीर्घकालीन विदर्भ वास्तव्यामुळे त्यांच्या भाषेचा मूळ तोंडवळाच बदलून गेला आहे. तिचा घाट जरी माळवी असला तरी थाट मात्र नागपूरी (झाडीबोलीय) आहे.

पोवारी बोलीत ळ चा अभाव

पोवारी बोली/भाषेची स्वर व्यवस्था अधिकांश हिंदी भाषेप्रमाणेच आहे. या बोलीत “ळ” हा ध्वनी नाही. मराठी शब्दातील “ळ”काराचा “र”कार करण्याची प्रवृत्ती दिसून येते. यामुळे होळीची होरी आणि शेळीची सेरी होते. कधीकधी “ळ” चा “ड” देखील होतो. उदा. उथळ चे उथड व धर्मशाळा चे धरमसाडा असे रूप होते. शब्दारंभीच्या “व” चा “ब” होतो. जसे:- वेळू चा बेरू, वाळू चा बारू, विहीर चा बिहीर इ.

पोवारी बोलीत श ध्वनीचा अभाव

पोवारांच्या बोली/भाषेत “श” हा ध्वनी नाही. “श”काराचा “स”कार करण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे शिंगाचे सिंग व शेंगेचे सेंग होते. दन्त्य व तालव्य स्पर्शसंघर्षी ध्वनींमध्येही व्यवच्छेद आढळत नाही. प्रायः मुक्त-परिवर्तनच आढळते. यामुळे मराठीतील चांदी, चाळण, चवळी, जांभई, जावई, जुना, झाकणी यासारखे शब्द पोवारीत चांदि, चारनि, चवरि, जांबइ, जवाई, जुनो, झाकनि याप्रमाणे उच्चारले जातात.

पोवारी बोलीत ण ध्वनीचाही अभाव

पोवारी या बोली/भाषेत “ण” हा ध्वनी नसल्याने बाणाचा बान बनतो व वेणीची बेनी बनते. शब्दारंभीच्या ए आणि ओ या स्वरांना य आणि व असे आगम होतात. यामुळे एकाचा येक व ओठाचा वठ होतो. पोवारीत हिंदीप्रमाणे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग अशी लिंगे आहेत. या बोली/भाषेत आंगन, कनिस, घुबड, चमडा, जंगल, जांबुर इ. मराठीत नपुसकलिंगी असणारे शब्द पुल्लिंगी आहेत. तर नाक, पदक, परसाद, सरन, मालिस यासारखे शब्द स्त्रीलिंगी आहेत. सामान्यतः पुल्लिंगी नामे अकारान्त व स्त्रीलिंगी नामे इकारान्त असतात.

नामांचा वचनविकारही नाही

विशेष म्हणजे, या बोली/भाषेत नामांना वचनविकार होत नाही. यामुळे येक घर, दुय घर, येक टुरा, दुय टुरा असेच अविचल रूप राहते. नामांचे सामान्य रूपही होत नाही. षष्ठीचा प्रत्यय “को” तर सप्तमीचा प्रत्यय “मा” असा आहे. जसे:- उनको नवकर, वको भाई, हातमा, बगीचामा, इ. ;

राष्ट्रीय पोवारी मंडळाची स्थापना

अशा या ऐतिहासिक पोवारी/पंवारी/पवारी(?) बोलीचे जागतिकीकरणानंतरचेे स्थान आता पुन्हा पुनर्स्थापित होत असून महाविद्यालयात शिक्षण घेत असलेेेेली पोवार समाजातील तरुण पिढी महाविद्यालयातही आपापसात सर्रास, न संकोचता, पोवारी बोलीत बोलू लागली आहे. ह्या बोलीत वर नमूद केल्याप्रमाणे साहित्य-निर्मिती सुद्धा होत असून त्या साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी “राष्ट्रीय पवारी(?)/पोवारी साहित्य, कला, संस्कृती मंडळा”ची स्थापना करण्यात आली असून 03 फेब्रुवारी २०१९ ला तिरोडा (जि. गोंदिया) येथे पहिले अखिल भारतीय पोवारी/पवारी(?) साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यात आले आहे;

एकंदरीत “ध्वनीनिष्ठ” पोवारी बोली आता या जागतिकीकरणानंतरच्या रेट्याने “लिपीनिष्ठ” होण्याचा स्वावलंबी मार्ग अनुसरत आहे. आणि पर्यायाने प्रमाण भाषांना भिन्न-विभिन्न असे नवनवीन शब्द पूरवून प्रमाण भाषांना आणखी सुदृढ व अमृतमयी करण्यासाठी सज्ज होत आहे.

एक नजर

  • पोवार समाजाचाच एक समूह वर्धा, नागपूर या महाराष्ट्रातील तर छिंदवाडा, बैतूल या मध्यप्रदेशातील जिल्ह्यात वसला असून त्यांना भोयर पोवार/पंवार/पवार असे संबोधिले जाते.
  • त्यांची बोली सुद्धा भोयरी/भोयर पवारी/पंवारी/पोवारी म्हणून संबोधिली जाते.
  • वस्तूतः स्थलभेदामुळे या बोलीत अल्पसा फरक दिसत असला तरी पोवारी/पंवारी/पवारी(?) बोली आणि ही भोयरी/भोयर पवारी/पंवारी/पोवारी बोली थोड्याफार फरकाने अगदी सारख्याच आहेत.

Related posts

तिळगंगा साहित्य प्रेरणा पुरस्कार अन् प्रतिभा पुरस्कार जाहीर

”कोल्हापुरी चप्पल” घालूया.. कोल्हापूरची ओळख जपूया..! – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

स्त्री जन्मा तुझी कहाणी! हृदयी अमृत नयनी पाणी!

Leave a Comment