वृक्षराजीने जुना पोशाख बदलून नवपल्लवांचा बालपोपटी, लालचुटुक वेश धारण केला आहे. आम्रवृक्ष मोहोराचा अत्तर घेऊन उभा आहे. पिंपळपानांच्या सळसळीचा वाद्यघोष सुरू आहे. कोकीळही त्यात आपला सूर मिसळत आहे. निसर्गाचा आनंदोत्सव सुरू होतो आहे…
– निशा नितीन साळोखे
एखाद्या राजाचं स्वागत करणे म्हणजे रंगीबेरंगी पताकांची सजावट, रांगोळीची नक्षी, गायन, वादन, नृत्याविष्कार, खाद्यपदार्थांची रेलचेल… असेच केले जाते ना? आणि तो राजा प्रजेचा अगदीच आवडता असला तर. मग मंडळी राहा तयार…‘बाआदब, बामुलाहिजा ऋतूंचा राजा वसंत ऋतू येत आहे, होऽऽऽ’ निसर्गाने थंडीची पसरलेली दुलई फेकून दिली आहे. एखाद्या उथळ भांड्यात पाणी घालून फुलांची सुंदर सजावट करावी, तसा तो तलावही कमळाच्या फुलांनी नटूनथटून सज्ज झाला आहे.
वृक्षराजीने जुना पोशाख बदलून नवपल्लवांचा बालपोपटी, लालचुटुक, चमकदार वेश धारण केला आहे. आम्रवृक्ष मोहोराचा अत्तर घेऊन उभा आहे. पिंपळपानांच्या सळसळीचा वाद्यघोष सुरू आहे; तर त्या आम्रपर्णाआडून कोकीळही या तालात सूर मिसळत आहे. गिरी-शिखरेही धुक्यांची शाल बाजूला ठेवून स्फटिकाचे कवडसे अंगावर घेऊन नुकतेच न्हाऊ घातलेल्या गोंडस बाळासारखे दिसत आहेत. लाल-तांबड्या मातीच्या वाटेवर बकुळीच्या फुलांनी सडा घातला आहे. जुने टाकून नव्याची निर्मिती सुरू आहे.
पक्षीही आपली घरटी बांधत आहेत. कडुलिंबाचा मोहोर, करंजीची फुलं, मधुमालतीची गुलाबी फुले आणि ते सर्वांत उंच माडाचे झाड… पिवळ्या टणक फुलांचा तुरा खोचून, ‘पाहा बरं! मीही कसा आवरून तयार आहे’ असंच सांगत आहे. या ऋतूच्या राजाचं स्वागत करण्यासाठी लेकुरवाळा फणसही आपली लेकरं अंगाखांद्यावर घेऊन तयार आहे. ‘वसंत राजा हा आला-आला रंग, रस, गंध, चैतन्याने निसर्ग नटला’ निसर्गाने तर या राजाचं भरभरून स्वागत केलंच आहे; पण निसर्गाला आपल्या संस्कृतीत गुंफून त्याचा आनंद घेणारा मानव हा तर कसा मागे राहील ?, वसंत ऋतूरूपी राजाचं आगमन होते, तो काळ म्हणजे साक्षात सरस्वती देवी अवतरण्याचा काळ, जणू ज्ञानपंचमीच. नवकल्पनांची पेरणी करणारा काळ. सूर्यदेवतेचे उत्तरायण सुरू झाल्याने विहार करण्यास ऊर्मी आणतो, हा ऋतुराज.
झाडांच्या पानगळतीप्रमाणे मनावर दाटलेली निराशा गळून पडते. गच्च पानांची नटलेली तरुवेली, मधुर व रसदार फळे, रंगीत फुलांचे मनोहारी ताटवे नेत्रसुख देतात, तसेच क्षुधा-तृष्णाही शमवितात. कडुलिंब, आंब्याच्या मोहोराची गंधाली सांडावी अन् माणूस योजनागंध व्हावा, तसा गंध बावरा होऊन जातो आणि गंधानुभूतीत दंग होतो. ऊबदार किरणांचा स्पर्श त्याला हवाहवासा वाटतो. कोकिळेच्या कुजनाने कर्णसुख अनुभवतो. या ऋतुराजाने आणलेला पंचमहाभुतांचा हा सोहळा माणूस आपल्या पंचेंद्रियांनी हृदयात साठवून घेतो. गुढी उभारून या राजाचं स्वागत करतो. राम नवमी, हनुमान जयंती या उत्सवांचा आनंद घेतो. असा हा ऋतूंचा राजा चैत्रात सुखावतो; तर वैशाखात तापवतो.
पण, हा कनवाळू राजा कलिंगड, द्राक्ष, आंब्याच्या रसांनी दाह कमीही करतो. मध भरलेली फुले फुलतात म्हणून याला मधुमास म्हणतात, श्रीकृष्णांनी तर याला कुसुमाकर नाव दिले आहे. संत ज्ञानेश्वर याला ऋतुपती म्हणून संबोधतात. कालिदासांनी याला योद्ध्याची उपमा दिली आहे. चला तर, अशा या ऋतूंच्या राजाचे अर्थात वसंताचे स्वागत करूया…