November 22, 2024
Book Review of D T Patil Novel Chait by Ramesh Salunkhe
Home » चैत : पालवी आणि पाचाेळा…
मुक्त संवाद

चैत : पालवी आणि पाचाेळा…

व्यवस्थेला प्रतिकार न करता माणसे या व्यवस्थेत कशी बळी पडत चालली आहेत. हे कादंबरीतील एक महत्त्वाचे अंत:सूत्र आहे असे वाटते. अर्थकेंद्रित दृष्टिकाेणातूनच माणसाचा विचार करण्याच्या अघाेरी सवयीमुळे शिवाय माणसाचा विचार केवळ एक वस्तूमूल्य म्हणून करायचा ही मानसिकता उत्तराेत्तर बळावत चालल्यामुळे ग्रामीण माणसाचे जीवन कसे दिशाहीन, कळाहीन हाेत चालले आहे; हे माेठ्या संयमाने पण परिणामकारपणे ही कादंबरी अधाेरेखित करण्याचा प्रयत्न करते.
– रमेश साळुंखे

मराठी विभागप्रमुख
देवचंद महाविद्यालय, अर्जुननगर जि.काेल्हापूर


‘चैत’ ही द. तु. पाटील यांची कादंबरी. ग्रामजीवनातील बदलत्या संस्कृतीचे तपशीलवार
दर्शन घडविणारी. चैत्र महिन्यातील ग्रामदेवाची यात्रा म्हणजे चैत. चैत्र महिन्यातील गावचा सण
साजरा करावयाची पार्श्वभूमी कादंबरीच्या केंद्रस्थानी ठेवून एका कुटुंबाची आणि या कुटुंबासाेबत
वर्तमान वास्तवाची – जगण्याभाेगण्याची कथा ही कादंबरी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करते.
अर्थातच इतर अनेक ग्रामीण कादंबऱ्याप्रमाणेच ही एका व्यक्तीची, कुंटुंबाची आणि एका गावातील
हर्षखेदांची, सुखदु:खाची जशी कहाणी आहे; तशीच ती काेणत्याही ग्रामवास्तवाची प्रातिनिधिक
कथा आहे.

‘चैत’ या कादंबरीचे शीर्षक आणि कादंबरीतील कथन यातील विराेधाभास कादंबरीच्या
प्रारंभापासूनच जाणवत राहताे. या कादंबरीतील आशयाच्या आविष्करणाला दु:खाचे – शाेषणाचे
अस्तर अदृश्यरूपाने प्रवाहीपणे वाहत असल्याचा प्रत्यय सातत्याने येत राहताे. या अस्तरामुळेच ही
कादंबरी आपल्या अंगभूत वेगळेपणाने सहज उठून दिसते. या कादंबरीतील व्यक्तिचित्रे आणि
त्यांचे समाजाशी असलेले नाते यांच्यातील परस्परसंबंध पाहिला तर आजच्या भवतालात
जागतिकीकरणाने माणसाची जी काही निष्ठूर दशा केलेली आहे; तिचे अनंत अवतार काेणतेही
सरळसाेट भाष्य न करता लेखकाने या कादंबरीत रेखाटले आहे.

दुर्गा भागवत यांनी ‘ऋतुचक्र’मध्ये चैत्राला ‘वसंतहृद्य’ आणि वैशाख महिन्याला ‘ चैत्रसखा’ असे संबाेधले आहे. या महिन्यात निसर्गातील प्रत्येक घटक विपुलतेने हिरवाकंच झालेला असताे. नवा माेहाेर, नवी पालवी फुटल्यामुळे झाडांसाेबतच माणसेही कात टाकून नव्या वर्षाला उमेदीने सामाेरी जाण्याचा प्रयत्न करीत असतात. पशू, पक्षी, पाखरे, जनावरे साऱ्यातच नवे चैतन्य संचारलेले असते. अशा निसर्गाला मराठी साहित्यात अनेक लेखकांनी आपापल्या परीने शब्दबद्ध केलेले आहे; आणि ते खचितच मराठीचे वैभव वाढविणारे आहे. तथापि चैत्रातल्या या निसर्गाच्या आणि माणसांच्या आनंदाला त्याच्या उत्साहाला कारूण्याचीही झालर असते. ती कारूण्याची, दु:खाची, वेदनेची झालर या साèया हर्षाेल्हासात दबलेली, मुद्दाम कुणीतरी दडपलेली, हिंस्त्रपणे ओरबाडून घेतलेली असते. तिचे प्रकटन बहुतेकदा हाेत नाही. माणसे आपल्या दु:खाला, शाेषणाला जबाबदार काेण? आपल्याच वाट्याला का हे असे खंगून मरणे ? यासारख्या प्रश्नांचा विचार न करता निमूटपणे जगत राहतात. जगण्याचे न टाळता येणारे भाेग म्हणून कमालीची सहनशील हाेतात. व्यसनाच्या सापळ्यात अडकतात. नियती, दैव, नशीब अशा भ्रामक कल्पनांच्या आहारी जाऊन अखेरीस पाचाेळ्यासारखी संपून जातात. ‘चैत’ या कादंबरीच्या आशयाच्या तळाशी आहे; हे कारूण्य! आपल्या आजच्या सर्वच पातळ्यांवरील शाेषणाला जबाबदार काेण ? या प्रश्नापर्यंतही न पाेहाेचलेल्या माणसाचे हतबल हाेणे; हे सूत्र सातत्याने जाणवत राहिल्यामुळे या कादंबरीला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. मांडणीच्या या अशा वैशिष्ठ्यामुळे ही कादंबरी महत्त्वाची वाटते.

इमानेइतबारे राबून उदरनिर्वाह करणारे रामूनाना आणि हाैसाकाकू हे जाेडपे. त्यांचा दहावी
नापास झालेला मुलगा तानाजी. मुलींची लग्न झालेली. या कुटुंबाची विशेषत: रामूनाना आणि
हाैसाकाकू या दाेघांची परिस्थितीच्या विराेधातील अयशस्वी धडपड हा या कादंबरीचा मुख्य विषय
आहे. गावदेवाच्या-बाळुबाच्या उरूसाची तयारी, कापली जाणारी बकरी, पाहुण्यांचे आगतस्वागत,
लेकीसुनांचं येणंजाणं, मानपान, कापडंचाेपडं, तमाशा, कुस्ती, बैलांची मिरवणूक यातील चुरस व
स्पर्धा, यासर्वांमधील उत्साह आणि आनंद. या गाेष्टींची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने येणारी
आर्थिक विवंचना व त्यातून नेहमीप्रमाणेच काढलेला मार्ग म्हणजे सावकारी कर्ज, उसणेपासणे
घेण्यातून केली गेलेली तडजाेड, लाचारी, बँकांचे हेलपाटे, पाहुण्यांच्या मिनतवाऱ्या, साेसायटीची
थकबाकी, मतासाठी पैसे स्वीकारण्याची नामुष्की हे असं ‘ऋण काढून सण साजरा’ करण्याची
नाकारता न येणारी परंपरा जाेपासत राहणं. शिवाय प्रतिष्ठेच्या खाेट्या कल्पना, अंधश्रद्धेला शरण
जाणारी मानसिकता, भावकीतले मतभेद – वादावादी, इर्षा, खुन्नस, राजकीय असंवेदनशीलता,
पाण्याचे-विजेचे प्रश्न, गरज भागविण्यासाठी विकावं लागलेलं घरचं धान्य, लहानग्या पाेरासाेरांची
रूसवीफुगवी, जत्रेतल्या खेळण्यासाठीची रडारड, स्त्रीयांची साेशिकता हा सगळा ग्रामजीवनातील
ऐवज या कादंबरीत लेखकाने माेठया खुबीने वापरलेला आहे.

‘चैत’ या कादंबरीत शाेषणाची विविध रूपे लेखकाने तपशीलवारपणे रेखाटली आहेत. जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण हे शब्द आता आपल्या एकूणच वातावरणात स्थिरावले आहेत. काही देशांमध्ये खाऊजा संस्कृतीतला फोलपणा आणि केवळ अर्थकेंद्रितता जाणवू लागल्यामुळे याला विराेध हाेतानाही दिसताे आहे. तथापि अजूनही आपल्याकडे गाेंधळाचेच वातावरण असल्याचे चित्र आहे. अगदी परवलीचे झालेल्या या शब्दांमुळे जी काही उलथापालथ आपल्या समाजातील साहित्य, कला, संस्कृती, जात, धर्म, समाजकारण, राजकारण आदी क्षेत्रांमध्ये झालेली आहे. तिचे दृष्य-अदृश्य परिणाम साऱ्याच संवेदनशील मनाला सतावत आहेत.

सत्ता, स्पर्धा, हिंस्त्रता, अर्थकेंद्रितता, जात आणि धर्मव्यवस्थेचे कमालीचे संकुचित हाेत जाणे, मूल्यात्मक जगण्यापासून पळवाट शाेधणे, नातेसंबंधांमधील दुरावा, एकटेपणाची-परकेपणाची आणि पाेरकेपणाची भावना, संवादांमधील विसंवाद, चळवळींमधील जाेरकसपणा हरवत जाणे; हे सारे वर्तमान वास्तवातील भरकटणे 1990 नंतर हळूहळू सुरू झाले. आणि ते आता माणसांच्या, निसर्गाच्या, प्राणी, पक्षी, पीक-पाणी वनस्पतींच्या मुळावरच घाव घालू लागलेले आहे. निसर्गापासून, माणसांपासून इतकेच नव्हे तर माणूस स्वत:पासूनच वेगळाअलिप्त हाेताे आहे.

कादंबरीच्या प्रारंभीच गुढीपाढव्याचे-गुढी उभी करण्याचे प्रसन्न वातावरण येते. तथापि दुसऱ्याच परिच्छेदात या वातावरणाला छेद दिला जाताे. निसर्ग आणि माणूस यांच्यातील मतलबी नातेसंबंधांची जाणीव हाेते. शिवारात आता चिवांची बेट दिसेनाशी झाली आहेत. एक दिवसाची गरज म्हणून माणसं चिवांकडं पाहू लागली. पिकांचं नुकसान, चाेरांची भीती त्यामुळे चिवांची बेटं ठेवण्याचं मनात असूनही माणसं ती ताेडून विकू लागली. त्यामुळे गुढीपाडव्याला गुढी उभी करण्यासाठीही चिवा दुर्मीळ हाेऊ लागला. तेव्हा गावातील माणसं चिवा मिळवायचा हा असा त्रास बघून म्हणायची, ‘‘आयला, पुढं कसलं दिवस येत्यात कुणाल ठावं ? का चिवा मिळत न्हाई म्हणून गुढी उभी करायची बंद कराय लागतीया.’’ असे दृश्य येते.

खरेतर ही या कादंबरीची नांदी आहे. जाणत्या गावकऱ्यांनी भविष्यातील पडझडींचा दिलेला हा इशारा आहे. या प्रसंगावरही लेखक काेणतेच भाष्य करत नाही. केवळ घटना आणि प्रसंगांची मांडणी करण्याचा प्रयत्न करताे. वर्तमान वास्तवाची उरबडवी मीमांसा करत नाही. त्यामुळे कादंबरीला केवळ प्रचाराच्या पातळीवर वावरण्याची कळा येत नाही. या कादंबरीतील दृश्ये, घटना, प्रसंग, निवेदन, संवाद हे सारे सहज साधे साेपे वाटत असले; तरी या सर्वांच्या माध्यमातून जे वास्तव
अदृश्यपणे वावरत आहे. माणसाला भयभीत करीत त्याला असुरक्षित करते आहे; याचा प्रत्यय
सातत्याने या कादंबरीत येत राहताे. माणसाच्या जगण्या-भाेगण्याला ही अशी उतरती कळा का
लागली आहे.? या मागे काेणत्या प्रकारच्या व्यवस्थेचे कारस्थान आहे? अशा प्रश्नांची उत्तरे शाेधण्याकरिता ही कादंबरी वाचकाला सजग करत राहते. हे एक महत्त्वाचे बलस्थान या कादंबरीचे
आहे.

‘चैत’ मधील स्त्री जीवन हाच एक स्वतंत्र लेखनाचा विषय हाेऊ शकताे; इतक्या शक्यता या कादंबरीत विखरून राहिल्या आहेत. शहरी अथवा महानगरीय स्त्री जीवन मराठी कादंबरीत
ग्रामीण कादंबरीच्या तुलनेत अधिक जाेरकसपणे येते आहे. त्या तुलनेत ग्रामीण स्त्रीयांनी आपल्या
व्यथा वेदनांना खूप कमी प्रमाणात मुखर केले आहे. ग्रामजीवनातील स्त्रीविश्व टीव्ही आणि
त्यावरील असंख्य टुकार वाहिन्यांमुळे चकचकीत व फॅशनेबल झालेले दिसत असले; तरी
गावाकडील बायकांचे साेसणे कमी झाल्याचे दिसत नाही. उलट या व्यवस्थेत ग्रामजीवनातील स्त्री
शरीर आणि मनाने अधिकच उद्ध्वस्त हाेताना दिसते आहे. त्यामुळे या कादंबरीतल्या हाैसाकाकू,
आनंदी, शाेभा, केराबाई अशा अनेक बायका या कादंबरीत दुखा:चा डाेंगर माथ्यावर घेऊन
वाट्याला आलेले भाेग निमूटपणे भाेगताना दिसतात. आपल्या दुःखाचे, दैन्य आणि दारिद्याचे
प्रदर्शन न मांडता कुजबुजत एकांतात एकमेकींसमाेर मन माेकळे करताना दिसतात. सहारा-आधार
शाेधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अगदीच असह्य झाले की गावदेवाला अथवा देवीला शरण
जातात. आपला मुलगा दारूच्या आहारी जात असल्याचे कळल्यावर हाैसाकाकू प्रचंड अस्वस्थ
हाेतात. डाेळ्यात पाणी आणून ज्या गावदेवाकरिता इतक्या खस्ता काढल्या आणि सण साजरा
केला; त्या बाळूबासमाेर हात जाेडून म्हणतात, ‘‘आमी तुला इसारल्यालाे न्हाई. तवा तू आमाला
इसरू नकाेस. आत आमाला जे ऐकाय मिळालं त्याबसनं माझ्या पाेराला एवढं लांब ठेव. बाकी
आमाला तुझं काय नगाे.’’ हा शरण्यभाव ही ग्रामीण स्त्रीयांची एक हक्काची जागा आहे. कारण
ऐकून घेणारे सर्वच रस्ते बंद झाले की या स्त्रीयांना परमेश्वराशिवाय पर्यांय रहात नाही. या
बायकांचेही काही प्रश्न आहेत. गांभीर्यांने विचारात घ्याव्यात अशा काही समस्या आहेत. प्रत्यक्ष
अपत्यक्षपणे तिचे पराकाेटीचे आर्थिक, मानसिक, भावनिक शाेषण हाेते आहे. पण पाेटाची खळगी
कशी भरायची हीच माेठी विवंचना असल्याने; या पल्याडचेही एक जग असते तिथे सुख,
समाधान, मूल्ययु्क्त स्वाभिमानाचे जगणे असते; हे या स्त्रीयांच्या गावीच नसते. तितकी उसंतच ही
व्यसस्था त्यांना देत नाही. अशा काही स्त्रियांचे अनुभवविश्व या कादंबरीत आलेले आहे. या
अनुषंगानेही ही कादंबरी वेगळेपणाने उठून दिसते. त्यामुळेच या कादंबरीतल्या स्त्रिया एका
कुटुंबापुरत्या अथवा एका गावापुरत्या मर्यादित न राहता त्यांनाही प्रातिनिधिकता लाभली आहे.

‘चैत’ वाचत असताना काळ आणि अवकाशाचा विचारही वारंवार मनात सतत डाेकावत
राहताे. अत्यंत अल्प काळाचा तुकडा घेऊन विस्तीर्ण अवकाश व्यापणारी ही कादंबरी आहे.
कादंबरीत ज्या काळाचा एक तुकडा लेखकाने लेखनविषय म्हणून वापरलेला आहे; ताे अत्यंत
अल्प आहे. जेमतेम पंधरा ते वीस दिवसांच्या अवधीत या कादंबरीतल्या सर्व घटना आणि प्रसंग
घडतात. तथापि मानवी जीवन इतके विविधांगी, विशाल, गुंतागुंतीचे आणि व्यामिश्र असते; की ते
अनेक प्रकारांनी अभिव्यक्त हाेत असते. त्यामुळे गावदेवाची यात्रा आणि एका कुंटुंबाची ते साजरा
करण्यासाठीची धडपड हा वरवर अत्यंत साधा – साेपा लहानगा प्रसंग असला; तरी या विषयाला
एका गरीब शेतकèयाच्या दृष्टिकाेणातून किती कंगाेरे असतात; हे या प्रकारच्या कादंबरीच्या
माध्यमातून वाचून विस्मित व्हायला हाेते. माणसाचे माणसाने अत्यंत हिंस्त्रतेने केलेले शाेषण इथे
प्रत्ययास येते.

‘चैत’ या कादंबरीत हा सारा भवताल कमालीच्या सूक्ष्मपणे आलेला आहे. माणसे विशेषत: ग्रामजीवनातील माणसे जशी जगताहेत ती जशीच्या तशी रेखाटण्याचा प्रयत्न या कादंबरीत
लेखकाने केला आहे. बऱ्याचदा स्वत:चे दयनीय जगणे जगताना दुख, दैन्य, दारिद्रयाशी संघर्ष
करताना माणसे आपले सत्व आणि स्वत्व साेडताना दिसतात. प्रवाहपतित हाेतात, आक्रस्ताळी,
उरबडवी हाेऊन जगाला शिव्याशाप देताना दिसतात. अशा प्रकारची सनसनाटी पात्रे निर्माण
करण्याच्या भानगडीत द. तु. पाटील पडत नाहीत; हे खूप महत्त्वाचे आहे. याचा अर्थ लेखकांनी
आपल्या पात्रांना दुबळे, असहाय्य बनवले असा खचितच हाेत नाही. संयमित, मूल्ययुक्तपणे
जगण्याचा प्रयत्न करण्यात शिवाय लाचार हाेऊन स्वाभिमानशून्य जगणे नाकारण्यातही खूप माेठे
ध्यैर्य असते. त्यामुळेच या कादंबरीतल्या मुख्य व्यक्तीरेखा परिस्थितीच्या काचाला-शाेषणाला
बळी पडलेल्या असल्या; तरी अंगच्या समृद्ध शहाणपणामुळे अनुकरणीय वाटतात. या कादंबरीत हे सारे काही अत्यंत साध्या साेप्या प्रवाही भाषेत येत असले; तरी या सर्वांमागे शाेषणाची एक प्रकारची व्यवस्था पद्धशीरपणे राबविली जाते आहे; याचा प्रत्यय येत राहताे.

या व्यवस्थेला प्रतिकार न करता माणसे या व्यवस्थेत कशी बळी पडत चालली आहेत. हे
कादंबरीतील एक महत्त्वाचे अंत:सूत्र आहे असे वाटते. कितीही नाकारायचे म्हटले तरी माणूस ताे
जगाच्या काेणत्याही कानाकाेपऱ्यातील असाे, त्याच्या जगण्याभाेगण्यावर जागतिकीकरणाचे सावट
पसरलेलेच आहे. प्रामाणिक, संवेदनशील, कष्टकरी माणसाचे परंपरेने चालत आलेले सण, समारंभ
त्याची काेणतीच अभिव्यक्ती, निर्मिती, आणि त्या निर्मितीमधील आनंद निखळपणे, निष्पापपणे
घेता येऊ नये; अशी व्यवस्था जगभर राबविली जाते आहे. अर्थकेंद्रित दृष्टिकाेणातूनच माणसाचा
विचार करण्याच्या अघाेरी सवयीमुळे शिवाय माणसाचा विचार केवळ एक वस्तूमूल्य म्हणून
करायचा ही मानसिकता उत्तराेत्तर बळावत चालल्यामुळे ग्रामीण माणसाचे जीवन कसे दिशाहीन,
कळाहीन हाेत चालले आहे; हे माेठ्या संयमाने पण परिणामकारपणे ही कादंबरी अधाेरेखित
करण्याचा प्रयत्न करते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading