सर्वसाधारणपणे एका कथासंग्रहात सामायिक सूत्राने बांधलेल्या वा एकाच ढंगाच्या कथा देण्याचा लेखकांचा प्रयत्न असतो. कथारंजन या कथा संग्रहात ज्येष्ठ कथालेखिका माधवी कुंटे यांनी वेगवेगळ्या ढंगांच्या कथा देऊन सर्व थरातील वाचकांचे मनोरंजन केल्याचे लक्षात येते.
अशोक बेंडखळे
एकूण अकरा कथांमध्ये पाच कौटुंबीक (मर्मबंध, ताईचं घर, किस्मत कनेक्शन, निर्णय ज्याचा त्याचा आणि लाडक्या लेकीस), दोन विनोदी ढंगांच्या (नागीन, उंदीर आणि मथुआत्या व सरलामामीचा सल्ला), तीन पौराणिक अध्यात्मिक (आत्मशोध, आदिशक्ती व मृगतृष्णा) आणि एक लोककथा (एकदा काय झालं) आहे.
मर्मबंध ही कथा प्रौढ अवंतीबाई आणि त्यांची कॉलेजला जाणारी बिनधास्त मुलगी आरोही यांच्या नात्यामधील प्रेम दाखवणारी आहे. आरोहीचे वडील शामराव दुबईला नोकरीसाठी गेलेले असतात. त्यामुळे घरी फक्त अवंती आणि मुलगी आरोही. अवंतीबाई सगळ्यांची सतत काळजी करणार्या तर तरुण मुलगी बेपर्वा स्वभावाची. स्वत:चे कपडे, पुस्तके तेही ती व्यवस्थित ठेवत नाही. त्यामुळे या मुलीचे पुढे कसे होणार याची काळजी अवंतीबाईंना पोखरत असते. मग एक प्रसंग घडतो. अवंती मोरी साफ करताना पडतात आणि त्यांना फ्रॅक्चर होते. हॉस्पिटलमध्ये दोन आठवडे राहावे लागते. या दोन आठवड्यात आरोही आईची खूप काळजी घेते. जेवणाचे पदार्थ स्वत: बनवते, डिस्चार्ज मिळाल्यावर काळजीपूर्वक घरी आणते आणि फिजिओ थेरपिस्टची व्यवस्थाही करते आणि मग आईला आपण मुलीशी अनामिक बंधाने बांधले गेले आहोत, याची प्रचिती मिळते.
रंजनाबाईंची लग्न होऊन मुंबईला सासरी गेलेली मोठी मुलगी रोहिणी आणि त्यांचा मुलगा राजेंद्र (राजू) यांच्यामधील प्रेम, माया दाखवणारी ताईचं घर ही कथा आहे. रोहिणी खूप सालस. नोकरी सांभाळून ती नवरा, सासू, सासरे आणि दिरांची दोन निराधार मुले यांचे व्यवस्थित पहात होती. राजेंद्रला मुंबईला जाऊन बहिणीला भेटायची खूप इच्छा होती. परीक्षा संपल्यावर तो मुंबईला येतो. राजू खेडेगावातला, त्यामुळे त्याचे खाणे आडदांड, कपडे साधे. मग त्याची त्यावरून चेष्टा होते. दीप, उज्ज्वल या दिरांच्या मुलांच्या खोलीत त्याची बहिण झोपण्याची व्यवस्था करते; पण ती मुले त्याला खूप त्रास देतात. त्याच्यामुळे आपली टीम क्रिकेटची मॅच हरलो म्हणून राजूला खूप मारतात. आपल्यावरून बहिणीच्या घरात रणकंदन माजणार याची कल्पना आल्यावर तो आपण होऊन गावी परत जाण्याचा निर्णय घेतो. आईची आठवण येते, असे खोटे कारण देतो. राजूचा समजूतपणा आणि त्याची ताई रोहिणीचा सोशिकपणा या कथेतून ठळकपणे समोर येतो.
आयुष्यात कधी कधी योगायोगाने चांगली माणसं भेटतात आणि आयुष्य बदलून जातं. त्याची कथा किस्मत कनेक्शनमध्ये आहे. रघुनाथ या तरुणाची ही करूण कथा आहे. आई-वडील अपघातात गेल्यानंतर काका त्याला फसवतात आणि तो अक्षरश: रस्त्यावर येतो. योगायोगाने मित्र भेटतो आणि त्याच्या ओळखीने उत्तम नोकरी मिळते. राधिकासारखी सुस्वभावी पत्नी अनाथाश्रमात देणगी द्यायला गेला असता मिळते. त्याचा सुखाचा संसार सुरू होतो. निर्झरासारखी गोड मुलगी त्याच्या घरी येते. तो मुलीला बागेत फिरायला घेऊन जात असतो आणि एकदा त्याची निवृत्त कर्नल विश्राम जयकरांशी ओळख होते. हे आजोबा निर्झराच्या प्रेमात पडतात. निर्झराबरोबर ते आजोबांचा वाढदिवसही साजरा करतात. शेवटी आजोबांच्या बंगल्यात ती सगळी एकत्र राहण्याचा निर्णय घेतात. किस्मत कनेक्शनने रघुनाथला वडील मिळतात आणि वर्तुळ पूर्ण होते.
धनंजय आणि रमा यांचा मुलगा निरंजन याची वेगळ्या विचारांची आणि आजच्या तरुणांना मार्गदर्शक ठरेल अशी कथा निर्णय ज्याचा त्याचा यामध्ये आली आहे. धनंजय हे आयएएस होऊन सचिवालयात सचिव पदावर असतात. त्यांना वाटत असते, आपल्या मुलांनी शिकून आपले नाव पुढे न्यावे. निरंजनचे आजोबा ध्येयवादी शिक्षक होते. गावासाठी खूप काम केले होते.त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून निरंजनला गावात जाऊन करियर करायचे होते. त्यासाठी त्याला एम.ए. करून टाटा इन्स्टिट्यूटमध्ये एमएसडब्ल्यू करायचे होते आणि आपले खेडेगाव सुधारायचे होते. त्या गावात प्राथमिक आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, शेतीतली नवी तंत्रे आणायची होती. त्यासाठी त्याने पूर्ण प्लॅनिंग करून आपल्या समविचारी मित्रांची एक टीम बनवली होती. कामाची ब्ल्यू प्रिंटही तयार केली होती. हे सगळे त्याने वडीलांना सांगिल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो आणि त्यांचा विरोध मावळतो. आजचे सुशिक्षित तरुण विचारपूर्वक कसे काम करतात हे सांगणारी ही कथा आहे.
पत्राच्या माध्यमातून साकार झालेली प्रिय लाडक्या लेकीस ही कथा आहे. मनात सतत असुरक्षिततेची भावना असलेले भूषण हे वडील आपल्या ईशानी या लेकीला आपली कथा अगदी त्यांच्या आई – वडीलांच्यापासून सांगतात. लहानपणी आई आणि बाबांची कडाक्याची भांडणे व्हायची आणि एकदा आई घर सोडून जाते, ते त्यांना आठवते. त्यामुळे त्यावेळेपासून नाती निभावून नेण्याची भीती त्यांच्या मनात बसलेली असते. ईशानीची आई वृंदा गरोदर राहते तेव्हा या बाळाची जबाबदारी आपण पेलू शकू का ही शंका त्यांच्या मनाला छळत राहिली होती. ईशानी मोठी होते, तिचे गुजराती उद्योगपती असलेल्या श्रीमंत मुलाशी प्रेम जुळते. त्यावेळी आपण लहान कंपनीचे मालक. तेव्हा दोन कुटुंबात वाद तर होणार नाहीत ही शंका त्यांच्या मनात येतेच; पण एकूण आपली पत्नी वृंदा आणि मुलगी ईशानी यांच्यामुळे त्यांची असुरक्षितता, भीती, नाती निभावण्याबद्दलची साशंकता कशी हद्दपार होते हे मानसिक आंदोलनातून कथेत येते.
नागीन, उंदीर नि मधुआत्या आणि सरलामामींचा सल्ला या दोन विनोदी ढंगांच्या कथा आहेत. नीराताईंना नागीण रोगाचा त्रास सुरू होतो. त्यावेळी त्यांचे पती परदेशी गेलेले असतात. घरी फक्त काम करणार्या गोदूताई. नागीण झाल्याची बातमी सर्व गावभर पसते आणि त्यांना मैत्रिणी अनेक फुकटचे सल्ले देत राहतात. बातमी कशी काय ती गावाला जाते आणि गावच्या पंच्याऐंशी वर्षांच्या मधुआत्या त्यांची काळजी घ्यायला येतात. स्वत: चमचमीत जेवतात आणि नीराताईंना वरणभात खावा लागतो. एकदा गोदूताईंना चिवडा, लाडू असे चमचमीत पदार्थ करायला लावतात आणि त्याच्या वासाने उंदीर स्वयंपाक घरात घुसतो. उंदराला पिंजरा आणून बंदिस्त केले जाते. मधुआत्या खूष होतात. आपल्या घरी आलेल्या मधुआत्यांसारख्या नसत्या पाहुण्याची ब्याद घालविण्यासाठी नीराताई गोदाबाई आणि माळीबाबा यांच्या मदतीने जो प्लॅन करतात आणि मधुआत्या गावी कशा पळतात ते विनोदी पद्धतीने सांगणारी ही कथा आहे.
कमल आणि विमल या दोघी वर्गमैत्रिणी. लग्नानंतरही त्या शेजार-शेजारच्या बंगल्यात रहायला येतात. एकदा त्या दोघींचं कडाक्याचं भांडण होतं आणि ते मिटताना जो विनोदी प्रकार घडतो, तो सांगणारी ही कथा आहे. भांडणानंतर कमल एका साप्ताहिकातील सरलामामींचा सल्ला वाचू लागते. एकदा सरलामामी कमलला भरतकामाच्या नमुन्याचे प्रदर्शन करायचे सूचवतात आणि प्रदर्शनाच्या उद्घाटनाला येऊ असेही सांगतात. उद्घाटनाला येतात तेव्हा सरलामामी म्हणजे कमलची मैत्रिण विमलच निघते. अशा तर्हेने हास्यामध्ये दोघींचे भांडण मिटते.
आत्मशोध, आदिशक्ती आणि मृगतृष्णा या तीन अध्यात्मिक पातळीवरच्या कथा आहेत. महेंद्र-गौरी यांचा उच्चभूषित मुलगा चंद्रशेखर याला अध्यात्मिक अनुभूतीची जी ओढ लागते आणि त्यासाठी तो जे अथक प्रयत्न करतो ते सांगणारी आत्मशोध ही कथा आहे. मानवी अस्तित्व, चैतन्य याचा शोध घेण्यासाठी चंद्रशेखर निघतो आणि गुरूंकडे जातो. शेवटी पॉंडेचेरिला अरविंदाश्रमात येतो. इथे त्याला कळते, आपली अंतस्थ ऊर्जा बाह्य मनात उतरल्यानंतर निर्माण झालेली ऊर्जाभारित अवस्था निरंतर राहणं हे साधनेचं अंतिम उद्दिष्ट असतं. आणि तो आपल्या आत्मशोधाच्या मार्गावर पुढे जातो. गौरी म्हणजेच आदिशक्ती. हिची महती सांगणारी कथा आदिशक्तीमध्ये येते. तर मृगतृष्णा या कथेत मनातील मृगतृष्णेचा तेढा सुटणे म्हणजे सत्याचा सूर्य प्रकट होणे होय, हे सांगितले आहे. एकदा काय झालं ही कथा एक पंजाबी लोककथा असून त्यात देव प्रत्येकाला योग्य ते फळ देतो, योग्य तो न्याय करतो, हा संदेश दिला आहे.
एकूण विविध ढंगांच्या या कथा वाचताना मनोरंजन होते आणि सर्व प्रकारच्या वाचकांना त्या वेगळ्या वातावरणात घेऊन जातात.
पुस्तकाचे नाव – कथारंजन
लेखिका – माधवी कुंटे
प्रकाशक – सुकृत प्रकाशन, सांगली मोबा.९८५०५ ४९९९०
मुखपृष्ठ – श्रीकृष्ण ढोरे.
पृष्ठे : 215, मूल्य : 325 रुपये
1 comment
ज्येष्ठ लेखक संपादक श्री अशोक बेंडखळे यांनी माझ्या कथासंग्रहांचा सविस्तर परिचय दिला तो आपण आपल्या न्युज पोर्टल वर दिलात यासाठी मन:पूर्वक धन्यवाद