July 27, 2024
Book Review of Saripat Ankush Gajre
Home » नव्या जगाची वाट : सारीपाट
मुक्त संवाद

नव्या जगाची वाट : सारीपाट

अंकुश गाजरे यांच्या “सारीपाट” या कथासंग्रहात भेटणारी माणसं ही मध्यमवर्गीय जगणं जगणारी आहेत, जगण्याची रोजची लढाई लढणारी, हरणारी आणि फक्त हरणारीच, माणस आहेत. त्यांच्या जिंकण्याचा पण उत्सव साजरा होतो.

नवनाथ गोडसे

ज्ञानक्रांती अकॅडमी, पंढरपूर

पंढरपूर आणि परिसरात वाचक चळवळ जिवंत ठेवण्याचं काम ज्यांनी केलं ते राजेश पवार आणि गुरुवर्य ज्योतीराम गायकवाड यांच्या तालमीत तयार झालेला. माती, माताबरोबर, मातीतल्या माणसांच्या कथा समर्थपणे पेलण्याच काम अलीकडे अंकुश गाजरे यांनी केलेलं आहे. त्यांच्या येणाऱ्या सारीपाट या कथासंग्रहाचं वाचन झालं. कथेत भेटलेली माणसं आणि त्यांच्या कथा अगदी साध्या वाटल्या पण त्या साध्या कथांमध्ये जगण्याचं सार सामावलं आहे.

१९९१ च्या नव्या प्रवाहात आणि जागतिकीकरण, उदारीकरण, आणि खाजगीकरण धोरणात जगण्याचे नवे प्रवाह आणि वाटा तयार झाल्या पण सर्वसामान्य लोकांचे जगण्याचे संदर्भ तेच राहिले. अन्न, वस्त्र, निवारा या गरजांना आरोग्य आणि शिक्षण हे दोन डब्बे लागून मुलभूत गरजांची रेल्वे लांब झाली. खरंतर सारीपाट मधल्या कथा या नव्या काळातील आहेत. स्वातंत्र्यानंतर 50 वर्ष साजऱ्या करणाऱ्या लोकांना त्यांचे जगण्याचे प्रश्न सुटले नाहीत पण त्यात वाढ मात्र नक्की झाली. पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून गरिबी कमी करण्याचा सरकारी कार्यक्रम… बाराव्या योजनेतपण तोच होता परंतु गरिबी कमी झाली नाहीच. लोकशाहित अनेक वाद आहेत परंतु सगळ्या वादात सर्वसामान्य माणसाच्या पोटात वाढणारा भूकवाद कधीच कमी झाला नाही, त्या भूकवादाच्या या कथा आहेत.

अंकुश गाजरे यांच्या “सारीपाट” या कथासंग्रहात भेटणारी माणसं ही मध्यमवर्गीय जगणं जगणारी आहेत, जगण्याची रोजची लढाई लढणारी, हरणारी आणि फक्त हरणारीच, माणस आहेत. त्यांच्या जिंकण्याचा पण उत्सव साजरा होतो. घराला समृद्ध करण्यासाठी आयुष्य पणाला लावणारी म्हातारी पोराच्या आणि सुनेच्या आरोपाने नवी “वाट” पकडते तेव्हा पुंडलिकाचा वसा बाळगणारा एखादा पांडबा पण भेटतो. सुखी संसाराच्या स्वप्नांची वाट लागल्यावर, एक स्त्री मोडलेलं घर, स्वतः विणून उभा करू शकते हे चित्र सुंदर रेखाटले गेले आहे.

आयुष्यभर साथ देत उभा केलेला “सारीपाट” एकाच्या जाण्याने कसा उध्वस्त होतो, हा अनुभव विलक्षण आहे. जगण्याची हरणारी लढाई मरणात रुपांतरीत करताना पण “पैज” जिंकणारा किशा. ही मानवी दुखाःची उत्तुंग पण साधी शिखरे आहेत. शिकून पण रोजीरोटीचा आणि अपेक्षांचा प्रवास पूर्ण होत नाही तेव्हा मरणाला जवळ करणारा बेरोजगार तरूण आम्हाला भेटतो. नवऱ्याच्या माराने मरणारी स्त्री तिच्या मागे लेकरांना “वनवास” ठेऊन जाते.

आर्थिक नियोजन योग्य न केल्याने नवा व्यवसाय पण कसा फसतो, त्यामुळे समाजाला आर्थिक साक्षर होणं किती गरजेच आहे हे कळायला लागतं. इंटरनेटच्या जगात साधं मास्तरकीचं स्वप्न पण डाऊनलोड होत नाही. त्यामुळे स्वप्न करपून जातात, आणि नात्याच्या मायेची पाखर संपून जाते हि संकल्पना वेगळी वाटते. जीवाची सहल करण्यापेक्षा आईचा मोकळा गळा राहू नये, आई बापाच्या प्रेमाची सहल आयुष्यभर मिळावी याचं स्वप्न बघणारा मुलगा भेटत राहतो. या सगळ्या कथात भेटणारी माणसं एखाद्या संकटाने हरतात, पण ती मोडत नाहीत, हरत नाहीत, डरत तर अजिबात नाहीत. ती उठतात… पुन्हा उभा राहतात, जिंदगीच्या सारीपाटावर स्वतच्या स्वप्नांचे दान टाकत नवा डाव उभा करतात.

अंकुश गाजरे साध्या माणसांच्या व्यथा मांडण्यात यशस्वी झाले आहेत. ‘सारीपाट’ हि आपलीच, आपल्या अवतीभोवती फिरणाऱ्या माणसांच्या कथा आहेत. कथेत कुठंतरी आपणच आपल्याला भेटत राहतो. “सारीपाट” हे पुस्तक वाचून आपल्याला आपला शोध घेता येतो, यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवं.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

चला आळंदीला जाऊ। ज्ञानेश्वर डोळा पाहू।

कोल्हापूर येथील मराठी बालकुमार साहित्य सभेचे पुरस्कार जाहीर

चुका जाणून त्या सुधारणे हा सुद्धा ज्ञानी होण्याचा मार्गच

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading