March 23, 2023
Tips for donation article by rajendra ghorpade
Home » दान करा, पुण्य करा, पण…
विश्वाचे आर्त

दान करा, पुण्य करा, पण…

दान कोणाला करायचे? दान कधी करायचे? दान का करायचे? याचा सर्वांगीण विचार करायला हवा. तरच दान लाभदायक ठरते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

नाना कृषीवळु आपुलें । पांघुरवी पेरिलें ।
तैसें झांकी निपजले । दानपुण्य ।। २०६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा

ओवीचा अर्थ – अथवा शेतकरी पेरलेले बीज जसे माती टाकूण झाकतो, त्याप्रमाणे तो आपल्या हातून झालेले दान आणि पुण्य झाकतो.

चांगले उत्पादन येण्यासाठी बीजाची पेरणी योग्य प्रकारे करावी लागते. योग्य खोलीवर, योग्य अंतरावर बीजाची पेरणी झाली तर त्याची वाढ उत्तम होते. पेरणी करताना बीज उघडे पडले नाही ना याची काळजी शेतकरी घेतो. बीज उघडे पडले तर पक्षी हे बीज खाऊ शकतो. बीजाला फुटही योग्य प्रकारे फुटली जात नाही. यामुळे पेरणी वाया जाण्याचा मोठा धोका असतो. यासाठी पेरणीच्यावेळी बीज मातीने झाकले गेले आहे की नाही हे पाहणे गरजेचे आहे.

दान किंवा केलेले पुण्य सुद्धा असेच झाकावे असे ज्ञानेश्वर माऊली सांगते. आपण दानशूर आहोत असा डंका पिटवायचा हे योग्यच नाही. आपण किती पुण्यवान आहोत हे इतरांना सांगणेही चुकीचेच आहे. यामुळे अहंकार वाढू शकतो. मीपणा येऊ शकतो. यासाठी याची वाच्यता करणे चुकीचेच आहे. पण दानपुण्य झाकायचे म्हणजे नमके काय करायचे?

कर्ण दानशूर होता. त्याची समाजात तशी प्रतिमाही उभी राहिली होती. त्याच्याकडे एखाद्याने काही मागितले आणि ते त्याने दिले नाही असे कधीच घडले नाही. इतका तो शब्दाला मानणारा होता. पण त्याचा हा दानशूरपणाच त्याच्या मृत्यूचे कारण ठरला. त्याने स्वतःकडील कवचकुंडले दान केली. कवचकुंडले होती तोपर्यंत कर्णाला ठार मारण्याचे सामर्थ्य कोणत्याही योध्दयात नव्हते. शब्दाला जागणाऱ्या कर्णाने ती दान केली. कर्णाकडे वीरता होती पण त्याचा वापर धर्माच्या रक्षणासाठी नव्हता. धर्माच्या विरुद्ध वापरली गेल्यानेच त्याच्याविरुद्ध कपट केले गेले. यातच त्याचा अंत झाला. यासाठी दान कोणाला करायचे? दान कधी करायचे? दान का करायचे? याचा सर्वांगीण विचार करायला हवा. तरच दान लाभदायक ठरते.

विचार न करता केलेले दान हे दान नसते. जे दान स्वतःच्याच जिवावर उठते ते दान कसे असू शकेल. याचा विचार व्हायला नको का? दान जरूर करावे. पण त्याच्या परिणामांचा विचार करून दान करायला हवे. आपण दान करण्याइतपत योग्य आहोत का? आपली ती पात्रता आहे का? याचाही विचार जरूर करायला हवा. आपल्याच घरच्यांचे पोट आपण व्यवस्थित भरू शकत नसेल तर देव देवस्थानांना अन्नदानासाठी मदत देण्याच अधिकार काय? यासाठी स्वतः दान करण्यायोग्य आपण आहोत का? हे पाहावे. तरीही दान केले तर याची वाच्यता करू नये. अन्यथा ते दान तुमच्यासाठी लाभदायक न ठरता दुःखदायक ठरू शकते. यासाठीच दान झाकावे. दान झाकले तर निश्चितच त्यातून सत्कर्माचे झाड उभे राहील.

Related posts

गुरुकृपेने जीवनात पौर्णिमा…

ब्रह्मज्ञानी होण्यासाठीचा मार्ग

पिके, झाडांशी मैत्री केल्यास त्यांचीही भाषा समजते

Leave a Comment