मराठी चित्रपटसृष्टीतील कॅमेरामन प्रकाश गणपतराव शिंदे यांचे ३० डिसेंबर रोजी निधन झाले. त्यांनी धुमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, थरथराट, दे दनादन, तांब्याचा विष्णू बाळा अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांचे छायाचित्रण केले होते. त्यांच्या काही आठवणी त्यांची कन्या सुप्रिया शैलेश मोकाशी यांनी या लेखातून मांडल्या आहेत.
माझे बाबा, माझ्यावर खूप प्रेम करायचे. त्यांना सतत माझा सहवास हवा असायचा. मी लहान होते तरीही ते मला शुटींगच्या सेटवर घेऊन जात असत. सर्वांना प्रेमाने माझी ओळख करून द्यायचे. कोल्हापूरात बाबांचे शुटींग सुरु आहे आणि त्यांनी मला सेटवर नेले नाही असे कधी झाले नाही. मोठ मोठे कलाकार सेटवर होते. एकदा सेटवर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचे शुटींग सुरु होते. मला त्या सेटवर बाबा घेऊन गेले होते. अशोक सराफ यांच्याकडे बोट करून बाबा मला म्हणाले हे कोण तर अशोकमामा. मग मी त्यांना नेहमी अशोकमामा म्हणून हा मारायला लागले. त्यांनतर पुढे बाबाही त्यांना अशोकमामा म्हणू लागले. सेटवर अनेक क्रु मेबर्स असायचे. त्यांना अशोक सराफ यांना बोलवताना अडचण वाटायची. मग पुढे ते सुद्धा त्यांना अशोकमामा म्हणून हाक मारू लागले. सेटवर यापुढे अशोक सराफ यांना सर्वजण अशोकमामा म्हणूनच हाक मारू लागले. बाबा एखाद्या कलाकाराची ओळख करून द्यायचे त्याच नावाने तो कलाकार सेटवर ओळखला जायचा. इतके प्रेम या मोठ मोठ्या कलाकारांनी माझ्या बाबांवर केले.
Join and Like Our Page इये मराठीचिये नगरी for updates and Details… https://www.facebook.com/IyeMarathichiyeNagari/
अभिनेत्री रंजना यांचा हट्ट
अशीच एक आठवण ज्येष्ठ अभिनेत्री रंजना यांच्यासोबतही घडली. झाकली मुठ सव्वा लाखाची या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु होते. यामध्ये एका बाल कलाकाराची गरज होती. लहान मुल कोणाचे घ्यायचे हा प्रश्न होता. मला नेहमीच बाबा सेटवर घेऊन जायचे. अवघे सोळा दिवसांची मी होतेय पण तरीही बाबा मला सेटवर घेऊन गेले. यावेळी अन्य व्यक्तींची लहान मुले या चित्रपटाच्या सेटवर आणण्याचा विचार सुरु होता. यावेळी रंजना यांनी आग्रह धरला की प्रकाश शिंदे यांच्या मुलीलाच मी माझ्या हातात घेणार. अन्य कोणाचे बाळ मला नको. आणि घडलेही तसेच. रंजना यांचा हा हट्ट दिग्दर्शकाला पूर्ण करावा लागला. इतके प्रेम हे मोठे मोठे कलाकार माझ्या बाबांवर करत होते.
बाबांनी अनेक कॅमेरामन घडवले
मैने प्यार किया या चित्रपटाचे कॅमेरामन राजन किनगी एकदा म्हणाले होते की प्रकाश शिंदे यांच्यामुळेच मी कॅमेरामन झालो. त्यांनी माझ्या बाबांचे खूप कौतुकही केले होते. अनेक नवीन कॅमेरामन बाबांनी घडवले. पैशाचा कधी विचार त्यांनी या व्यवसायात केला नाही. मदत करणे माणूसकी जपणे हेच त्यांनी आयुष्यभर केले. यामुळेच अशोक सराफ, लक्ष्मिकांत बेर्डे, सचिन, विजय चव्हाण, विजय गोखले, सचिन खेडेकर, राहूल सोलापूरकर असे अनेक मोठे मोठे कलाकार आमच्या घरी नेहमी येत. बाबा नेहमी म्हणायचे माणसे जपली पाहीजेत. पैसा काय आज आहे, उद्या नाही पण माणसे जपायची.
कोल्हापुरातील संस्कृती, ताज्या घडामोडी आदी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा कोल्हापूर प्रतिबिंब फेसबुक पेजवर https://www.facebook.com/groups/KolhapurCulture/
विविध पुरस्कारांनी सन्मान
अशी ही बनवाबनवी, थरथराट, धुमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, गोडी गुलाबी, सून लाडकी सासरची, नाथा पुरे आता, तांबव्याचा विजुबाळा, घाबरायचं नाही, माझा छकुला, अशी असावी सासू, पैज लग्नाची या चित्रपटांसाठी बाबांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. या व्यतिरिक्त कै. अरविंद लाड, ज्येष्ठ छायाचित्रकार कै प्रतापसिंह मोहिते पाटील, रामभाऊ चव्हाण स्मृति पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी बाबांना गौरवण्यात आले आहे. अनेकांची व्यक्तीरेखा कॅमेऱ्यात टिपणारा माझा बाप आज गेला असला तरी त्यांनी घडवलेल्या व्यक्ती रेखा, जपलेली माणसं आणि माणसूकीची जपणूकीची शिकवण आजही आम्हाला प्रेरणा देणारी आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.