ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे यांच्या साहित्य निर्मितीचा शताब्दी सोहळा २६ मे २०२४ ( रविवारी ) रोजी सायंकाळी पाच वाजता कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे होत आहे. त्यानिमित्ताने….
प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार
ज्येष्ठ कवी व वक्ते
खेडोपाड्यातून लिहिती झालेली अनेक मंडळी ग्रामीण साहित्याच्या क्षेत्रात नावारूपाला आली तर काही लिहिता लिहिता स्वतःच्या मर्यादांमध्ये अडकून पडली. नलगे सरांनी केवळ साहित्यनिर्मिती केली नाही तर ग्रामीण साहित्याच्या कक्षा रूंदावत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रतिभेला धुमारे फुटावेत आणि अव्यक्त अनुभवांना शब्दांचे कोंदण लाभावे यासाठी आयुष्यभर आटापिटा केला. नलगे सर केवळ स्वतः लिहित राहिले नाहीत, तर त्यांनी इतरांना लिहितं केलं.
कथा, कादंबरी, कविता, समीक्षा, चित्रपटांसाठी लेखन अशा अनेक प्रकारच्या साहित्यविश्वात चंद्रकुमार नलगे यांनी आपली नाममुद्रा ठळकपणाने उमटवली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून विद्यार्थी जीवनात आम्ही ज्यांची भाषणे ऐकल्याने आम्हाला साहित्याची गोडी लागली अशा साहित्यिकांमध्ये प्रा. नलगे यांचे स्थान खूप वरचे आहे. छत्रपती शहाजी महाविद्यालयाच्या परिसरात किंवा गावखेड्यांमध्ये जिथे जिथे साहित्य संमेलने भरायची त्या प्रत्येक ठिकाणी नलगे सरांचे नाव व आवर्जून उपस्थिती असे. आम्ही श्रोते म्हणून किंवा नवोदित कवी म्हणून संमेलनांमध्ये कविता वाचण्यासाठी जात असू. यावेळी नलगे सरांसारख्या मान्यवरांकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनातून आपण नेमके कोठे आहोत याचे भान येत असे. कधी आपण कविता लिहिणे थांबवावे असे मनात येई, पण अशावेळी नलगे सरांचे लिहिणाऱ्या हातांना प्रोत्साहन देणारे मौलिक शब्द नव्यानं मनाला उभारी देत.
रंग लोकसंस्कृतीचे या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगीची एक आठवण पाहाण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा...
नलगे सरांनी अनेकांना लिहितं करण्याबरोबर अनेक गावांना वाचन चळवळीशी जोडून घेतलं. खेडेगावातून होणारी साहित्य संमेलनं म्हणजे गावासाठी उत्सवच ! अंगण सजवणाऱ्या रांगोळ्या, लेझीम-झांजपथक, वारकऱ्यांचे भजन यासह निघणारी साहित्यपालखी या सगळ्यातून गावागावात साहित्यिक वातावरण तयार होतं. या वातावरणातून लेखनाला व वाचन संस्कृतीला बळ मिळतं. १९६३ साली नलगे सरांनी भेडसगावसारख्या डोंगराळ भागातील गावामध्ये महाराष्ट्रातील पहिलं ग्रामीण साहित्य संमेलन भरवलं. एका अर्थी भेडसगाव ही ग्रामीण साहित्य संमेलनांची गंगोत्रीच !
माझ्या नेज या हातकणंगले तालुक्यातील गावात नलगे सरांनी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून केलेले भाषण आजही गावकऱ्यांच्या लक्षात आहे. सरांनी ग्रामीण साहित्य संमेलनं व वाचन संस्कृतीसाठी केलेल्या चळवळीबद्दल त्यांचे आजवर अनेक ठिकाणी सत्कार करण्यात आले आहेत.
‘चंद्रबनातील सावल्या’, ‘रातवा’, ‘आणखी एक जन्म’, ‘शल्य त्या अधुऱ्या स्वप्नांचे’ यासारखी नलगे सरांची पुस्तके वाचल्यावर गावखेड्यातलं घर, कुटुंब, घरातील कुरबुरी, लग्नकार्य, चटका लावणारे मृत्यू, गाव-गल्लीतील वातावरण व राजकारण, ग्रामीण भागातील माणसांचं निसर्गाशी असणारं नातं अशा कितीतरी गोष्टी मनावर बिंबतात. ‘अंगाई’सारखा चित्रपट, त्यातील वात्सल्याची जाणीव ही मनामनातील संवेदनशीलता व्यक्त करणारी म्हणून महत्त्वाची ठरते व सर्वांना आपलीशी वाटते. ‘रातवा’, ‘आणखी एक जन्म’ व ‘असा कसा जन्म’ या त्रिखंडात्मक आत्मकथेतून नलगे सरांनी आपले संपूर्ण जीवन वाचकांसमोर जिवंत केले आहे.
चंद्रकुमार नलगे यांचे कोसळ हे पुस्तक खरेदी करण्यासाठी लिंकवर क्लिक करा – https://amzn.to/3Vfxwp1
नवा लिहिणारा माणूस नलगे सरांच्याजवळ गेला तर तो आजवर रिकाम्या हातानं परत आला असं कधी घडलं नाही. सरांचं मार्गदर्शन, प्रोत्साहन व लेखनाबाबत केलेल्या सूचना म्हणजे जणू कित्ता गिरवून घेणे. नव्यानं लिहिणाऱ्या कोणाही मुला-मुलीला सरांनी कधीच नाऊमेद केलं नाही. लेखक म्हणून मुला- मुलींची जडणघडण भक्कम कशी होईल, समाजाचं सूक्ष्म वाचन, त्यावरील चिंतन कसं करता येईल आणि आपल्या अंतरंगातील जाणीवांची खोली कशी वाढवता येईल याबाबत नलगे सर नेहमीच मार्गदर्शन करत असतात. आजही अनेकांच्या अनेक प्रकारच्या लेखनासाठी नलगे सर उर्जास्त्रोत म्हणून कार्यरत आहेत. नवलेखक व ग्रामीण साहित्य संमेलनांचा ते आधारवड आहेत.
कोकरूड, शिराळा, भेडसगाव येथील जगण्याच्या निमित्तानं नलगे सरांनी तळागाळातील माणसांची सुख-दुःखं सातत्यानं प्रातिनिधिक स्वरूपात मांडली. संकटे आली तर त्यांना धीरानं सामोरं जाऊन त्यातून जीवनाची नवी चौकट कशी उभारावी याचा आदर्श नलगे सरांनी साहित्यातून व प्रत्यक्ष आपल्या जगण्यातून घालून दिला आहे. एक सोज्वळ, वात्सल्यमूर्ती असणारे, मातृहृदय असणारे समाजशिक्षक व लेखक ही नलगे सरांची खरी ओळख आहे. नलगे सरांच्या साहित्यनिर्मितीचा शतक महोत्सव साजरा होत असताना सरांच्या ग्रंथलेखनाप्रमाणेच सरांच्या जीवनाच्या वाटचालीचीही शताब्दी साजरी व्हावी ही प्रार्थना !
प्रा. डॉ. चंद्रकांत पोतदार
ज्येष्ठ कवी व वक्ते
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.