December 11, 2024
Home » कापडी मास्कवर रसायनांच्या थराचा वापरामुळे विषाणूंचा 99.9999 टक्के नायनाट
संशोधन आणि तंत्रज्ञान

कापडी मास्कवर रसायनांच्या थराचा वापरामुळे विषाणूंचा 99.9999 टक्के नायनाट

कपड्यावरील विषाणू आणि बँक्टेरिया सहजासहजी मारले जावेत यासाठी ठराविक रसायनाचा थर कपड्यावर वापरून सूर्यप्रकाशाच्या मदतीने हे विषाणू मारणे शक्य असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भातील एक शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. काय आहे तंत्राज्ञान? त्याचे फायदे काय ? यावर माहिती सांगणारा हा लेख…

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

संसर्गजन्य रोग हे मानवी जीवनावर मोठा परिणाम करतात. कोरोना महामारीचा धोका अद्यापही कायम आहे. मास्क हा आता आपल्या नित्य वापराचीच गोष्ट झाली आहे. कोरोनापासून बचावासाठी आपण मास्क वापरतो खरे पण ते किती वापरण्या योग्य आहेत याचा कधी आपण विचारच करत नाही. मास्क वापरूनही अनेकांना कोरोना झाला आहे. म्हणजेच ते योग्य पद्धतीने वापरणे तितकेच गरजेचे आहे. मास्क आणि पीपीई कीटमुळे कोरोना रोखण्यास मदत होते, पण यातूनही कोरोना पसरण्याचा धोका अधिक आहे.

पीपीई कीटमुळे फक्त कोरोनाचे विषाणू रोखले जाऊ शकतात पण पीपीई कीटवर असणारे विषाणू जीवंत असल्याने त्यातून संसर्गाचा धोका आहेच. तसेच पीपीई कीटची विल्हेवाट सुद्धा योग्य पद्धतीने करणे गरजेचे असते. कापडी मास्क वापरण्यास सोईचे जरी असले तरी त्या मास्कवरील विषाणूही तितकेच धोकादायक असतात. कपड्यावरही विषाणू जीवंत राहातात. अशाने संसर्गजन्य विषाणू पसरण्याचा धोका हा कायम आहे. यावर अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी नवीन तंत्रज्ञान शोधून काढले आहे. कपड्यावरील विषाणू आणि बँक्टेरिया सहजासहजी मारले जावेत यासाठी ठराविक रसायनाचा थर कपड्यावर वापरून सूर्यप्रकाशाच्या मदतीने हे विषाणू मारणे शक्य असल्याचे या संशोधकांनी स्पष्ट केले आहे. या संदर्भात एसीएस अप्लाईड मटेरियल्स अँड इंटरफेसेस या संशोधन पत्रिकेत पेक्सीन टँग, झेंग झाँग, अहमद इल-मोगाझी, निचरी विसूथिफेट, नितीन नितीन, गँग सून या संशोधकांचा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे.

कोरोनामुळे सारे जग हैराण झाले आहे. लाखो लोक मृत्यूमुखी पडले आहेत. अब्जावधी नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मास्क आणि पीपीई कीटमुळे कोवीड पसरण्याचा धोका कमी झालेला नाही. परंतु पीपीई कीटमुळे फक्त पॅथोजन रोखले जाऊ शकतात पण पीपीई कीटवर असणारे पॅथोजन जीवंत असल्याकारणाने पसरण्याचा धोका वाढतो. मास्कवरही विषाणू जीवंत राहात असल्याने पसरण्याचा धोका कायम आहे. पण संशोधानातून कपड्यावरील पॅथोजन मारण्यात संशोधकांना यश आले आहे. एकमेकांना होणारा संसर्गाचा धोका कमी होतो. यामुळे पर्यावरण घातक पीपीई कीटला हा उत्तम पर्याय होऊ शकणार आहे. तसेच कापडाचा वापर करणे शक्य झाल्याने सर्वसामान्यासाठीही हे सहज वापरता येणे शक्य आहे. मास्क आणि किटचाही पुनर्वापर होऊ शकणार आहे. यामुळे खर्चातही बचत होणार आहे. मास्क आणि किट कमीत कमी दहा वेळा धुवून वापरणे शक्य असल्याचे या संशोधनात म्हटले आहे.

काय आहे हे विषाणू मारण्याचे तंत्रज्ञान ?

शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्राचे प्रा. कल्याणराव गरडकर हे अशाच प्रकारच्या तंत्रज्ञानावर अभ्यास करत आहेत. त्यांनीही अशा संरक्षक मास्कची उपयोगीता विषद केली आहे. संशोधकांनी शोधलेल्या तंत्रज्ञानाची माहिती देताना श्री. गरडकर म्हणाले, कापडावरील विषाणू मारले जावेत यासाठी ठराविक रसायनंचा थर कपड्यावर वापरण्यात येतो व सूर्य प्रकाशाच्या मदतीने हे विषाणू 99.9999 टक्के मारले जाऊ शकतात. प्रथम कापड सोडियम हायड्राॅक्साईडच्या द्रावणात बुडविले जाते. नंतर कापडावर 2-डायइथाईल अमिनो इथाईल क्‍लोराईडचा पातळ थर देण्यात येतो. हा थर घनभाराचा असल्याने ऋणभाराच्या रंगद्रव्यात प्रामुख्याने रोज बेंगालमध्ये हे कापड बुडवण्यात येते.

या प्रक्रियेनंतर कापड पुन्हा पाण्याने भिजवले जाऊन 80 अंश सेल्सिअस तापमानाला कापड वाळविले जाते. त्यानंतर फोटोसिंथिसिस रोज बेंगाल ऍन्थाक्‍युनोन सल्फेट या रंगद्रव्यात पुन्हा भिजवले जाते आणि वाळवले जाते. त्यानंतर अतिशय मारक क्षमतेचे रिऍक्‍टिव्ह ऑक्‍सिजन स्पिसिज (आरओएस) या कापडावर तयार होतात. कपड्यावर विषाणू पडताच ते मरतात. विशेषतः टी -7 बॅक्‍टेरिओफेज हे विषाणू 99.9999 टक्के मारले जातात, असेही गरडकर यांनी सांगितले.

संशोधनाचे हे आहेत फायदे

  • पर्यावरणास घातक ठरणारे पीपीई कीट ऐवजी कपड्यांचा वापर शक्य होणार आहे.
  • सूर्यप्रकाशात वाळवले जात असल्याने वापरण्यास सहज शक्य.
  • धुता येणारे व पूर्नवापर शक्य असल्याने कचऱ्याचा प्रश्न सुटतो व खर्चात बचत होते.
  • वापरण्यात येणारी रसायने सहज उपलब्ध असल्याने अडचणी कमी.
  • इ कोलाई, एल. इनोक्यु, टी-7बॅक्टेरिओफेज हे विषाणू 99.99999 टक्के सहज मारणे शक्य.
  • दिवसाच्या सूर्यप्रकाशात अवघ्या एका तासात सर्व प्रक्रिया पूर्ण होते.

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading