मातीचे नवीन मडके आणल्यानंतर त्या मडक्यात प्रथम थोडे पाणी घालून पाहावे लागते. ते मडके गळके आहे का ? याची चाचपणी करावी लागतेच. मडके गळके असेल तर, त्यात पाणी साठवणूक होणार नाही. ते मडके निरुपयोगी ठरेल. शिष्याचे मडके गळके तर नाही ना ? सद्गुरूही हेच पाहतात.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – ९०११०८७४०६
घटीं थोडेसें उदक घालिजे। तेणें न गळे तरी वरिता भरिजे।
तैसा परिसौनि पाहिलासि तंव परिसविजे। ऐसेंचि होतसे।। ५१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १० वा
ओवीचा अर्थ – ज्याप्रमाणे घागरीत थोडेसें पाणीं घालावें व तें गळालें नाही, तर आणखी जास्त भरावें, त्याप्रमाणें तूं ऐकावें म्हणून सांगितले तेव्हां तुला आणखी ऐकावें असेंच वाटू लागलें.
सद्गुरू शिष्याचे अवधान पाहतात. वेळोवेळी ते शिष्याला उपदेश करत असतात. त्याचे पालन शिष्य करतो का नाही याचे निरीक्षण ते करतात. त्या उपदेशांनी त्याच्यामध्ये कोणता फरक पडला याचाही विचार ते करतात. मातीचे नवीन मडके आणल्यानंतर त्या मडक्यात प्रथम थोडे पाणी घालून पाहावे लागते. ते मडके गळके आहे का ? याची चाचपणी करावी लागतेच. मडके गळके असेल तर, त्यात पाणी साठवणूक होणार नाही. ते मडके निरुपयोगी ठरेल. शिष्याचे मडके गळके तर नाही ना ? सद्गुरूही हेच पाहतात.
शिष्याला केलेल्या उपदेशाचा उपयोग होत नसेल तर त्याला आणखी उपदेश करण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामध्ये काहीच फरक पडणार नसेल तर त्यावर वेळ तरी का खर्च करायचा ? मोठ्या कंपन्यामध्ये एका कामगारावर वर्षाला किती खर्च केला जातो. याचा ताळेबंद मांडला जातो. त्यानुसार तो त्या कामास पात्र आहे की नाही हे ठरविले जाते. खर्चाच्या प्रमाणात तो काम देत नसेल तर तो कामगार कंपनीसाठी निरुपयोगी ठरतो. त्याला काढून टाकण्याशिवाय कंपनीला दुसरा पर्याय नसतो. अशा कामगारांना पोसून कंपनीची प्रगती कशी होणार ? शेवटी उत्पन्नावरच कंपनीची प्रगती ठरत असते. उत्पन्न कसे वाढवता येईल हा मुख्य उद्देश असतो. निरुपयोगी कामगारांना काढून त्यांच्या जागी त्यांच्यापेक्षा कमी पगाराची व उत्तम काम देणारी माणसे निवडण्यावर कोणत्याही कंपनीचा भर असतो. हा व्यवहाराचा नियम आहे.
अध्यात्मात योग्य शिष्यांचीच त्यामुळे प्रगती होताना दिसते. निरुपयोगी शिष्य आपोआपच या मार्गातून बाहेर पडतात. यासाठी अवधान हे महत्त्वाचे आहे. सद्गुरू शिष्याचे अवधान पाहूनच त्याला मार्गदर्शन करत असतात. कंपनीमध्येही कामगारांवर लक्ष ठेवणारा स्वतंत्र विभाग असतो. कामगाराचे कामांमध्ये लक्ष नसेल तर, कंपनी त्याला निरुपयोगी ठरवते. सद्गुरूही शिष्यावर लक्ष ठेवतात. प्रगती करणाऱ्या शिष्यांना प्रोत्साहन देतात. दुर्लक्ष करणाऱ्यांना मात्र वगळले जाते. यासाठी आपणही व्यवहाराचे हे नियम पाळून आपली प्रगती साधायला हवी. जीवनाचे हे नियम अध्यात्म असो व दैनंदिन व्यवहार असो सर्व ठिकाणी सारखेच आहेत. त्याचे पालन हे व्हायलाच हवे.
पण यामध्ये सद्गुरु जसे निरपेक्ष भावनेने जसे शिष्याची प्रगती पाहातात. तशी वृत्ती कंपनीच्या व्यवस्थापनात असायला हवी. तरच कंपनी प्रगती करू शकते. लक्ष ठेवणारे गुरूच जर शिष्याला योग्य मार्गदर्शन करून त्याच्याकडून प्रगती करून घेणार नाहीत तर त्या शिष्याची प्रगती होणार नाही. यासाठी सद्गुरु कसे आहेत हे जसे महत्त्वाचे आहे. तसे कंपनीचे मालक व काम करणारे वरिष्ठ कसे आहेत हे महत्त्वाचे आहे. वरिष्ठ त्या पद्धतीचे नसतील तर ती कंपनी कधीच प्रगती करू शकणार नाही. सद्गुरुंप्रमाणे मालकांनीही कंपनीमध्ये लक्ष देताना हे विचारात घ्यायला हवे.
वाढणारी सुगरण जर प्रेमाने वाढत असेल तर खाणाऱ्यालाही तसा त्याचा स्वाद अधिक घ्यावा असे वाटते. तसेच येथे आहे. सद्गुरुंनी प्रेमाने दिले तर शिष्य सुद्धा प्रेमाने याचा स्विकार करून प्रगती करतो. त्याला आणखी आध्यात्मिक प्रगती करण्यास प्रेरणा मिळते. कंपनीमध्येही असेच वातावरण मालकांकडून तसेच वरिष्ठांकडून मिळाले तरच त्या कंपनीतील कामगार उत्साहाने काम करून अधिकाधिक प्रगती साधतील. हे मालकांनी विचारात घेतले तरच कंपनीची प्रगती होऊ शकते. वरिष्ठ पातळीवरील गळकी मडकी लक्षात घेऊन त्यांना त्वरीत दुर करायला हवे. न गळणारी मडकी भरली तरच पाणी मिळेल. याचा विचार करायला नको का ? अध्यात्मात सद्गुरु हेच पाहातात न गळणाऱ्या मडक्यावर अधिक भर देऊन त्याची प्रगती साधतात.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.