महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी सुरु केलेली अर्णिमा या कंपनीच्या कार्याबाबत. अर्णिमाचा प्रवास हा गेले आठ वर्षे अखंड सुरू आहे. काहीतरी क्रिएटिव्ह करणे, ज्यामुळे समाजाला त्याचा फायदा होईल हेच स्वप्न उराशी बाळगून अर्णिमाचे कार्य अव्याहत सुरू आहे. कोण आहेत या महिला आणि त्यांनी कोणते कार्य केले आहे ? महिला दिनाच्या निमित्ताने हा लेख…
ऑफिस, घर सांभाळताना पालकांची होणारी कसरत, त्यामुळे मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही, असे चित्र बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते आणि ते स्वाभाविकच आहे. पण गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे मुलांना घरातून त्यांची शाळा, क्लास किंवा इतर ऍक्टिव्हिटीज् ऑनलाईन पद्धतीने कराव्या लागत आहेत आणि कित्येक पालकांनाही त्यांचे ऑफिसचे काम घरातून करावे लागले, तर काही पालक अजूनही घरातून काम करत आहेत. त्यामुळे पालकांनाही मुलांबरोबर वेळ घालवता आला.
मुलांना त्यांच्या वयानुसार खेळ खेळायला, त्यांच्यातील कुतूहल जागे करायला पालकांनीच भाग पाडले पाहिजे असे वाटतेय ना? कारण शेवटी ती मुलंच, आपण जसे त्यांना आकार देऊ तशी वळतील, बरोबर ना?
समजा मुलांना पुस्तकं वाचताना जर त्यांचे आवडते प्राणी, जंगल, त्यातील झाडे, ज्यांच्या विषयी तुम्ही वृत्तपत्रात/ मासिकात वाचताय किंवा त्यांना टीव्हीत पाहताय.. आणि अचानक काहीतरी जादू होऊन ते प्रत्यक्ष तुमच्या समोर अवतरले तर? ! हे शक्य आहे का?
तर हे शक्य केले आहे बेंगलोर येथील ‘थ्रीडी अर्णिमा ऍनिमेशन’ कंपनी ने !! त्यांनी एक नवीन पुस्तक मालिका AR Augma series नावाने छोट्या मुलांसाठी (वयोगट २ ते ७ वर्ष )आणली आहे. स्पोर्ट्स डे ऍट जंगल नावाची एक धमाल चित्रकथा तुम्हाला प्राण्यांच्या जगात घेऊन जाते. जंगलात स्पोर्ट्स डे म्हणजेच क्रीडा दिवस असेल, तर काय काय गमती जमती होतील, ते सांगणारी एक रंजक, कुतूहलजन्य गोष्ट आहे.
या AR Augma सिरीजमधे विशेष काय आहे, तर आमची टेकनॉलॉजी! ऑगमेंटेड रिऍलिटी !! ऑगमेंटेड रिऍलिटी हे एक असे तंत्रज्ञान आहे ज्यामधे ग्राफिक्स, साऊंड, वगैरे तंत्रांचा वापर करून एका आभासी दुनियेचा, 3डी स्वरूपातला अनुभव दिला जातो.AR Augma सिरीज मधील ह्या आमच्या पहिल्या छापील पुस्तकासोबत आम्ही एक ऍप मोफत देत आहोत.ज्या ऍप चे नाव आहे ARAugma . हे ऍप तुम्ही तुमच्या फोन किंवा आयपॅडवर किंवा टॅबलेट वर डाउनलोड करायचं आणि मग त्याच्या कॅमेरा लेन्समधून पुन्हा पुस्तक पाहायचं! यातून तुम्हाला ते पुस्तक तुमच्या स्क्रीनवर 3D ऍनिमेटेड स्वरूपात म्हणजे वरून, खालून, अधिक जवळून पाहता येईल , तसंच कथेतील बरेच प्राणी, जसे की हरीण, बिबट्या, झाडे आणि इतर बऱ्याच गोष्टी सर्व बाजूंनी पाहता येईल. पुस्तकात वाचलेली गोष्ट, काही वाढीव संवादांमधून, बॅकग्राऊंड आवाजांसहित ऐकता देखिल येईल. तेथील प्राण्यांमध्ये घडणाऱ्या गमती जमती मुलांना ऐकायला मिळेल , आणि त्यांच्या सोबत गायला आवडेल असं एक छोटंसं बडबडगीतसुद्धा आम्ही यात समाविष्ट केलेलं आहे, ज्याने पुस्तकाची मजा पुरेपूर घेता येईल. तसेच ह्या पुस्तकामुळे मुलांमधील कुतुहूल जागे होऊन वाचनाची आवड पण निर्माण होण्यास मदत होते.मुलांच्या मेंदूचा विकास हा खूप लहान वयातच सुरू होतो, त्यामुळे या पुस्तकामार्फत मुलांमधे एकाग्रता तर वाढतेच, त्याचबरोबर त्यांची कल्पनाशक्ती वाढण्यास देखिल मदत होते.
आहे की नाही मज्जा !
तर असा हा जंगलाचा प्रत्यक्ष अनुभव लहान मुलांना घेता येईल फक्त एक क्लिकमधे, या पुस्तकाच्या माध्यमातून! वाचन आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून हे तंत्र ‘3डी अर्णिमा’ ऍनिमेशन बेंगलोर ही कंपनी तुमच्यासाठी घेऊन आली आहे.
‘3डी अर्णिमा’ ऍनिमेशन बेंगलोर या कंपनीच्या दीपा देशपांडे गोकाककर , मनीषा कुलकर्णी रोडे (दोघीही मूळच्या कोल्हापूर), सोनाली महाजन देशपांडे (मूळच्या जळगाव ) या आपल्या मराठी सख्यांनी बनवलेले हे पुस्तक नक्कीच कमाल आहे यात काही शंकांच नाही. या पुस्तकाची धम्माल गोष्ट प्रज्ञा वझे घारपुरे यांनी लिहिली आहे. भारतातलं हे पहिलं ऑगमेंटेड रिऍलिटी हे तंत्रज्ञान वापरून पब्लिश केलेले इंग्रजी गोष्टीचं पुस्तक आहे बरं का !
अर्णिमाचा प्रवास हा गेले आठ वर्षे अखंड सुरू आहे. काहीतरी क्रिएटिव्ह करणे, ज्यामुळे समाजाला त्याचा फायदा होईल हेच स्वप्न उराशी बाळगून अर्णिमाचे कार्य अव्याहत सुरू आहे.
महिलांनी एकत्र येऊन एखादा असा प्रोजेक्ट यशस्वी करणं ते, हे महिला दिनाचे यशच म्हणावे लागेल.
‘स्पोर्ट्स डे ऍट जंगल’ या पुस्तकाची प्रत तुम्ही एका क्लिक वर मागवू शकता..
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.