प्रेम हे पैशात मोजता येत नाही किंवा ते पैशाने विकतही घेत येत नाही. कारण प्रेम ही वस्तू नाही. प्रेमाने आपण एखाद्याला भेटवस्तू देतो. दान देतो. ते देताना त्याची किंमत काय आहे हे मोजत नाही किंवा ते कितीचे आहे हे पाहात नाही. म्हणजेच ते प्रेम पैशात मोजता येत नाही. त्याने दिले म्हणूनही आपण त्याच्यावर प्रेम करत नसतो. प्रेम असते म्हणूनच आपण ते देत असतो.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
प्रेमाचेनि भांगारें । निर्वाळूनि नूपरें ।
लेवऊं सुकुमारें । पदें तिये ।। 4 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा
ओवीचा अर्थ – श्रीगुरुं विषयीचें प्रेमरुपी सोनें शुद्ध करून त्याचें घागऱ्याचे वाळे सद्गुरूंच्या सुकूमार पायांत घालूं.
प्रेम हे नैसर्गिक असते. प्रेम सांगून होत नसते किंवा सांगून प्रेम कधी केलेही जात नाही. तर ते अंतःकरणातून येत असते. शपथा घेऊन केलेले प्रेम किती दिवस टिकते हे सांगता येत नाही. कारण त्यात भाव कोणता आहे हे सांगता येत नाही. पण अंतःकरणातून आपले उत्स्फुर्त प्रेम हे खरे प्रेम असते. ते चिरकाळ टिकते. ते कधीही नष्ट होऊ शकत नाही.
प्रेम कधी चेहरापाहून, रंग पाहून होत नसते. प्रेम हे आपोआप व्यक्त होत असते. प्रेम हे कधी होईल हे सांगता येत नाही. त्याची ओढ आपणाला वेडे बनवते. प्रेमाच्या ओढीपायी माणूस हजारो मैलही चालू शकतो. विठ्ठलाच्या भेटीसाठी, त्याच्यावर असलेल्या प्रेमापोटी वारकरी पायी चालतो. कारण ती ओढ त्याला चालवत असते. ते प्रेम त्याला सुख देत असते. त्यामुळे वारीत चालल्यानंतर एक वेगळीच उर्जा शरीरात उत्पन्न होते. विठ्ठलाचे दर्शन होताच शरीरातील सर्व थकवा दूर जातो.
प्रेम कधी सांगून संपत नाही किंवा ते तुटतही नाही. जे तुटते ते प्रेम नसते. त्यांच्यात प्रेम आता राहीले नाही असे म्हटले जाते. किंवा असे प्रकार पाहायला मिळतात. पण ते प्रेम हे नैसर्गिक नसते. नैसर्गिक प्रेम कधी संपतच नाही. कृत्रिम दिखावूपणा त्यात नसतो. म्हणून त्यात तुटण्याचा कधी धोकाच नसतो. प्रेम ही नैसर्गिक क्रिया आहे. नैसर्गिक असल्यामुळे ते संपण्याचा प्रश्नच नसतो. कारण निसर्ग नित्य नुतन असतो. सदैव उत्पन्न होतच राहातो.
प्रेम हे कृतीतून व्यक्त होत असते. ठरवून प्रेम होत नसते. मुळात ठरवून प्रेम केलेही जात नाही. नैसर्गिक झरा कधी आटत नाही. धरणातील पाणी संपू शकते. पण नैसर्गिक उमाळा कधी संपत नाही. उन्हाच्या दाहकतेने त्यातील तिव्रता कमी होऊ शकेल पण नैसर्गिक प्रवाह, उमाळा हा कायम राहातो. तो संपत नाही. उन्हाळ्यात त्याचे प्रमाण कमी होईल पण आटत नाही. प्रेम हे असे असते. नैसर्गिक झऱ्याप्रमाणे ते नित्य वाहात राहाते. वातावरणामुळे त्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते पण ते कधी संपत नाही.
पण हे प्रेम का होते ? हे सांगता येत नाही. त्याला वयाची अट नसते. जातीचे बंधन नसते. भाषेचे बंधनही नसते. जात किंवा भाषा पाहून ते केलेही जात नाही. प्रेम म्हणजे वासना नव्हे. वासनेत मुळी प्रेम कधी असतच नाही. प्रेम हे मनांचे मिलन आहे. ते शरीराचे मिलन नसते. देह आणि आत्मा यातील फरक कळण्यासाठी प्रेम हे व्हायलाच हवे. प्रेम शरीरावर नाही तर ते प्रेम आत्म्यावर होत असते. यामुळेच त्यात वासना ही नसते. आंतरिक आत्म्याची ओढ त्यात असते. आत्मा हा अमर असल्याने ते प्रेम कधीही संपत नाही.
प्रेम हे पैशात मोजता येत नाही किंवा ते पैशाने विकतही घेत येत नाही. कारण प्रेम ही वस्तू नाही. प्रेमाने आपण एखाद्याला भेटवस्तू देतो. दान देतो. ते देताना त्याची किंमत काय आहे हे मोजत नाही किंवा ते कितीचे आहे हे पाहात नाही. म्हणजेच ते प्रेम पैशात मोजता येत नाही. त्याने दिले म्हणूनही आपण त्याच्यावर प्रेम करत नसतो. प्रेम असते म्हणूनच आपण ते देत असतो. व्यक्त होण्यासाठी ते प्रेमापोटी आपण ते देत असतो.
सद्गुरुंना अशी प्रेमरुपी भेटवस्तू द्यावी. शुद्ध अंतःकरणाने द्यावी. कारण त्यांचीही ओढ भेटीची असते. भेटीसाठी ते विटेवर उभे असतात. दारात उभे असतात. उभे राहून राहून कधी तो मज भेटेल अशी अवस्था त्यांची झालेली असते. यासाठीच त्यांच्या चरणांना स्पर्श करावा. शुद्ध अतःकरणाने ते पाय प्रेमाने ओले करावेत. भेटीच्या ओढीने पायात आलेली कळ त्या शितल प्रेमाच्या ओलीने दूर करावी. ही प्रेमाची भेट आहे. या भेटीतील आनंद, आत्मानंद आहे. भेटीतूनच सद्गुरु भक्ताला आत्मस्वरूप करतात. दोन आत्म्यांचे ते मिलन आहे. या अनुभुतीतूनच भक्त आत्मज्ञानी होतो. यासाठी प्रेम हे अंतःकरणातून असावे लागते. ते केले जात नसते होत असते. ती ओढ असते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.