जगभरात हे विश्वची माझे घर समजून आत्मज्ञानाचे गोडवे भरवायला हवेत. ब्रह्मविद्येचा सुकाळ करायला हवा. यासाठी योग्य व्यासपिढांची निर्मिती व्हायला हवी. हे ज्ञान फसवे नाही. हे ज्ञान म्हणजे आभास नाही. हे ज्ञान अनुभुतीतून येते. अनुभवातून विकसित होते.
राजेंद्र घोरपडे
मोबाईल 9011087406
नीळिमा अंबरी । कां मृगतृष्णालहरी ।
तैसें वायांचि फरारी । वावो जाहलें ।। १०५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३
ओवीचा अर्थ – आकाशांतील निळ्या रंगाप्रमाणे अथवा मृगजळावरील लाटांप्रमाणे ज्याचा व्यर्थ खोटा भास होतो.
आकाशातील निळा रंग हा भास आहे हे सांगणारी ही ओवी त्याकाळात विज्ञानात भारत किती पुढे होते हे सुद्धा स्पष्ट करते. भौतिकशास्त्राचे सिद्धांत त्या काळातही भारतात माहीत होते. विज्ञानाचे अनेक सिद्धांत त्याकाळातील भारतीय साधु-संतांना निश्चितच माहीत होते. मग ते औषधांचा विकास असो किंवा जीव, रसायनांचा विकास असो. खगोलशास्त्रात निश्चितच आपण पुढे होतो असे स्पष्ट होते.
आणि जागतिये दशे । स्वप्न लपाले असे ।
नातरी अंवसे । चंद्र गूढू ।। ७७ ।।
या ओवीचा अर्थ असा आहे की जागृतावस्थेत स्वप्न जसे लीन असते अथवा अमावशेच्या दिवशी चंद्र जसा गुप्त असते. असा या ओवीचा अर्थ आहे. चंद्र गुप्त असतो म्हणजे चंद्र आकाशात असतो पण दिसत नाही. म्हणजेच अनेक गोष्टी भारतीयांनी अभ्यासल्या होत्या. हे जाणवते. संत ज्ञानेश्वरांनी विज्ञानातूनच अध्यात्म मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कारण विज्ञान जिथे संपते तिथे अध्यात्म सुरु होते. यासाठी विज्ञानाची ओळख प्रथम करून घ्यायला हवी. विज्ञान हे अभ्यासायला हवे. म्हणजे अध्यात्म समजायला जाणायला सोपे जाईल. अध्यात्मातील आत्मज्ञानाने पृथ्वी बाहेरचे विश्वही साधु-संतांनी जाणले होते. ते मांडले होते.
काहीही असो, इतिहासातील हेवे दावे काहीही असोत. एक आहे, भारतात विज्ञानाचा विकास त्याकाळात होता. हे स्पष्ट होते. कसे व कोठे शोधले याचे पुरावे नाहीत यामुळे आपण मागे पडतो. त्यालाही एक कारण असू शकेल. एकदा आपल्या स्वः ची आत्मज्ञानाने ओळख झाल्यानंतर विज्ञानातील रुची ही कमी झाल्याने आपले विज्ञान मागे पडत गेले. आपण विज्ञानात प्रगत होतो पण त्यात अडकून पडलो नाही. स्वः च्या ओळखी शिवाय जगाची ओळख होत नसल्याने स्वः च्या शोधातच आपण राहीलो. स्वः च्या विकासातच, स्वः च्या ज्ञानातच आपण विकास करत राहीलो. इतर जगाने मात्र विज्ञानात प्रगती करून पुढे मजल मारली. पण विज्ञान हे आपण विकासासाठी वापरले विध्वंसासाठी वापरले नाही.
आता विज्ञानाने विध्वंस होत आहे. अशाने शांती, सुख- समाधान भंग पावत आहे. यासाठी संत ज्ञानेश्वरांनी इये मराठीचिये नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी असे म्हटले आहे. ब्रह्मज्ञानाने सुखी-समाधानी होऊन आत्मज्ञानाच्या सागरात डुंबण्यास माऊली सांगत आहे. ब्रह्मसंपन्न भारत व्हावा, आत्मज्ञानात प्रगत भारत व्हावा यासाठी साधुसंतांनी त्यावेळी प्रयत्न केले. हे कशासाठी तर या विश्वात सुख शांती नांदावी यासाठी आहे. मानवतेचा विकास व्हावा यासाठी हे आहे. माणसाला स्वःची ओळख झाली तर निश्चितच त्याच्यातील माणूसकी जागृत होते. यासाठीच माऊलीचा प्रयत्न आहे. अशाने गुन्हे, विध्वंसक कृत्ये घडणार नाहीत. गुन्हेच घडले नाही तर रक्षणाचीही गरज भासणार नाही. म्हणजेच मानवतेची शिकवण देणारे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान याचा विकास देशात करायला हवा.
विज्ञानाच्या प्रगतीने आपले स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. मुळात स्वतःचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. विज्ञानाचा वापर हा विकासासाठी, सुख-समाधानासाठी करायला हवा. त्याचा वापर विध्वंससाठी केला तर आपणच धोक्यात येऊ. हे विचारात घ्यायला हवे. कोणाकडे किती अणुशक्ती आहे यावर त्या देशाची सुरक्षा आता ठरत आहे. विषाणू अस्त्रे तयार करून त्याचा वापर केला जात आहे. एकमेकात चाललेली ही चढाओढ स्वातंत्र्य टिकवण्यासाठी गरजेची असली तरीही ही चढाओढ शेवटी विनाशाकडे नेते हे लक्षात घ्यायला हवे. यासाठी जगभरात हे विश्वची माझे घर समजून आत्मज्ञानाचे गोडवे भरवायला हवेत. ब्रह्मविद्येचा सुकाळ करायला हवा. यासाठी योग्य व्यासपिढांची निर्मिती व्हायला हवी. हे ज्ञान फसवे नाही. हे ज्ञान म्हणजे आभास नाही. हे ज्ञान अनुभुतीतून येते. अनुभवातून विकसित होते. डोळ्याला आकाश निळे दिसले तरी हे आभासी जग जाणायला हवे. यासाठी आत्मज्ञानाची गरज आहे. मृगजळ आहे की जलाशल हे जागेवर बसून जाणायला हवे. तरच आपण खरा विकास करू शकू अन्यथा मृगजळाप्रमाणे विज्ञानाच्या मागे धावत राहू. ब्रह्मविद्येचा सुकाळ हा यासाठीच मराठीच्या या नगरीत करायचा आहे. या नगरीला अमरत्व मिळवून द्यायचे आहे.
