July 26, 2024
Destruction of bad thoughts by association with good habits
Home » चांगल्याच्या संगतीने वाईट विचारांचा नाश
विश्वाचे आर्त

चांगल्याच्या संगतीने वाईट विचारांचा नाश

स्पर्धेच्या, चढाओढीच्या युगात प्रत्येक जण एकमेकाला खाली खेचण्याचेचे प्रयत्न करत आहे. अशाने वाईट गोष्टींना प्रोत्साहन मिळत आहे. अनेक समस्यांनी त्रस्त अशा वातावरणात सात्त्विक ठिकाणे मिळणार कोठे ? चांगली ठिकाणे नाहीत याचा अर्थ धर्म संपला आहे, असे नाही.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406

पाणी बुडऊ ये मिठातें । तंव मीठची पाणी आतें ।
तेवीं आपण जालेनि अद्वैतें । नाशेभय ।। ७२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा

ओवीचा अर्थ – पाणी मिठाला बुडवायला येते, ते मीठच पाणी होते. मग त्यास बुडण्याचे भय कसलें ? त्याप्रमाणें आपण अद्वैतस्वरुप झालों असता भयाचा नाश होतो.

पाण्यात मीठ टाकले तर पाणी खारट होते. पाण्यात साखर टाकली तर पाणी गोड होते. पाण्याचा संग कोणाशी होतो, यावर त्याची चव ठरते. तसे चांगल्याची संगत केली तर चार चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात. वाईटाच्या संगतीत चार वाईट सवयी लागू शकतात. मीठ पाण्यात टाकल्यावर ते त्यामध्ये विरघळते. यामुळे ते खारट लागते, पण अशुद्ध मीठ त्या पाण्यामुळे शुद्ध होते. अशुद्ध मीठ शुद्ध पाण्यात टाकून ते शुद्ध करता येते.

शुद्ध, सात्त्विक वृत्तीच्या सान्निध्यात राहिल्यावर आपल्यावरही त्या चांगल्या संस्काराचा प्रभाव पडतो, पण सध्याच्या युगात चांगल्या गोष्टी कोणत्या, हे ठरविणेच अवघड झाले आहे. मठामध्येही भ्रष्टाचार बोकाळला आहे. अनेक वाईट गोष्टी मठामध्ये घडताना पाहायला मिळत आहेत. अशा वेळी सुसंस्कृत ठिकाणे कशी शोधायची, हा मोठा प्रश्न आहे. अशाने धर्माची बदनामीही होत आहे. याबाबत अपप्रचारही केला जात आहे.

स्पर्धेच्या, चढाओढीच्या युगात प्रत्येक जण एकमेकाला खाली खेचण्याचेचे प्रयत्न करत आहे. अशाने वाईट गोष्टींना प्रोत्साहन मिळत आहे. अनेक समस्यांनी त्रस्त अशा वातावरणात सात्त्विक ठिकाणे मिळणार कोठे ? चांगली ठिकाणे नाहीत याचा अर्थ धर्म संपला आहे, असे नाही. चांगला विचार हाच खरा धर्म आहे. चांगल्या विचारांची पुस्तके हीच सात्त्विक विचारांची ठिकाणे आहेत. ती शोधणे गरजेचे आहे. चांगल्या विचारांच्या संगतीत, चांगल्या विचारांच्या पुस्तकांच्या संगतीत आपोआपच चांगल्या गोष्टींची संगत घडते.

स्वतःलाच ही सवय लावली तर इतरही त्यामध्ये सहभागी होतील. इतरांनीही ही सवय लागेल. मुख प्रचारातूनच चांगल्या गोष्टींचा प्रसार होऊ शकतो. यातूनच चांगले व्यासपीठ उभे राहू शकते. दुसरा भ्रष्ट कारभार करतो म्हणून स्वतः भ्रष्ट कारभार करणे योग्य नाही. दुसऱ्याने हात काळे केले याचा अर्थ आपणही काळे केले तर चालते, हे चूक आहे. चांगल्या संगतीत राहिला तर चांगले संस्कार घडतील. लोक चांगले म्हणतील. चांगल्या विचारात राहिल्यावर वाईटाची भीती कसली ?

सोहमच्या विचारात मन गुंतल्यानंतर त्या स्वरांचा अनुभव येतो. त्या स्वरांच्या अनुभुतीतून मग ज्ञान वृद्धींगत होते. या ज्ञानाच्या ठिकाणी अज्ञान कसे राहील. अज्ञान बुडाल्यानंतर त्यामध्ये आपण बुडणार कसे ? ज्ञानाच्या सागरात अद्वैत स्वरुप झाल्यानंतर भय आपोआपच नाहीसे होते. ज्ञानी माणसाला अज्ञानाचे भय कसे असेल ?


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

एक आठवण

ऊसाचा नवीन वाण : फुले ऊस १३००७

संत तुकारामांच्या अभंगात अध्ययनाच्यादृष्टीने मार्गदर्शक तत्त्वप्रणाली

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading