July 26, 2024
Discovery of two new species of Pali at Kalsubai and Ratangad
Home » कळसूबाई आणि रतनगडावर पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध
संशोधन आणि तंत्रज्ञान

कळसूबाई आणि रतनगडावर पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध

  • महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई आणि रतनगडावर पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध
  • शिवाजी विद्यापीठ व ठाकरे वाईल्ड लाईफच्या संशोधकांचे यश

कोल्हापूर : महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई आणि रतनगड किल्ल्यावरुन गोल बुबुळांच्या प्रदेशनिष्ठ पालींच्या दोन नवीन प्रजातींचा शोध लावण्यात भारतीय संशोधकांना यश आलेले आहे. दोन्ही प्रजाती उंच शिखरांच्या टोकांवरील बेसाल्ट दगडांच्या अधिवासात आढळतात. या संशोधनामध्ये ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशन आणि शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांचा सहभाग होता. हे संशोधन हे अक्षय खांडेकर यांच्या शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागामधून सुरु असलेल्या पीएचडी संशोधनाचा भाग आहे आणि प्रा. डॉ. सुनिल गायकवाड त्यांचे मार्गदर्शक आहेत. त्यासोबतच या संशोधनामधे ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे  संशोधक तेजस ठाकरे, ईशान अगरवाल, सत्पाल गंगलमाले आणि सौरभ किणिंगे यांचा सहभाग आहे.

नव्याने शोधलेल्या दोन्ही प्रजातींचा समावेश ‘निमास्पिस’ या कुळामधे केला आहे. गोल बुबुळे हे निमास्पिस कुळातील पालींचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. अहमदनगर जिल्ह्यातील रतनगड किल्ल्यावरुन शोधलेल्या पालीचे नामकरण ‘निमास्पिस बेसाल्टीकोला’ असे करण्यात आले आहे. बेसाल्ट दगडांवरील मर्यादित वावरावरुन तिचे नामकरण केले आहे. कळसूबाई शिखरावरुन शोधल्या गेलेल्या पालीचे नामकरण तिच्या आढळक्षेत्रावरुन ‘निमास्पिस कळसूबाईन्सिस’ असे केले आहे. ‘निमास्पिस कळसूबाईन्सीस’ ही प्रजाती कळसूबाई शिखर आणि त्याच पर्वतरांगेतील अलंग किल्ल्यावर आढळून आली. ही प्रजाती भारतीय द्विपकल्पामधील निमास्पिस कुळातील सर्वांत दक्षिणेकडील प्रजाती ठरली आहे.  पाठीवरील ट्युबरकलची संख्या, मांडीवरील ग्रंथींची संख्या, पृष्ठभागाला धरुन राहण्यासाठी आवश्यक बोटांवरील लॅमेल्यांची संख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण जनुकीय संचांवरुन या पाली एकमेकांपासून आणि कुळातील इतरांपासून वेगळ्या प्रजातीच्या ठरतात.

११०० मीटरपेक्षा अधिक उंचीवर आढळ

“निमास्पिस कुळातील पाली थंड अधिवासातील वावरासाठी ओळखल्या जातात. नव्याने शोधलेल्या दोन्ही प्रजाती ११०० मीटरपेक्षा उंच पर्वतांवरील निम-सदाहरित जंगलांमधील आणि कड्यांवरील बेसाल्ट दगडांवरती आढळतात. कमी उंचीवरील गरम जागा त्यांच्यासाठी अनुकूल नाहीत. या दोन्ही प्रजातींच्या आढळक्षेत्रांमधील सरळ रेषेतील अंतर फक्त ७ किमी. आहे. रतनगड आणि अलंग-कळसूबाई पर्वत रांग यांच्या मध्ये असलेल्या शुष्क-सपाट प्रदेशाने या दोन पालींना एकमेकांपासून वेगळे केले आहे. या वैशिष्ट्यपूर्ण अनुकुलनतेमुळे सदरच्या पाली संवर्धनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या ठरतात.” – अक्षय खांडेकर

कळसूबाई शिखर परिसराची जैवविविधता अधोरेखित 

“महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखरावरुन पालीची नवी प्रजाती शोधणे ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कळसूबाई शिखर, रतनगड आणि अलंग किल्ला या ठिकाणांना महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. रतनगड आणि अलंग शिखरांच्या माथ्यावरील किल्ल्यांनी ऐतिहासिक काळात अनेकांना आश्रय दिला आहे. नव्या पालींसाठी या शिखरांची अग्रस्थाने अशीच आश्रयस्थाने राहीली आहेत. नव्याने शोधलेल्या पाली प्रदेशनिष्ठ आहेत. कळसूबाई-अलंग आणि रतनगड ही आढळक्षेत्रे सोडून त्या इतरत्र कुठेही आढळत नाहीत. प्रस्तुत संशोधनामुळे कळसुबाई, रतनगड आणि अलंग शिखर या ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या परिसरातील जैवविविधतेसंदर्भातील वैशिष्ट्ये अधोरेखित झाली आहेत.”

  – डॉ. सुनिल गायकवाड

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

समतेच्या विचाराचे छत्रपती संभाजी महाराज यांचे ग्रंथ जनमानसात पोहचविले पाहिजेत – डॉ. बालाजी जाधव

हिरण्यकेशी भव्य दहीहंडी…

सत्यशोधक चळवळीतील दुर्लक्षित कामाला उजाळा

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading