April 24, 2024
Dispassion is needed only for self-experience
Home » स्वानुभवासाठीच हवे वैराग्य
विश्वाचे आर्त

स्वानुभवासाठीच हवे वैराग्य

मनातील विषयांची शुद्धताही अशीच करायची आहे. मनातील विषय योग्य गोष्टीत मिसळायला हवेत. देहातील विषय हे त्यात विरघळायला हवेत. मनातील राग, द्वेष, वासना आदी सर्व विकार त्यात विरघळायला हवेत. साधनेच्या उष्णतेने मनातील हे विकार नष्ट होऊन विषयांची शुद्धी होते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे,
मोबाईल – 9011087406

ऐसे स्वानुभवविश्रामें । वैराग्यमुळे जे परिणमे ।
तें सात्विक येणें नामें । बोलिजे सुख ।। ७९३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – याप्रमाणें ज्या सुखाला वैराग्य हें मूळ असून जें आत्मानुभवाच्या विश्रांतिरुपानें परिणामाला पावतें त्यास सात्विक सुख असे म्हणावे.

वैराग्याचा साधा सोपा आणि सरळ भावार्थ बाबा महाराज आर्वीकर यांनी सांगितला आहे. ते म्हणतात, स्वमुक्तीसाठी बंधनकारक अशा सर्व सृष्टीचा त्याग हेच वैराग्य. इतका सोपा अर्थ त्यांनी सांगितला आहे. स्वतःची मुक्ती करून घेण्यासाठी प्रथम स्वतः आपण कोण आहोत याचा विचार करायला हवा. स्वतःच स्वतःची ओळख करून घ्यायला हवी. स्वःची ओळख झाल्याशिवाय स्वमुक्ती अशक्य आहे. पावसचे स्वामी स्वरुपानंद यांनी या विषयी बहुमोल असा उपदेश केला आहे. स्वामी स्वरुपानंद म्हणतात,

करावा विचार आपुला आपण।
कोण मी कोठून जन्मा आलो ।। १ ।।
जन्मोनियां काय करावें उजित ।
बरवें हिताहित विचारावें ।। २ ।।
देहान्तीं मागुतें कोठें जाणें असे ।
काय विश्व कैसें होय जाय ।। ३ ।।
स्वामी म्हणे यत्नें ऐसा घेतां शोध ।
होतसे प्रबोध अंतर्यामीं ।। ४ ।।

स्वामींनी संजीवनी गाथेमध्ये हा उपदेश केला आहे. जन्म कशासाठी आहे ? याचा शोध घेणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे. विश्वामध्ये पृथ्वी सोडून कोठे जीवसृष्टी आहे की नाही याचा शोध अद्याप सुरु आहे. देहात आलो जन्म पावलो. पण या देहातून पुढे कोठे जाणार याचाही विचार करायला हवा. याचे उत्तर जेंव्हा आपणास मिळेल तेंव्हा मिळणारा आनंद हा खरा आनंद असणार आहे. कारण या उत्तरातूनच पुढे आपले संपूर्ण जीवनच बदलून जाणार आहे. स्वतःचा बोध जेंव्हा स्वतःला होईल तेंव्हाच सर्व प्रश्नांची उत्तरे आपणाला सहज मिळतील.

वैराग्य हा एक विचार आहे. मनात या वैराग्याचा विचार उत्पन्न व्हायला हवा. तेंव्हाच मनामध्ये स्वःचा विचार जागृत होईल. स्वःच्या विचारातूनच मग स्वमुक्तीचा विचार विकसित होईल. स्वमुक्तीसाठी मग मनातील काम, क्रोध, लोभ आदी विकारांचा त्याग हा करावाच लागणार. विषय नष्ट करायचे नाहीत तर विषय शुद्ध करायचे आहेत. मनातील विषयांची शुद्धी आहे. मिठाची किंवा एखाद्या रासायनिक पदार्थांची शुद्धी करताना तो पदार्थ हा विरघळणाऱ्या द्रावणात मिसळावा लागतो. मिठ पाण्यात विरघळते. सर्वच पदार्थ पाण्यात विरघळतात असे नाही. यासाठी विरघळणारे योग्य द्रावण निवडावे लागते. द्रावणात तो पदार्थ विरघळल्यानंतर त्या द्रावणाला उष्णता देऊन त्याचे बाष्पिभवन करावे लागते. पाण्यात विरघळलेले मीठ पाण्याचे बाष्पीभवन झाल्यानंतर शुद्ध होते. त्यातील सर्व भेसळ निघून जाते. रासायनिक पदार्थातील भेसळही अशीच निघून जाते अन् ते पदार्थ शुद्ध होतात.

मनातील विषयांची शुद्धताही अशीच करायची आहे. मनातील विषय योग्य गोष्टीत मिसळायला हवेत. देहातील विषय हे त्यात विरघळायला हवेत. मनातील राग, द्वेष, वासना आदी सर्व विकार त्यात विरघळायला हवेत. साधनेच्या उष्णतेने मनातील हे विकार नष्ट होऊन विषयांची शुद्धी होते. यासाठी साधना योग्य प्रकारे करायला हवी. साधनेनेच हे सर्व विकार जाऊन स्वची ओळख करून घ्यायची आहे. स्वच्या ओळखीमध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा त्याग करणे म्हणजेच वैराग्य. स्वची ओळख झाल्यानंतर साधनेने त्यात रमायचे आहे. यातून मिळणारा आनंद हा अमरत्त्वाचे सुख देतो. अमरत्त्वाची अनुभुती देतो. आत्मानुभुतीतूनच मिळणारा आनंद स्वतःचे आत्मबल वाढवतो. हेच जीवनाचे खरे रहस्य आहे. हेच जाणून घेऊन स्वतःचे जीवन हे सुखी करायचे आहे. सर्व गोष्टीतून मुक्त होऊन आत्मज्ञानी व्हायचे आहे.

Related posts

रसज्ञ आणि जेवणारे

अध्यात्मात आपणच आपली प्रतिमा ओळखायची असते

प्राण्यांच्या संवादातून मानवी वसाहतीचा शोध घेणारी बालकादंबरी

Leave a Comment