नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या प्रत्येक वस्तूत काही ना काही तरी औषधी गुणधर्म असतो, असे आयुर्वेद मानतो. यासाठी प्रत्येक सजीवाचे महत्त्व अभ्यासायला हवे. त्याचे संवर्धन करण्यासाठी उपाय योजायला हवेत. दुर्मिळ होऊ घातलेल्या वनस्पती, जीवांच्या संवर्धनासाठी प्रयत्न व्हायला हवेत. विकास कार्यक्रम आखताना पर्यावरणाचा विचार करूनच त्याची आखणी व्हायला हवी.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी “पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची जीवनशैली बनावी, तसेच ही लोकचळवळ व्हावी,’ असे आवाहन केले आहे. “माझी वसुंधरा’ अभियानाअंतर्गत कार्यक्रमात त्यांनी हे आवाहन केले. “वाहणारी नदी, हिरवागार परिसर व डोंगरातून उगवणारा सूर्य असे चित्र पूर्वी मुले रेखाटत होती; पण आताची मुले इमारतींच्या जंगलातून उगवणाऱ्या सूर्याचे चित्र रेखाटतात. हा बदल कशामुळे झाला? मुलांची मानसिकता इतकी बदलली आहे. हे भीषण वास्तव त्यांनी मांडले,’ हे मुख्यमंत्र्यांनी केलेले प्रबोधनात्मक भाष्य निश्चितच अनेकांना प्रेरणा देणारे आहे. नव्या पिढीत झालेला हा बदल निश्चितच विचार करायला लावणारा आहे. तसे पाहता कोणतेही सरकार पर्यावरणावर चर्चा करते; पण प्रत्यक्ष कृतीत फारसे दिसत नाही. वाढते प्रदूषण आणि त्यामुळे वाढत चाललेल्या समस्या याकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही. यासाठी आता जीवनशैलीतच बदल घडवण्याची गरज आहे. पर्यावरण संवर्धनाचा वसा प्रत्येकाने उचलायला हवा. स्वच्छता अभियान जशी लोकचळवळ झाली तशी पर्यावरण संवर्धन ही लोकचळवळ व्हायला हवी.
प्रदूषण करणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा विचार करायला हवा. यावर उपाय शोधायला हवेत. ही चळवळ का गरजेची आहे, हे विचारात घ्यायला हवे. भावी पिढीचे आरोग्य सुदृढ हवे असेल, तर प्रदूषणमुक्तीची लोकचळवळ व्हायलाच हवी. दूरदृष्टी ठेवून उपाययोजना आखायला हव्यात, तरच हे शक्य होणार आहे. नुसत्या ऑनलाईन शपथा घेऊन प्रदूषणमुक्ती होणार नाही. त्यासाठी तो विचार प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवून त्याचे रूपांतर कृतीत व्हायला हवे. नव्या पिढीत हा विचार रुजवायला हवा. हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा आपण त्या जैवविविधतेचे महत्त्व पटवून देऊ. तसे प्रयत्न व्हायला हवेत. पृथ्वीतलावरील प्रत्येक सजीवाचे महत्त्व विचारात घेऊन “जगा व जगू द्या’ या विचारातून आपण कार्य हाती घ्यायला हवे. जैवविविधतेमध्ये कोणतीही सजीव वस्तू महत्त्वाचीच आहे.
नैसर्गिकरीत्या तयार झालेल्या प्रत्येक वस्तूत काही ना काही तरी औषधी गुणधर्म असतो, असे आयुर्वेद मानतो. यासाठी प्रत्येक सजीवाचे महत्त्व अभ्यासायला हवे. त्याचे संवर्धन करण्यासाठी उपाय योजायला हवेत. दुर्मिळ होऊ घातलेल्या वनस्पती, जीवांच्या संवर्धनासाठी प्रयत्न व्हायला हवेत. विकास कार्यक्रम आखताना पर्यावरणाचा विचार करूनच त्याची आखणी व्हायला हवी. राजर्षी शाहू महाराज यांनी तलाव, धरणे बांधली; पण त्यात त्यांनी पर्यावरणाचा विचार मांडला होता. धरणातील पाणी दूषित होणार नाही, गाळ साचणार नाही, यासाठी उपाययोजना सुचवल्या होत्या. पण आज धरणे, तलाव बांधताना हा विचार लक्षात घेतला जात नाही. दूरदृष्टीच्या अभावामुळेच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.