July 27, 2024
Home » खवले मांजर प्रजाती संवर्धनाची गरज
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

खवले मांजर प्रजाती संवर्धनाची गरज

खवले मांजर संरक्षण आणि संवर्धनाच्या उपाययोजना सुचवण्यासाठी पुणे येथील वनसंरक्षक रमेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली वनविभागाने अभ्यासगट स्थापन केला आहे. या अभ्यासगटामध्ये राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य विश्वास ( भाऊ) काटदरे यांचा समावेश करण्यात आला आहे. या निमित्ताने…

खवले मांजर जगात सर्वात जास्त चोरटी शिकार व व्यापार होणारा प्राणी. नाव खवले मांजर असले तरी मांजराशी त्याचा काहीएक संबंध नाही. पोट व तोंडाचा काही भाग वगळता संपूर्ण अंगावर मजबूत खवले असून ते बंदुकीच्या गोळीलाही दाद देत नाहीत. धोक्याच्या वेळी संपूर्ण अंगाचे वेटोळे करून घेतो, मग त्याला मारणे फारच कठीण. रात्री फिरणारा व दोन ते चार मीटर लांबीच्या जमिनीच्या बिळात राहणारा प्राणी असल्याने एकूणच सर्वसामान्य लोक काय शास्त्रज्ञाना सुद्धा त्याच्या बद्दल फार कमी माहिती आहे. खवले मांजराच्या ४ प्रजाती आफ्रिकेत तर ४ आशियात आढळतात. भारतात चीनी खवले मांजर व भारतीय खवले मांजर या दोन प्रजाती आढळतात. हा प्राणी सर्व प्रकारच्या अधिवासात तग धरतो. त्याचे खवले केराटीन पासून बनलेले असतात व चायनीज औषधात त्याचा वापर केला जातो म्हणून चढ्या भावाने त्याची तस्करी होते.

चिपळूण तालुक्यातील १६४ गावातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांची कार्यशाळा घेऊन त्यांना खवले मांजराचे महत्व, त्याला भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये शेड्यूल I म्हणजे वाघा इतके संरक्षण असल्याचे पटवून दिले व संरक्षण संवर्धनाचे आवाहन केले. त्यांच्या शिकारीत गुंतलेल्या कातकरी आदिवासी लोकांसाठी विशेष कार्यशाळा घेतली. त्यांच्यासाठी आम्ही मधमाशी पालन, जंगल संपत्ती गोळा करणे, पर्यटन मार्गदर्शन व होम स्टे इत्यादी विविध रोजीरोटीच्या संधी उपलब्ध करून देत आहोत.

– विश्वास (भाऊ) काटदरे

खवले मांजर (Indian Pangolin, Manis crassicaudata) हा फॉलिडोटा वर्गातल्या  मॅनिडी कुळातील  मॅनिस  प्रजातीतील सस्तन प्राणी आहे. हा आफ्रिका व आशिया खंडातील उष्णकटिबंधीय भागांमध्ये आढळतो. जगभरात खवलेमांजराच्या आठ प्रजाती आहेत. त्यातील चार आफ्रिकेत आढळतात तर चार आशियात. भारतीय खवले मांजर दक्षिण आशियात पूर्व पाकिस्तानचा काही भाग, भारतात हिमालयाच्या दक्षिणेकडील भाग, दक्षिण नेपाळ, बांगलादेश व श्रीलंकेमध्ये आढळते. दक्षिण पश्चिम चीनमध्ये पूर्वी याच्या नोंदी आहेत तर मॅनमार मधील याच्या जुन्या नोंदी संशयास्पद आहेत. भारतात आढळणारी खवले मांजराची दुसरी प्रजाती आहे चीनी खवले मांजर  Chinese pangolin Manis pentadactyla. ही प्रजाती उत्तर भारतात तसेच पूर्वात्तर भारतात आढळते.

भारतीय खवले मांजर हा प्राणी सुमारे अडीच ते चार फुट लांब असून त्याची शेपटी सुमारे १ ते १.५ फुट असते. त्याचे वजन सुमारे १० ते १६ किलो असते. हा प्राणी निशाचर असून संपूर्ण दिवस सुमारे ८ ते ९ इंच रुंदीच्या व २ ते ३ मीटर लांब जमिनीवरील बिळात राहतो. त्याच्या पायांना मजबूत व आतल्या बाजूला वळलेली नखे असतात. त्याचे अन्न म्हणजे मुंग्या, डोंगळे, ओंबिल ( झाडावरील लाल मुंगळे) व वाळवी व त्यांची अंडी पिल्ले हे होय. या प्राण्याच्या तोंडात दात नसतात परंतु त्याची जीभ सुमारे एक ते सव्वा फुट लांब व चीकट असते. हा प्राणी रात्रीच्या वेळी आपल्या मजबूत नख्याने वारुळे फोडतो व आत शिरून जीभ आतबाहेर करत त्याला चिकटलेल्या मुंग्या फस्त करतो. दिवसाला त्याला १५ /२० लाख मुंग्या खाव्या लागतात. शास्त्रीय अभ्यासा नुसार वर्षभरात एक खवले मांजर सुमारे ८० कोटी मुंग्या / वाळवी खातो. एवढे प्रचंड प्रमाणात मुंग्या डोंगळे, खाऊन तो किती मोठ्या प्रमाणात मोफत कीड नियंत्रणाचे काम करत असतो याची आपल्याला कल्पनाच येत नाही. या मुळेच निसर्ग साखळीतील त्याचे महत्व अधोरेखित होते. मुंग्यांबरोबरच जिभेला चिकटून काही खडेसुद्धा पोटात जातात व ते पोटातील मुंग्या भरडण्याचे काम करतात.

बारा वर्ष अतिशय मेहनतीने यशस्वी केलेला महाराष्ट्रातील सागरी कासवे संरक्षण मोहीम स्थानिक लोक, वनविभाग, ग्रामपंचायती, यांच्याकडे सुपूर्त करून करून थोडासा निःश्वास टाकत असताना शिरगाव चिपळूण येथे ४४ किलो खवल्यांची तस्करी पकडण्यात आली, लागोपाठ अजून दोन ठिकाणी असेच खवले पकडले गेले. ४४ किलो म्हणजे २५ ते ३० खवले मांजरांची शिकार नक्कीच झाली होती. खवले मांजर म्हणजेच Indian Pangolin(manis crassicaudata) याची IUCN  च्या रेड डेटा बुक मध्ये endanger म्हणून नोंद असल्याचे व मोठ्या प्रमाणात शिकार होत असल्याचे माहिती होते परंतु आपल्या कोकणात तस्कर एवढे फोफावले असतील असे वाटले नव्हते. हे समजले तेव्हाच आम्ही डिसेंबर २०१५ ला त्याच्या संरक्षण संवर्धनाचे काम हाती घेतले.

सुरुवातीला आम्ही चिपळूण तालुक्यातील १६४ गावात प्रत्यक्ष फिरून लोकांना विचारून माहिती गोळा केली. अर्थात संपूर्ण कोकणात खवले मांजर काही प्रमाणात आढळते पण त्याची चोरटी शिकार सुद्धा चालते हे या वर्षभरात लक्षात आले. त्या माहितीच्या आधारे ट्रॅप कॅमेरा सर्वेक्षण चालू केले व दिवसा रात्री प्रत्यक्ष फिरून सर्वेक्षण केले. सर्वेक्षणाच्या कामात स्थानिक माहितगार लोक आम्हाला मदत करत आहेत. चिपळूण तालुक्यातील १६४ गावातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांची कार्यशाळा घेऊन त्यांना खवले मांजराचे महत्व, त्याला भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अन्वये शेड्यूल I म्हणजे वाघा इतके संरक्षण असल्याचे पटवून दिले व संरक्षण संवर्धनाचे आवाहन केले. त्यांच्या शिकारीत गुंतलेल्या कातकरी आदिवासी लोकांसाठी विशेष कार्यशाळा घेतली. त्यांच्यासाठी आम्ही मधमाशी पालन, जंगल संपत्ती गोळा करणे, पर्यटन मार्गदर्शन व होम स्टे इत्यादी विविध रोजीरोटीच्या संधी उपलब्ध करून देत आहोत.

शाळा महाविद्यालये येथे विविध कार्यक्रम आयोजित केले. संपूर्ण तालुक्यात महत्वाच्या ठिकाणी खवले मांजर वाचवाचे मोठे बोर्ड लावले, गावागावात पत्रके वाटली. वनविभागाच्या सहकार्याने चिपळूण तालुक्यात हे काम यशस्वी होत आहे.
चिपळूण तालुक्यातील काम आम्ही संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विस्तृतपणे अधिक मोठ्या प्रमाणात करू लागलो. त्याच बरोबर जनजागृतीचे विविध पर्याय वापरले गेले. वृत्तपत्र व इतर माध्यमातून लेख लिहिणे, सभांमध्ये माहिती देणे, जनजागृतीची फिल्म बनवून ती दाखवणे विविध ठिकाणी व्याख्यान देणे या बाबी करत आहोत. शालेय शिक्षण विभागाच्या इयत्ता सातवीच्या इंग्रजीच्या पुस्तकात मी लिहिलेला खवले मांजराचा धडा प्रसिद्ध झाल्यामुळे दरवर्षी १७ लाख मुलांपर्यंत ही माहिती पोचत आहे. त्याच धड्यातील गोष्टीचे मराठीत पुस्तक वनविभागाच्या सहकार्याने काढून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना मोफत वितरीत करण्यात आली.

या सर्व कामाचे यश दिसू लागले आहे पूर्वी फार क्वचितच खवले मांजराची बातमी यायची पण गेल्या दोन वर्ष २३ ठिकाणी खवले मांजर धोक्यात असताना स्थानिक लोकांनी त्याला वाचवले, वनविभागाच्या ताब्यात दिली किंवा त्वरित जंगलात सोडली. ठीक ठिकाणी लोक स्वतःहून पुढे येऊन लोकांना संरक्षणाचे महत्व सांगत आहेत. परंतु अजूनही तस्करी चालू आहे.  वन विभाग, पोलीस त्यांच्यावर कारवाई करत आहेत. अजून खूप मोठ्ठा पल्ला गाठायचा आहे. हा प्रकल्प संपूर्ण भारतभर राबवायचा आहे. एखाद्या आडगावात संध्याकाळी खवले मांजर निवांतपणे फिरताना दिसेल तेव्हाच खऱ्या अर्थाने खवले मांजर संरक्षण मोहीम यशस्वी झाली असे म्हणता येईल.  

लेखन – विश्वास ( भाऊ ) काटदरे


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

आंबा आठवणीतला

कणकण मधाचा…!

वणवा : प्रवृत्ती जळायला हवी !

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading