November 21, 2024
Finternet - the revolutionary financial system of the future
Home » फिंटरनेट – भविष्यातील क्रांतीकारी वित्तीय प्रणाली !
विशेष संपादकीय

फिंटरनेट – भविष्यातील क्रांतीकारी वित्तीय प्रणाली !

स्वित्झर्लंड मधील बीआयएस या मध्यवर्ती बँकेने ‘बहुस्तरीय आर्थिक परिसंस्था’ ( मल्टीपल फायनान्शियल इकोसिस्टीम्स) एकमेकांशी जोडून ‘फिंटरनेट’ सारखी अत्याधुनिक सार्वत्रिक डिजिटल वित्तीय प्रणाली कार्यान्वित करण्याची योजना हाती घेतली आहे. भारत त्यात सहभागी होत आहे. नजिकच्या भविष्यकाळात बँकिंगसह वित्तीय क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवणाऱ्या या प्रणालीचा वेध…

प्रा. नंदकुमार काकिर्डे
पुणे स्थित अर्थविषयक ज्येष्ठ पत्रकार व बँक संचालक

भारताने सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मिळवलेल्या अभूतपूर्व यशानंतर आपले लक्ष ” फिंटरनेट” या महत्त्वाकांक्षी सार्वत्रिक डिजिटल वित्तीय प्रणालीकडे ( युनिव्हर्सल डिजिटल फिनान्शियल सिस्टीम) वळवले आहे. यामध्ये सहभागी झाल्याने जागतिक पातळीवर वित्तीय मालमत्तांचे सुलभ व्यवहार तसेच हस्तांतरण करणे आपल्याला शक्य होणार आहे. स्वित्झर्लंडस्थित बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंटचे (बीआयएस) म्हणजे आंतरराष्ट्रीय तडजोडविषयक बँकेचे सरव्यवस्थापक ऑगस्टीन कार्स्टेन्स यांनी ” फिंटरनेट” बाबतचा जागतिक अंमलबजावणी आराखडा तयार केला आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ञ श्री नंदन निलकेणी यांनी त्यांच्या समवेत याबाबतचा प्रबंध गेल्या महिन्यात प्रसिद्ध केला. भारताने यात सहभागी होण्यासाठी पुढाकार घेतला असून त्या दृष्टीने योग्य ती पावले टाकण्यास प्रारंभ झाला आहे.

जागतिक स्तरावर बँकिंग व्यवसाय करणारी व जगातील अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांची बँक म्हणून कार्यरत असलेली बीआयएस ही सर्वात जुनी वित्तसंस्था आहे. स्वित्झर्लंड मधील बाझेल येथे ही आंतरराष्ट्रीय तडजोड विषयक बँक स्थापन करण्यात आलेली आहे. भारतासह जगभरातील 60 प्रमुख देशांच्या मध्यवर्ती किंवा केंद्रीय बँका आणि जागतिक स्तरावरील काही वित्त संस्था या बँकेचे सदस्य व मालक आहेत. जगभरातील मध्यवर्ती बँकांना मुद्राविषयक तसेच वित्तीय स्थिरता साध्य करण्यासाठी मदत करण्याचे काम ही बँक करते. त्याचप्रमाणे बँकिंग क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देणे व जगभरातील मध्यवर्ती बँकांची बँक म्हणून कार्य करण्याचे या बँकेचे उद्दिष्ट आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या वित्तीय व्यवहारांमध्ये एक विश्वस्त म्हणून ही बँक व्यापक काम करते. तसेच त्यांच्या विविध विभागांमार्फत मध्यवर्ती बँकांच्या ठेवी, विदेशी विनिमय, सुवर्ण राखीव, विविध प्रकारचे कर्जरोखेबाबतचे व्यवहार केले जातात. त्याचप्रमाणे कर्ज देणे व सुवर्ण कर्ज तसेच विदेशी विनिमय यांच्या खरेदी विक्री संबंधातील बँकांचे अल्पमुदतीचे व्यवहार ही बँक करते. भारताने 1996 मध्ये या बँकेचे सदस्यत्व घेतले. रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन या बँकेचे तीन वर्षे उपसभापती होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर बँकिंग क्षेत्रात कार्य करणारी ही अत्यंत शक्तिशाली वित्त संस्था असून तिचा पतदर्जा सातत्याने ‘अ’ किंवा त्याच्यापेक्षा वरचा राहिलेला आहे.

या आंतरराष्ट्रीय बँकेने गेल्या वर्षी इंटरनेट सारख्या प्रभावी डिजिटल माध्यमाचा वापर करून जागतिक पातळीवरील आर्थिक परिसंस्था एकमेकांशी जोडून अत्यंत कार्यक्षम, अतिजलद, दर्जेदार तसेच सुरक्षित वित्तीय यंत्रणा ” फिंटरनेट” निर्माण करण्याचे सुतोवाच केले होते. याद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अर्थशास्त्र, वित्त व व्यापार यांच्या सर्व व्यवहारांचे एकत्रीकरण करण्याची संकल्पना आहे. अगदी सरळ सोप्या भाषेत सांगावयाचे झाले तर अत्यंत उच्च स्तरावर जागतिक पातळीवरील विविध आर्थिक, वित्तीय मालमत्तांचे व्यवहार सुलभपणे करण्याची यामध्ये क्षमता आहे. आज आपण जगाच्या कानाकोपऱ्यात कोठेही, कधीही एकमेकांशी मोबाईल सारख्या उपकरणाच्या सहाय्याने तसेच कोणतेही नेटवर्क (जाळे) किंवा कोणतीही सेवा देणारी ( सर्व्हिस प्रोव्हायडर) कंपनी असली तरी त्या माध्यमातून दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनी करू शकतो. अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर घरी बसून जगातील कुठल्याही देशातील हॉटेलचे किंवा राहण्यासाठीची जागा आरक्षित करणे किंवा एखादी टॅक्सी आरक्षित करणे शक्य असते त्याचप्रमाणे बँकिंग क्षेत्रातील व्यवहारही तितक्याच सुलभपणे करण्याची यामध्ये क्षमता आहे. भारतातील किंवा जगातील कोणत्याही बँकिंग सेवेमध्ये ठेवी ठेवणे, शेअर्स, कर्जरोखे खरेदी-विक्री व्यवहार करणे, विमाविषयक करार किंवा म्युच्युअल फंडाच्या विविध युनिट्स मध्ये खरेदी विक्री करणे किंवा स्थावर मिळकत, जमीनजुमला, निवासस्थाने, घरे किंवा मोठ्या कलाकृतींची खरेदी विक्री या डिजिटल माध्यमातून करणे शक्य होणार आहे. केवळ एक बटण दाबून जगात कोठेही हे व्यवहार करणे व्यक्ति किंवा संस्थांना या प्रणालीत शक्य होणार आहे.

” फिंटरनेट” ही सेवा जागतिक पातळीवर दिली जाणार असल्याने त्यासाठी “टोकन” ( टोकनायझेशन) व्यवस्था व युनिफाईड प्रोग्रॅमबल लेजर्स ( युपीएल) या दोन महत्त्वपूर्ण आधारभूत यंत्रणा कार्यान्वित केल्या जाणार आहेत. म्हणजे सर्व वित्तीय मालमत्ता यांचे टोकनायझेशन( चिन्ह, प्रतिक किंवा खूण अशा स्वरूपात) निर्माण केले जाऊन त्याची नोंद प्रोग्रॅमेबल युनिफाईड लेजर मध्ये केली जाईल. कोणत्याही वित्तीय मालमत्तेचे एकदा टोकन निर्माण केले गेले की तंत्रज्ञान व मालमत्ता यांच्या अज्ञेयवादी व्यासपीठावर ते उपलब्ध होईल. नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत, प्रमाणित किंवा अप्रमाणित, फंजीबल किंवा नॉन फंजीबल, बेअरर किंवा नॉन बेअरर, ब्लॉकचेन चा वापर करणारे किंवा न वापर करणारे अशा कोणत्याही वित्तीय मालमत्तेचा त्यात समावेश होऊ शकतो. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व टोकन्स यूपीएलच्या माध्यमातून अत्यंत सुरक्षित पद्धतीने एकमेकांना हस्तांतरित करता येतात. प्रत्येक टोकनमध्ये संबंधित वित्तीय मालमत्तेची संपूर्ण माहिती दिलेली असते. त्यामध्ये मालकी किंवा हस्तांतरित करण्याचे नियम व त्याची पद्धती याचा उल्लेख केलेला असतो. त्यामुळे खरेदी किंवा विक्री करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांमध्ये कोणत्याही प्रकारचा मोठी क्लिष्ट लिखापढी, करार न करता वित्तीय मालमत्तेचे सहज सुलभ हस्तांतरण मालकी तत्वावर विनासायास व विना विलंब केले जाऊ शकते. यामध्ये विक्रेता व खरेदीदार यांच्यातील सर्व देयके सुलभरित्या आंतरबँक सेटलमेंट पद्धतीनुसार रिअल टाईम मध्ये म्हणजे त्वरित केली जातात. या प्रक्रियेमध्ये योग्य निधीची उपलब्धता करणे, हस्तांतरणाची नोंद करणे, तसेच खरेदीदाराला संपूर्ण सुरक्षा प्रदान करण्याची हमी घेतली जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवर केले जाणारे वित्तीय मालमत्तेचे सर्व व्यवहार अत्यंत कमी खर्चात व सुरक्षित पद्धतीने केले जाऊन त्यांचे प्रत्यक्ष हस्तांतरणही वेगवान पद्धतीने व सुरक्षित पद्धतीने करण्याची हमी या ‘फिंटरनेट’ मध्ये आहे.

गेल्या एक-दोन वर्षांमध्ये बीआयएस यांनी प्रायोगिक तत्त्वावर ब्राझील,दक्षिण कोरिया यांच्या मध्यवर्ती बँकांना यात समाविष्ट केले होते. यामध्ये नजीकच्या भविष्यकाळात भारताचा समावेश केला जाऊन आपल्याकडे या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील वित्तीय मालमत्ता व्यवहार करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. सध्याची भारतातील वित्तीय यंत्रणा खूप संथगतीने प्रवास करते. ती खूप खर्चिकही आहे. वित्तीय सेवा व उत्पादने खूप मर्यादित आहेत. सर्वांना त्यात सहजगत्या सहभागी होता येते परंतु त्यात अनेक त्रुटी आहेत. एका बाजूला देशात इंटरनेटच्या माध्यमातून सायबर क्राईम, फ्रॉड द्वारे छोटे मोठे आर्थिक गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले दिसत असताना त्याच्या पलीकडे जाऊन अत्यंत सुरक्षित पद्धतीचे आंतरराष्ट्रीय वित्तीय मालमत्तेचे व्यवहार करण्यासाठी ही पावले आपण टाकत आहोत. या व्यवहारांमुळे देशातील सध्याच्या बँकिंग यंत्रणेमध्ये कोणतीही ढवळाढवळ न करता किंवा बँकिंग यंत्रणेच्या संस्थात्मक संरचनेला धक्का न लावता ‘ फिंटरनेट’ व्यवहार यशस्वी करण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यासाठी सर्व बँकिंग क्षेत्राला त्यांच्या व्यवसायाचे प्रारूप पुन्हा परिभाषित करावे लागणार आहे. आज भारतात अनेक फिनटेक व स्मॉल फायनान्स बँका, कंपन्या कार्यरत आहेत. छोटी मोठी कर्जे सुलभ पणे देण्याघेण्यासाठी शेकडो ‘ॲप्स’ उपलब्ध आहेत. अलीकडे रिझर्व्ह बँकेने त्याबाबत सावधानतेचा इशाराही दिलेला आहे. देशात युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे यूपीआय या यंत्रणेला अभूतपूर्व यश लाभलेले आहे. 2023 या वर्षात भारतात युपीआयचे 11760 कोटी व्यवहार झाले तर त्याचे मूल्य 182 लाख कोटी रुपये होते. त्यामुळेच फिंटरनेटचे सर्व व्यवहार अत्यंत विश्वासाने होण्याची नितांत गरज आहे. या तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने जागतिक पातळीवर निर्माण केलेली क्षमता खरोखरीच अद्वितीय आहे. या फिंटरनेटच्या कार्यप्रणालीसाठी स्वतंत्र नियम व नियंत्रण पद्धती रिझर्व्ह बँकेने विकसित करण्याची गरज आहे. जगातील शंभर पेक्षा जास्त मध्यवर्ती बँकांनी त्यांच्या चलनाचे ‘टोकन’ तयार करण्यासाठी पावले उचलली आहेत. काही देशांचे चलनाचे व्यवहार या ‘टोकन’ माध्यमातून यशस्वीपणे होत आहेत. यातील सर्व संभाव्य धोके, जोखीम लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने सर्व तज्ञांच्या मदतीने विचार विनिमय करून पुढील सुरक्षित पावले टाकण्याची गरज आहे हे निश्चित. त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर फिंटरनेट परिषद स्थापन करून खाजगी व सरकारी क्षेत्राला त्यात सहभागी करून योग्य दिशेने पावले टाकली तर भारताची तंत्रज्ञान क्षमता जगासमोर सिद्ध होईल यात शंका नाही. या दृष्टीनेच संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्राकडे केंद्रित झालेले आहे. फिंटरनेटच्या यशासाठी सर्व संबंधितांना हार्दिक शुभेच्छा.

प्रा. नंदकुमार काकिर्डे


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading