सोलापूर – अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला, जिल्हा समिती सोलापूरच्या वतीने सन-२०२४ या वर्षासाठी बाल साहित्यकांना पुरस्कार देण्यात आले आहेत.
प्रकाशभाई मोहाडीकर स्मृती बालसाहित्य सेवा पुरस्कार-२०२४ साठी बबन शिंदे (कळमणपुरी, जि. – हिंगोली) यांच्या ‘वंचितांचे राजे छत्रपती शाहू महाराज’ या बालकादंबरीस तर निर्मला मठपती स्मृती बालसाहित्य सेवा पुरस्कार-२०२४ रश्मी गुजराथी (पुणे) यांच्या ‘आनंदाच्या बिया’ या बालकथासंग्रहास जाहीर झाली आहे.
या पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येक पुरस्कारासाठी २५००/- रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे आहे. या पुरस्कारासाठी बालकथासंग्रह, बालकादंबरी, बालनाट्य असे बालसाहित्य पाठवण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून एकूण २१ बालसाहित्यिकांनी सहभाग नोंदवला होता. या पुरस्कारांचे वितरण बुधवारी (२ आक्टोबर २०२४ रोजी) दुपारी साडेतीन वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे होणार आहे.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अ. भा. साने गुरुजी कथामालेचे कार्याध्यक्ष लालासाहेब पाटील हे उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा सोलापूरच्या अध्यक्षा डॉ. श्रुती वडगबाळकर या असणार आहेत. याच वेळी कथामालेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरणही होणार आहे. तरी साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अ. भा. साने गुरुजी कथामाला जिल्हा समिती सोलापूरच्या वतीने करण्यात येत आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.