July 27, 2024
Agnipariksha for women why article by Sunetra Joshi
Home » अग्निपरीक्षा नेहमी सितेलाच का ?
मुक्त संवाद

अग्निपरीक्षा नेहमी सितेलाच का ?

खरेच स्त्रियांना का असा सतत सिद्ध करायला लागतो त्यांचा चांगुलपणा? संसार दोघांचा असतो. ती सगळ्या जबाबदार्‍या उत्तम रीतीने पार पाडत असते मग अशा एखाद्या अनुभवावरून तिला कसे काय दुषणे दिली जावी.

सौ सुनेत्रा विजय जोशी
रत्नागिरी

अनु आज थोडी नाराज होती. सकाळी राजेशसोबत थोडी वादावादी झाली म्हणून. ती देखील अगदीच क्षुल्लक कारणावरून. त्यांच्या लग्नाला अठरा वर्षे झाली. खरे तर इतका मोठा काळ हा कुणासाठीही परिचय व्हायला पुरेसा असतो. असे आपण म्हणतो खरे पण माणूस हा प्राणी तसा कळायला कठीणच.

झाले काय की अनुने तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर जाण्याचा बेत अगदी दोन महिन्यापूर्वी आखलेला होता. आणि काल नेमकी राजेशची मावशी अचानक आली. बरे ती आता चांगली आठवडाभर राहणार पण आहे. तरी राजेशचे म्हणणे तू तुझा बेत रद्द कर. खरे तर राजेशची पण काल सुट्टी होती. त्यामुळे मावशी घरात एकटी राहिल असा प्रश्न पण नव्हता. पण त्याचे म्हणणे ती काय म्हणेल? .. मी आले अन ही निघून गेली वगैरे. अजुनही अशा एखाद्या लहानसहान प्रसंगावरून मला का आजमावणार? आणि का? माझा स्वभाव टाळण्याचा नाही हे त्यांना आजपर्यंत कळले असणारच..

खरेच स्त्रियांना का असा सतत सिद्ध करायला लागतो त्यांचा चांगुलपणा? संसार दोघांचा असतो. ती सगळ्या जबाबदार्‍या उत्तम रीतीने पार पाडत असते मग अशा एखाद्या अनुभवावरून तिला कसे काय दुषणे दिली जावी. कळत्या वयापासून तिने वाचले ऐकले आहे की स्त्रिने माता, भगिनी, प्रिया, सखी, सहचारिणी असावे. पण मग पुरुषाने का वडील, भाऊ, मित्र, प्रियकर वगैरे होऊ नये? त्याला कुणी हे का सांगत नाही? स्त्रिला पण असे त्याने असावे असे वाटत नसेल का?

पुर्वीच्या काळी स्त्रिया घरातच असायच्या.. प्रत्येक गोष्टीत घरातल्या पुरुषावर अवलंबून. त्यामुळे आपण त्याच्या मर्जीनुसार नाही वागलो तर.. आपले काय होईल ही भिती असायचीच. शिक्षण नाही नोकरी नाही. माहेर सणासुदीच्या साडी चोळी पुरते. जगाचा अनुभव नाही. मग म्हणतील तसे करण्यावाचून पर्याय नव्हता. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. स्त्री शिकली, नोकरी करू लागली क्वचित पुरुषापेक्षा जास्त कमावू लागली. तरी तिच्याकडून अपेक्षा मात्र त्याच राहिल्या.

आपण चांगले तसेच संसारदक्ष आहोत हे सिद्ध करता करता आयुष्य संपूनही जाते. ती पण माणूस आहे. तिला पण ईच्छा आणि भावना आहेत ना. कधीतरी स्वतःच्या मनासारखे केले तर लगेच ती बेजबाबदार कशी काय ठरते? केले म्हणून खुश होणे सोडाच पण अपेक्षा वाढतच राहतात. शेवटी रबर सुध्दा विशिष्ट एका मर्यादेपर्यंत ताणता येते. पण हे कुणाच्या लक्षात येत नाही की सोईस्कर पणे दुर्लक्ष करतात. विचार करून अनुचे डोके भणभणायला लागले.

उगाच राजेशची नाराजी नको, तो आपल्या पासून दूर जायला नको म्हणून आजपर्यंत ती त्याला आवडेल तेच करत आली होती. पण त्याला असे का वाटू नये की अनुचे मन दुखावले तर तिला वाईट वाटेल किंवा ती आपल्या पासून दूर जाईल. की तसे झाले तरी त्याला त्याची पर्वा नाही. लग्न झाल्यावर आपण आपल्यात त्याच्यासाठी ठरवून किती बदल केले. पण तो मात्र जराही बदलला नाही

आपल्यासाठी. अगदी छोटी गोष्ट तिला नाटक बघायला आवडत पण त्याला ते संथ रटाळ वाटते. मग तो म्हणतो तू जा हव तर.. पण मग तिचे एकटीने रात्रीचे जाणे होत नाही. हळुहळु ते जाणे बंदच झाले. तिचे त्याच्या वरचे प्रेम तिला नेहमी त्यागातून का सिध्द करायला लागते. तो मात्र तिच्या साठी साधे सिगारेट, दारू सुध्दा त्यालाच अपायकारक असून सोडत नाही. अगदी पौराणिक काळापासून अग्निपरीक्षा नेहमी सितेलाच का? विचार करून थकली पण या प्रश्नाचे उत्तर मात्र सापडत नव्हते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

देशात 30 कौशल्य भारत आंतरराष्ट्रीय केंद्रे लवकरच – पंतप्रधान नरेंद्र मोदी

इस्लाम समजून घेण्यासाठी उपयुक्त पुस्तक

कृषिग्रामसंस्कृतीच्या गळाघोटीतून उमटलेला हुंकार : कासरा

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading