स्वतःमध्येही भगवंताचा वास आहे, याची प्रचिती जेव्हा येईल तेव्हा स्वतःतील ‘मी’पणा दूर होईल. तो दूर होणे आवश्यक आहे. तरच साक्षात्कार होईल.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
कृष्ण कोपोनि ज्यासी मारी। तो पावे ब्रह्म साक्षात्कारी।
मा कृपेने उपदेशु करी । तो कैशापरी न पवेल ।। ९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा
ओवीचा अर्थ – श्रीकृष्ण रागावून ज्याचा वध करतो, त्यास ब्रह्माचा साक्षात्कार होतो, मग ज्याला कृपेनें उपदेश करील तो ब्रह्मसाक्षात्काराला कसा पावणार नाही ?
आपल्या देशात राक्षसांना मारण्यासाठी भवानी, काली, दुर्गामातेचा अवतार झाल्याच्या कथा सांगितल्या जातात. दुष्ट-दुर्जनांना मारण्यासाठी ही देवी अवतार घेत असते. या राक्षसांना मृत्युसमयी या देवीचा साक्षात्कार होतो. अनेक दुष्ट व्यक्तींनी साक्षात्कारानंतर सत्कर्मे केल्याची उदाहरणे आहेत. वाल्हा कोळीचा वाल्मीकी झाला. नंतर त्यांची देवळे, समाधी बांधण्यात आली. हीच आपली संस्कृती आहे. म्हणूनच अफझलखानाची समाधी छत्रपती शिवरायांनी बांधली. अफझलखानाचा वध छत्रपतींनी घेतलेला नृसिंह अवतारच होता. सद्गुरूंचे, भवानी मातेचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होते. त्यांच्या आर्शिवादातूनच त्यांना वाघनख्यांची कल्पना सुचली. अफजलखान मुंडी चिरडून मारणार आहे हे त्याचे कपट छत्रपतींनी आधीच ओळखले होते. यातूनच शिवाजीराजे हे स्वयंभू होते, हेही स्पष्ट होते.
अशी अनेक उदाहरणे सांगता येण्यासारखी आहेत. भगवंत, सद्गुरू आपल्या कृपेने आपणास उपदेश करत असतात. मग आपणास का भगवंताचा साक्षात्कार होणार नाही? यावर विश्वास ठेवायला हवा. साक्षात्कारासाठी आपले अवधान महत्त्वाचे आहे. सर्व विश्वात भगवंताचा वास आहे, असा अनुभव यायला हवा. ब्रह्म सर्वांमध्ये आहे. सर्वांमध्ये भगवंताचा वास आहे. कर्मामुळे प्रत्येक जण विभागला गेला आहे. समाजात सुख, शांती नांदावी यासाठीच ही रचना आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली आहे. पूर्वजांना आलेल्या अनुभवातून त्यांनी काही नियम केले. यातूनच समाज रचना उत्पन्न झाल्या. हा विचार सध्याच्या पिढीने योग्य प्रकारे समजून घ्यायला हवा. शांतीसाठी उत्पन्न केलेली रचना हा उच्च हा नीच, असा भेदभाव कसा करेल. सद्गुरूंच्या सान्निध्यात तर सर्वच जण समान आहेत. फक्त आपला पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा.
सध्या जगात अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. दुष्कृत्ये करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा या बिकट काळात सद्गुरू कोणत्या ना कोणत्या रूपाने तुम्हाला मदत करत असतात. ही मदत सद्गुरूंची आहे, अशी अनुभूती यायला हवी. स्वतःमध्येही भगवंताचा वास आहे, याची प्रचिती जेव्हा येईल तेव्हा स्वतःतील ‘मी’पणा दूर होईल. तो दूर होणे आवश्यक आहे. तरच साक्षात्कार होईल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.