September 8, 2024
Kriya Palte Tatkal story by Avinash Halbe on Dasbodh
Home » क्रिया पालटे तात्काळ – भाग 4 था
मुक्त संवाद

क्रिया पालटे तात्काळ – भाग 4 था

नमस्कार मित्रांनो- मी अविनाश हळबे.

आपण दासबोधावर आधारलेली एक कथा ऐकत आहोत जिचे नाव आहे क्रिया पालटे तात्काळ – मागच्या भागात आपण मी विनयला दासबोध भेट दिल्यावर त्याच्यात होऊ लागलेले परिवर्तन आणि त्याबद्दलचे त्याचे प्रांजळ मनोगत बघितले.आज ऐकुया चौथा आणि शेवटचा भाग.

क्रिया पालटे तात्काळ – भाग 4 था

यापूर्वीचे भाग ऐकण्यासाठी क्लिक करा

विनय पुढे सांगू लागला.
‘या वाचनाचा आणि समर्थांच्या शिकवणीचा माझ्यावर इतका परिणाम झाला, की दासबोधातल्या काही ओव्या मी तोंडपाठ केल्या .. त्याचे चिंतनही करू लागलो. मधून मधून बोलताना मी त्या वापरत असे. या सर्व गोष्टींमुळे माझे वागणे आणि बोलणे, मग ते घरांत असो वा कंपनीत .. अत्यंत समयोचित आणि मुद्देसूद होऊ लागले. लोकांच्याही ते लक्षात येऊ लागले. 

एकदा एकाने मला ‘तुम्ही इतके छान वागता आणि बोलता, मग यावर प्रवचन किंवा व्याख्यान का देत नाही?’ असे विचारले. अवि तुला आठवत असेल.. शाळा–काॅलेजात मी वक्तॄत्वस्पर्धा गाजवल्या आहेत. मग एक दिवस तेही मनावर घेतले. पहिले प्रवचन केले .. तुलाही न कळू देता. आणि मग मी मागे वळून पाहिलेच नाही. एकीकडे मी दासबोध माझ्या स्वत:च्या जीवनात उतरविण्याचा प्रयत्न करतो, आणि दुसरीकडे जेवढे उतरले तेवढे प्रवचनातूनही सांगतोही. अवि खरं सांगतो … एकेकाळी मी या ग्रंथाचा उपहास केला होता, पण आता प्रामाणिकपणे सांगतो की दासबोधवाचनाने माझ्यात खूपच परिवर्तन घडले … आणि त्याबद्दल मी तुझा आभारी आहेे. आता बोल-’

यावर मी काय बोलणार?
‘अरे हो- मी तुला एनसायक्लोपिडिया दिला होता. तू तो वाचलास का ?’ विनयने विचारले.
‘होय विनय, तू दिले तेवढे खंड वाचले. मलाही ते फार भावले. मग मीही दासबोधात समर्थांनी ‘जितुके काही आपणासी ठावे । तितुके हळुहळु सिकवावे । शहाणे करून सोडावे । सकळ जन ।।’ या ओवीत सांगितल्याप्रमाणे त्यातले ज्ञान, शाळेतल्या मुलांपर्यंत पोहोचावण्यास सुरूवात केली. त्यातून आमचा ‘सायन्स क्लब’ निर्माण झाला. 

त्याद्वारे मी दर शनिवारी दुपारी ‘नाॅलेज एक्स्चेंज’ हा कार्यक्रम सुरू केला. त्यात मीच काय तर आता मुलेही नवीनवी माहीती सांगतात. सुरूवातीस फक्त पंचवीस विद्याथ्र्यांना घेऊन सुरू केलेल्या या माझ्या चळवळीचे, आत्ता अडीचशे विद्यार्थी सभासद आहेत. मधूनमधून मुले प्रयोगादाखल काही छोटीछोटी उपकरणेही बनवतात. लवकरच आम्ही महिन्यातून एकदा एखाद्या तज्ञ माणसाचे व्याख्यानही आयोजित करणार आहोत. आता बोल -’ – मी उत्तरलो.
‘अरे पण मी तुला त्यातले काहीच खंड दिले होते. अजून बरेच .. जवळजवळ वीसेक आहेत. तेऽऽऽ’ – विनय म्हणाला.

‘ते मला दिलेस, तर तेही वाचीन. आणि त्यातले ज्ञान मुलांपर्यंत नेर्इन. असो- पण आपल्या कराराप्रमाणे तू तुझा शब्द पाळलास. मीही पाळला. आता मी ठरल्याप्रमाणे वाचलेले खंड तुला परत देतो.’ – मी म्हणालो.

‘नको. परत देऊ नकोस. उलट उरलेल्यांसकट सगळा संच माझ्या कडून तुला सप्रेम भेट देतो’ – विनय म्हणाला.
‘म्हणजे ?’
‘हे बघ अवि. माझ्या जीवनात जे परिवर्तन घडले ते दासबोधामुळेच- आणि तो तू दिला नसतास तर ते निश्र्चीतच झाले नसते. हे सगळे तुझ्याचमुळे झाले रे. म्हणून फूल ना फुलाची पाकळी म्हणून मी ही भेट देतोय. त्यातून तू शिक्षक असल्याने हे ज्ञानभांडार तुला विद्याथ्र्यांपर्यंत न्यायला आजन्म उपयोगी पडेल. हा दुहेरी हेतू यामागे आहे. एनीवे .. जे काही झाले ते उत्तमच झाले’ विनय समारोप करत म्हणाला.
Ω Ω Ω

लवकरच आमच्या सायन्स क्लबचा वर्धापनदिन आला. अध्यक्ष म्हणून मी विनयलाच बोलावले. विनय एका नामांकित कंपनीत उच्चपदावर होता त्यामुळे माझी निवड सर्वांनाच आवडली. आमच्या मुलांनी केलेले निरनिराळे उपक्रम पाहिल्यावर मुलांसमोर त्याने विज्ञाननिष्ठ पद्धतीने अत्यंत सुंदर भाषण केले. मधून मधून दासबोध आणि इतरही ग्रंथातल्या ओव्या–श्र्लोकांचाही चपखलपणे उपयोग केला. त्याच्या भाषणाने मुलेच काय तर आमचे मुख्याध्यापकही खूश झाले. शेवटी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन करण्यासाठी मी उठलो तोच विनयने मला थांबवले.
‘काय रे ?’ मी विचारले.

‘मला एक अनाउन्समेंट करायची आहे’ असे म्हणत विनय पोडियमपाशी गेला व बोलू लागला.
‘प्रिय विद्यार्थिमित्रांनो- तुमच्या सायन्स क्लबचे काम पाहून मी अतिशय प्रभावित झालो आहे. तुमच्या क्लबचे कार्य आणखी प्रभावीपणे चालावे यासाठी मी तुमच्या क्लबला माझ्यातर्फे एक एल सी डी प्रोजेक्टर आणि लॅपटाॅपचा सेट भेट देत आहे. दोनचार दिवसातच तो मी पाठवून देर्इन. मला खात्री आहे की यांचा वापर करून तुम्ही आता दॄक–श्राव्य पद्धतीने ज्ञानाची देवाणघेवाण अधिक चांगल्या पद्धतीने करू शकाल. माझ्या तुम्हाला आणि तुमच्या उपक्रमांना लाखलाख शुभेच्छा -

मी विनयकडे बघतच राहिलो. मला दासबोधातली सुरूवातीचीच ‘आता श्रवण केलियाचे फळ । क्रिया पालटे तात्काळ । तुटे संशयाचे मुळ । येकसरा ।।’ ही ग्रंथश्रवणाची फलश्रुति आठवली. समर्थांच्या दासबोधाच्या निमित्ताने विनयची आणि माझी नुसतीच जीवन शैली बदलली नव्हती तर दोन ‘उत्तमपुरूषही’ घडवले गेले होते -

- अविनाश हळबे, पुणे. मोबाईल नंबर  – 9 0 1 1 0 6 8 4 7 2 

जयजय रघुवीर समर्थ ।
क्रिया पालटे तात्काळ भाग – २
क्रिया पालटे तात्काळ भाग १

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

क्रिया पालटे तात्काळ…( भाग २)

श्रीमद् ग्रंथराज दासबोध…. “अभ्यास” करण्यासाठीचा ग्रंथ….!

पुलंची प्रतिभा, मिश्किलपणा समोर ठेवूनच त्यांच्या कथांचे ध्वनिमुद्रित – अजय पुरकर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading