September 18, 2024
Dasbodh study program by Granthraj Dasbodh Adhyana
Home » श्रीमद् ग्रंथराज दासबोध…. “अभ्यास” करण्यासाठीचा ग्रंथ….!
काय चाललयं अवतीभवती

श्रीमद् ग्रंथराज दासबोध…. “अभ्यास” करण्यासाठीचा ग्रंथ….!

श्रीमद् ग्रंथराज दासबोध…. “अभ्यास” करण्यासाठीचा ग्रंथ….!

दासबोध हा आचार, विचारांची प्रणाली आहे. समर्थांनी तत्वज्ञान, व्यवहार सहज समजेल अशा सोप्या भाषेत दासबोधात समजून सांगितला आहे. ज्ञान सामर्थ्य प्रदान करते म्हणून ज्ञान व विवेकाला समर्थांनी परमोच्च स्थान दिले. प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड कशी घालावी याचे उत्तम पद्धतीने मार्गदर्शन समर्थांनी दासबोधात केले आहे.

कल्पना धर्माधिकारी

केंद्र संचालक, पुणे 
श्रीग्रंथराज दासबोध अध्ययन
६, सुयोग हाईट्स, स्नेह पँरडाईज,
पौड रोड, कोथरूड, पुणे ४११०३८
फोन : ९८८१०२३७६० 

आज दासनवमी……! श्री समर्थ म्हटले की सर्वांच्या नजरेसमोर प्रथम येतो तो “ग्रंथराज दासबोध”! दासबोध म्हणजे साक्षात श्री समर्थ ! समर्थ रामदासांचा “दासबोध” म्हणजे सत्यम् शिवम् सुंदरमचा अविष्कार आहे. दासबोध हा आचार, विचारांची प्रणाली आहे. समर्थांनी तत्वज्ञान, व्यवहार सहज समजेल अशा सोप्या भाषेत दासबोधात समजून सांगितला आहे. ज्ञान सामर्थ्य प्रदान करते म्हणून ज्ञान व विवेकाला समर्थांनी परमोच्च स्थान दिले. प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड कशी घालावी याचे उत्तम पद्धतीने मार्गदर्शन समर्थांनी दासबोधात केले आहे. परिश्रम करण्याची शिकवण, नेटक्या संसाराचा उपदेश, ज्ञानोपासनेचा उपदेश दासबोधातच मिळतो. शरीर, मन, आत्मा, मेंदू या सा-यांचा विकास झाला पाहिजे, तसेच नुसती बुद्धी असून उपयोग नाही तर शरीरानेही साथ दिली पाहिजे हा मोलाचा संदेश समर्थांनी दासबोधातून दिला आहे.

कष्टेवीण काही नाहीl कष्टेवीण फळ नाहीll

केल्याविना काहीच नाहीl साध्य जगीll

माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे आळस! हा सर्वात आधी टाकून “सदा सर्वकाळ कार्यरत राहावे, तसेच व्यस्त रहाण्याविषयी” दासबोध सर्वांच्या डोळ्यात अंजन घालतो.

          अखंड सावधान असावेl दुश्चित कदापि नसावेll

          तजविजा करीत बसावेl  एकान्त स्थळी ll

आयुष्यात नेहमी प्रसंग ओळखून वागावे, सावधानता अंगी बाळगावी…. निर्भय व कर्तव्यतत्पर व्हाल तर यश तुमचेच आहे याची ग्वाही समर्थ दासबोधात देतात! श्रीसमर्थांना त्या काळात “नवा पुरुष” घडवावयाचा होता. त्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. त्याची नितांत गरज आजही तितकीच आहे हे सद्यस्थिती पाहता प्रकर्षाने जाणवते.  पूर्ण मोठा दासबोध वाचणे व त्यामधून समर्थांनी सांगितलेले तत्वज्ञान आत्मसात करणे ही गोष्ट संसारामध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी व्यग्र असणाऱ्या स्त्री-पुरुषांना म्हणावी तेवढी सहजसाध्य व सोपी नाही. अशांसाठीच  समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड यांच्यातर्फे  वेगवेगळ्या केंद्रांद्वारे “पत्रद्वारे तसेच ईमेलद्वारे दासबोध अभ्यासक्रम” हा उपक्रम गेली ४५ वर्षाहून अधिक काळ निशुल्क चालविला जात आहे. त्यासाठी dasbodh.abhyas@gmail.com तसेच ८६६९४०५९७१ या नंबरवर अभ्यासार्थी संपर्क साधू शकतात.

अशा दासबोध अभ्यासात सातत्य ठेवल्याने विचारातून आचार परिवर्तन होऊन दासबोधाचे अंतरंग उलगडत जाते. अध्यात्मिक संकल्पना स्पष्ट होतात. नरदेहाचे महत्व, मर्यादा आणि सार्थक कशात आहे हे कळते. आत्मिक विकासाबरोबर  समाजाचा विकास ही विचारधारा दृढ होऊ लागते. थोडक्यात “यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली…. दासबोध” असे म्हटले तर अजिबात अतिशयोक्ती होणार नाही.

दासबोधातील कित्येक ओव्या रोजच्या जीवनातील नैराश्य प्रसंगी मानसिक धीर देऊन नवचैतन्य निर्माण करतात. अडचणीच्या प्रसंगी मार्गदर्शक होतात. संभ्रम दूर करतात. योग्य व्यवहार लक्षात येऊन तो आचरणात आणण्याचे बळ देतात. आत्मविश्वास वाढतो. साधेच औषध पण निश्चित गुणकारी असेच हे आहे. दासबोध हा पारायणाचा ग्रंथ नसून तो अभ्यास, मनन, चिंतन करून आत्मोन्नती करण्यासाठी आहे हे वर्षानुवर्षाच्या अनुभवावरून सिद्धा झाले आहे. “पहावे आपणासी आपण” ही अवस्था दासबोध देतो. “क्रिया पालटे तत्काळ या वचनाची प्रचीती दासबोध तत्काळ देतो…..!

दासबोधी समर्थ निवासl ग्रंथी वरदान निजध्यासl

निजध्यासेचि प्रत्ययासl येत ग्रंथस्वरूपेll

llजय जय रघुवीर समर्थll


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मी एक बाप आहे

श्री वनराईदेवी पारंपारीक पोशाखात श्री रूक्मिणीमाता

कोकणची इरसाल माणसं…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading