
नमस्कार मित्रांनो,
मी अविनाश हळबे. कालपासून आपण दासबोधावर आधारलेली एक कथा ऐकत आहोत जिचे नाव आहे क्रिया पालटे तात्काळ, पहिल्या भागात आपण मी, माझा मित्र विनय याच्या एकसष्ठीच्या कार्यक्रमास त्याला दासबोध भेट म्हणून देण्याचा विचार आणि तो पत्नीजवळ व्यक्त केल्यावर तिची आलेली प्रतिक्रिया बघितली.आज ऐकुया दुसरा भाग.
कथा ऐकण्यासाठी क्लिक करा
दोन दिवसांनी मी विद्यालयातून घरी आलो तो विनय येऊन बसलाच होता. वातावरणही तंग वाटत होते. ‘काय म्हणतोयस विनय, एकंदरीत छान झाली हं तुझी एकसष्टी. आवडले का आमचे प्रेझेंट,’– मी म्हणालो. माझ्या प्रश्र्नाबरोबर इतका वेळ शांत बसलेला विनय एकदम उसळून उठला आणि त्याने पिशवीसकट एक वस्तू माझ्या हातावर आदळली. ‘काय रे काय झाले , काय देतोयस हे मला ,’– मी विचारले. ‘तुझा दासबोध. रिटर्न विथ थँक्स ,’ विनयने उत्तर दिले.. ‘अरे पण कां , मी तुला तो प्रेझेंट दिलाय ,’– मी म्हणालो. ‘अवि तू माझा जुना मित्र आहेस. मला पोथ्यापुराणे, ग्रंथ–बिंथ आवडत नाहीत हे माहीत आहे ना तुला. मग तरी दासबोध कशाला दिलास , तू दिलास म्हणून मी परत तरी देतोय. इतर कोणी दिला असता तरऽऽऽऽ’ विनय परखडपणे म्हणाला. ‘प्रिय मित्रा, पहिली गोष्ट म्हणजे दासबोध हा ग्रंथ तू म्हणतोस तसे पोथीपुराण नाही. हा दैनंदिन जीवनातही उपयोगी पडणारा व्यवहारकोश आहे. तू तो न बघताच नावं ठेवत सुटला आहेस ,’– मी म्हणालो. ‘हे बघ, हे सगळं माहीती आहे. मला शहाणपणा शिकवू नकोस ,’ विनय. ‘अरे पण तू वाचलंस का यातलं काही, मग आधीच का चिडतोस , या बाबतीत समर्थ काय म्हणतात हे सांगितले तर तुला राग येईल. सांगू ,’– मी. ‘काय म्हणतात तुझे समर्थ,’ विनय म्हणाला. समर्थ म्हणतात ‘समूळ ग्रंथ पाहिल्याविण, उगाच ठेवी जो दूषण, गुण सांगता पाहे अवगुण, तो येक पढतमूर्ख ,’ आणखी सांगतो, तू दासबोधातली मूर्खलक्षणे आणि पढतमूर्खलक्षणे वाचलीस तर .. . तर .. ’ ‘तर काय ,’ विनयने विचारले. ‘तर ती सगळीच्या सगळी आजही आपल्यातल्या प्रत्येकाला, कधी ना कधी लागू पडतात हे तुझ्या लक्षात येईल. इतकेच नाही तर जीवनातल्या प्रत्येक गोष्टींबाबत समर्थांनी अगदी सोप्या शब्दात मार्गदर्शन केलेले आहे. अरे नुसते मनाचे श्र्लोक नुसते वाचून एखादा मनोरूग्णही लवकर बरा होईल, मन बलसंपन्न बनविण्यासाठी मनाचे श्र्लोक, शरीर बलसंपन्न होण्यासाठी श्रीहनुमंताची उपासना, सूर्यनमस्कार, याबरोबरच लिहीताना अक्षरे कशी गिरवावीत, चारचौघात कसे वागावे, घर कसे बांधावे, त्यासाठीच्या विटा कशा तयार कराव्यात, एवढेच नव्हे तर पर्यावरण, व्यवस्थापनशास्त्रही समर्थांनी दासबोध आणि इतर ग्रंथात सांगितले आहे. मला तर दासबोधवाचनाने आयुष्यात खूपच फायदा झाला .. आणि आजही होतो आहे .. म्हणून तूसुद्धा एकदा वाचून बघ.’ मी हसत म्हणालो. ‘हे बघ अवि, या सगळया जुन्यापुराण्या गोष्टी मला नको सांगूस. आज जगातले अनेक शास्त्रज्ञ मिळून विश्र्वाची निर्मिती कशी झाली हे शोधण्यासाठी ‘हायड्रोजन कोलायडर’ नावाच्या महाप्रकल्पावर काम करत आहेत, आणि तू अजून ही जुनाट पोथ्यापुराणे कवटाळून बसलाहेस. त्यापेक्षा तू विज्ञाननिष्ठ हो ,’ विनय म्हणाला. ‘कुणी सांगितलेय संतवाङ्मय विज्ञाननिष्ठ नाही म्हणून, विश्र्वाची उत्पत्ती एका महाभयंकर स्फोटातून झाली, हा सर लॉवेल यांचा सिद्धांत विज्ञान मानते. हेच आपल्या वेदांनीच नव्हे तर समर्थांनीही साडेतीनशे वर्षांपूर्वी सांगीतले आहे. हा बघ तो अभंग – नव्हते जळ नव्हते स्थळ, नव्हता मेरू मंदराचळ, नव्हते आकाश मेदिनी, नव्हता चंद्र सूर्य दोन्ही. जन्म नव्हता पंचभूता, अवघा निराकार होता, तेथे ब्रह्मध्वनी झाली, लटकी माया उद्भवली .. याचा अर्थ पूर्वी ईश्वर निर्गुण निराकार होता, हे विश्र्वही नव्हते. असेच केंव्हातरी ब्रह्मध्वनी म्हणजे महाभयंकर स्फोट झाला व त्यातून माया म्हणजे हे विश्र्व निर्माण झाले. असे अनेक दाखले मला दासबोधातून देता येतील’ – मी म्हणालो. ‘हे बघ अवि, ते काही असले तरी मला हा दासबोध नको. मला तो वाचण्यात काडीचाही इंटरेस्ट नाही. माझ्या पर्सनल लायब्ररीत पाश्र्चात्यांची उत्तमोत्तम पुस्तके आहेत. तुला हवे तर ती तूच वाचायला घेवान जा’ विनय हार मानायला तयार नव्हता. त्या क्षणी एक अनोखी कल्पना माझ्या मनांत चमकून गेली. मी क्षणभर विचार केला आणि म्हणालो. ‘ठीक आहे विनय. तुला दासबोध वाचण्यात इंटरेस्ट नाही आणि मला विज्ञानात नाही असे तुला वाटतेय ना. हरकत नाही, आपण असे करूयात. तू हा दासबोध घरी घेवान जा. यात एकूण दोनशे समास आहेत. तू रोज एक समास याप्रमाणे संपूर्ण दासबोध वाचायचास. याला दोनशे दिवस लागतील. हवेतर एक वर्षही घे. त्या बदल्यात तू मला तुझ्याकडचे कोणतेही पुस्तक दे. मीही ते वर्षभर वाचीन. दासबोध एकदा संपूर्ण वाचूनही तुला तो टाकावा वाटला तर तू मला परत दे. पण दासबोध तुला आवडला तर तो तू कायमचा ठेवान घ्यायचास, जमेल तेंव्हा वाचायचास. मीही तुझे पुस्तक तू म्हणालास तर घेर्इन. पुन्हापुन्हा वाचीन. देतोस वचन ,’ मी दासबोध त्याच्यापुढे धरत म्हटले. माझ्या युक्तीने आता विनय चांगलाच पेचात सापडला. आता तो नाही म्हणूच शकत नव्हता. त्याने काहीश्या घुश्श्यातच दासबोध माझ्या हातातून घेतला व लगोलग निघाला. ‘एक मिनीट थांब विनय. रोज वाचण्यापूर्वी मी सांगतो ती ओवी म्हणूनच सुरूवात करत जा’ – मी. ‘कोणती ओवी , – विनय म्हणाला. ‘मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावेे, अपत्या्रंपरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सदगुरू रामदासा’ आणि दुसऱ्या क्षणी मी ती ओवी त्याच्याजवळच्या ग्रंथावर लिहूनही दिली. विनय काही न बोलला काहीसा घुश्श्यातच निघून गेला. दुसऱ्याच दिवशी विनयच्या नोकराने पुस्तकांचा एक जाडजूड गठठा माझ्याकडे आणून दिला. मी तो सोडून पाहिला. ‘एनसायक्लोपिडिया ब्रिटानिका’ या सिरीजचे ते चारपाच खंड होते. मला हसूच आले. विनयही काही कमी नव्हता, तर मंडळी आज इथेच थांबुयात. ही कथा तुम्हाला आवडत असेल तर क्रमश: आपापल्या मित्रमंडळींना पाठवा. अविनाश हळबे, पुणे. मोबाईल - 9 0 1 1 0 6 8 4 7 2 उद्या बघुया पुढचा भाग. धन्यवाद, जयजय रघुवीर समर्थ....