हे पुस्तक केवळ स्व. तात्यासाहेब नातूंचे जीवनचरित्र नसून यात रत्नागिरी, चिपळूणसह गुहागरचा इतिहास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकणातील वाटचालीचा इतिहास आहे. भारताच्या व महाराष्ट्र राज्याच्या १९९२ पर्यंतच्या निवडणुकांचा अभ्यास आहे. कोकणातल्या गुहागर पट्ट्यातील बोलीभाषेचा ठेवा यात आहे.
सुभाष लाड
स्व. डॉ. तात्यासाहेब नातू यांचे जीवन चरित्र असणारे ‘जनी जनार्दन’ नावाचे पुस्तक घेऊन पोस्टमन मुंबईच्या घरी आला तेव्हा मी गावी, कोकणात जाण्याची तयारी करीत होतो. नेहमीप्रमाणे प्रवासात वाचण्यासाठीची पुस्तके अगोदरच बॅगेत भरली होती. ‘जनी जनार्दन’ सोबत घ्यावे असा विचार होता. परंतु पुस्तकाचा आकार पाहून मी विचारात पडलो. उत्सुकता म्हणून ‘जनी जनार्दन’चे आवरण काढून त्याला मोकळा श्वास देऊ केला. तब्बल सातशे आठ पानांचे आणि इंग्रजी पुस्तकांना वापरण्यात येणारा वजनाने हलका पण दर्जेदार कागद वापरलेला असल्याने ते सहज हाताळू शकू याची खात्री झाली.
मुखपृष्ठावर स्व. तात्या नातू यांचे रेखाटलेले चित्र प्रत्यक्ष छायाचित्र वाटावे इतके हुबेहुब असल्याने कोणाची कलाकृती आहे हे पाहण्याची इच्छा अनावर झाली. नामनिर्देश पानावर पाहिलं तेव्हा लक्षात आलं, कोल्हापूरच्या स्व. जे. बी. सुतार यांच्या या मूळचित्राला ‘चैताली नाचणेकर’ यांनी साज चढविला होता. पुस्तकाचे लेखक धीरज वाटेकर हे पर्यटन-पर्यावरणप्रेमी म्हणून आजवर माहिती होते. याच विषयाच्या अनुषंगाने त्यांनी विपुल लेखन केले आहे. विविध विषयांवरची त्यांची आठ पुस्तके प्रकाशित असून काही सन्मानही त्यांना मिळाले आहेत.
खरंतर त्यादिवशी तातडीने मला पुस्तक वाचायचे नव्हते. परंतु आवडीचे लेखक, मुखपृष्ठाने घातलेली भुरळ त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रस्तावना असल्याने सुरूवातीची काही पाने चाळण्याची तीव्र इच्छा स्वस्थ बसू देईना. म्हणून पुस्तक उघडून बसलोच ! तसे प्रस्तावनेत कुणी वाईट लिहित नसले तरी लिखाणातली आढ्यता किंवा मोकळेपणा यावरून प्रस्तावनेचा रोख समजून येतो. किमान पुस्तक का वाचावे ? याकरिता प्रस्तावनाकारांनी काही ठळक मुद्दे मांडलेले असतात, त्यावरून वाचक पुढे कसे जायचे ते ठरवित असतो. गडकरी यांचा स्पष्टवक्तेपणा जगजाहिर आहे. त्यांना स्वर्गीय तात्यांचा मिळालेला सहवास लिहिताना त्यांनी, लेखकानेही चरित्रनायकाला न्याय मिळवून दिल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. मी प्रस्तावना संपवून लेखकाच्या मनोगताकडे वळलो. स्वर्गीय तात्यांचे ‘देवमाणूस’पण मोठे आहेच, पण त्यांनी विंचूदंशावरील औषधाकरीता हाफकिन इन्स्टिट्यूट आणि सरकार यांचेकडे केलेला पाठपुरावा हा मला अधिक मोलाचा वाटतो. कारण सगळेच डॉक्टर बाजारात येणाऱ्या औषधांचा वापर करून आपला व्यवसाय करतात. परंतु कोकणातला एक डॉक्टर चक्क औषध निर्मितीसाठी जिद्द आणि चिकाटी बरोबर स्वत:ची पदरमोडही करतो, हे कौतुकास्पद आहे. खऱ्या अर्थाने डॉक्टरकी कशी असावी? याचा आदर्शपाठच तात्यांनी घालून दिला आहे. त्यामुळे लेखकाचे मनोगतही साचेबंद न राहता ते पुस्तक पुढे वाचण्यास प्रवृत्त करते.
लेखक इतिहासाचा जातिवंत अभ्यासक आहे. इतिहासाचा अभ्यासक हा जनावरांवरच्या गोचिडासारखा असतो. जोपर्यत त्याचे पूर्ण पोट भरत नाही तोपर्यंत तो पडत नाही. तसा इतिहास अभ्यासक विषयाच्या मुळापर्यंत जाऊन पूर्ण संदर्भ मिळाल्याचे समाधान होत नाही तोपर्यंत तो विषयाला चिकटून असतो. तो संदर्भाने, अभ्यासाने परिपूर्ण होतो तेव्हाच तो आपले भाष्य करतो. जनी जनार्दनमध्ये हाताळलेला प्रत्येक विषय हा त्या निकषावर खरा उतरलेला आहे. इथे दंतकथांना किंवा ऐकीव माहितीवर असं काहीही नाही आहे. तात्यासाहेब जसे जगले तसे मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे. चरित्रातील ती गावे, त्यात्या वाटा, त्यात्या गावातील आणि वाटेवरील वैशिष्ट्ये वाचताना वाचकाला आपण तिथे आहोत असे जाणवत राहाते. पुस्तकातील प्रसंग जीवंत असून आता प्रत्यक्ष घडताहेत असे वाटते. त्यामुळे एक डॉक्टर, ‘अनेक रूग्णांना मदत करत असतो’ हे लिहिताना मागच्या रूग्णाच्या वेळी केलेले वर्णन पुन्हा कुठे द्विरुक्तीचा ठपका घेत नाही. म्हणून हे चरित्र प्रवाही झाले आहे.
चरित्रनायकाचा जन्म स्वातंत्र्यापूर्वी झाला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यावर्षात तो डॉक्टरकीचे शिक्षण घ्यायला मुंबईत जातो. पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होतात तेव्हा तो गळ्यात स्टेथॅस्कोप घालून डोंगरदऱ्यातील मैलोनमैल पायवाटा तुडवत रूग्ण तपासायला गावोगाव फिरतो. गीतेतल्या शिकवणीप्रमाणे कोणत्याही फळाची आशा न बाळगता रूग्णसेवेबरोबरच बालपणी घडलेल्या शिकवणुकीमुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याशी जोडून राहत सामाजिक व शैक्षणिक सुधारणात सर्वस्व वाहून काम करतो. त्यामुळे लोकांकडून मिळालेल्या प्रेमामुळे त्याला जिल्हा परिषद सदस्य, आमदारकी मिळते. हे सर्व लिहिताना लेखकाने त्या त्या काळातील भौगोलिक व सामाजिक परिस्थितीचे केलेले वर्णन त्या काळाकडे घेऊन जाते. राजकारणात आल्यानंतर मला लोकांची कामे करण्यासाठी लोकांनी निवडून दिले आहे, ही भावना चरित्रनायक सतत जागृत ठेवून आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत नि:स्पृहपणे कामच करीत राहतो. चांगल्या माणसालाही काही दिव्ये पार पाडावी लागतात. कधी अपमान तर कधी पराभव पत्करावा लागतो. विजयाचा उन्माद नाही तसे पराभवातही खचून जाणे नाही. कोणाला दोष देणे नाही ही संतप्रवृत्ती किर्तनात सहज सांगता येते. पण प्रत्यक्ष जगताना मनावर किती ताबा ठेवावा लागत असेल ते माणूस नाही तर ‘देवमाणूस’च जाणे!
हे पुस्तक केवळ स्व. तात्यासाहेब नातूंचे जीवनचरित्र नसून यात रत्नागिरी, चिपळूणसह गुहागरचा इतिहास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकणातील वाटचालीचा इतिहास आहे. भारताच्या व महाराष्ट्र राज्याच्या १९९२ पर्यंतच्या निवडणुकांचा अभ्यास आहे. कोकणातल्या गुहागर पट्ट्यातील बोलीभाषेचा ठेवा यात आहे. लोकशाहीतल्या लोकप्रतिनिधींनी तसेच पक्षाच्या किंवा संस्थांच्या कार्यकर्त्याने कसे वागले पाहिजे? याचा आदर्श वस्तुपाठ यात आहे. एका कुटुंबाची परंपरा पुढच्या पिढीने पुढे कशी न्यायची असते, याचे मार्गदर्शन या पुस्तकातून मिळते.
सुभाष लाड
( ग्रामीण साहित्य संमेलनांचे आयोजक आणि राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष)
पुस्तकाचे नाव – ‘जनी जनार्दन’
लेखक – धीरज वाटेकर
प्रकाशक – विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे
एकूण पृष्ठसंख्या – 708
पुस्तकाची किंमत – 1299 Rs.
पुस्तकासाठी संपर्क – विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे, 9168682201
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.