जशी 66 वर्षांपासून कार्यात्वित असलेली राष्ट्रीय उत्पादकता परिषद (National Productive Council) आहे, तशी कृषी क्षेत्रासाठी उत्पादकता वृद्धीसाठी काहीच प्रयत्न झाले नाहीत. अन्नधान्य उत्पादकते मध्ये (क्विंटल/हेक्टर) भारताचा जगात 73 वा नंबर आहे.
त्यातील एक प्रतिनाधिक पीक म्हणून “साखर- टास्क फोर्स कोअर कमिटी” ने पुण्यामध्ये “100 टन/एकरी ऊस व 75 टन/एकरी खोडवा उद्दिष्टे” ह्या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती.
सुरुवातीला श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्ताराम रासकर यांनी प्रास्ताविक करताना “साखर- टास्क फोर्स कोअर कमिटी” च्या स्थापनेची पार्श्वभूमी सांगून आजच्या चर्चामंथनचे उद्दिष्ट सांगितले. फोरम ऑफ इंटलेकच्युअल्सचे अध्यक्ष सतीश देशमुख यांनी सांगितले की साखर उद्योगा पुढील आव्हाने, शेतकऱ्यांचे हित व आर्थिक उन्नतीसाठी, ऊस तोड कामगार, कर्मचारी ह्या सर्व स्टेक होल्डर्स चा सर्वांगीण विचार करण्यासाठी हा टास्क फोर्स कार्यरत असतो. तो नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासपूर्ण विचार मंथन करून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी केंद्र / राज्य सरकार कडे पाठपुरावा करीत असतो. आज पर्यंत साखरे साठी द्विस्तरीय भाव, इथेनॉल चा एफआरपी वर होणारा परिणाम, ठिबक सिंचनाची वाढ वगैरे विविध विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली होती.
त्यांनी असेही नमूद केले की आजच्या परिस्थितीमध्ये साखर तयार करणे म्हणजे एक उपपदार्थ, बाय प्रॉडक्ट झालेला आहे. या उद्योगाचे ऊर्जा क्षेत्रात झपाट्याने रूपांतर होत आहे. उदाहरणार्थ इथेनॉल निर्मिती, बायोगॅस, बायो सीएनजी, सॉलिड कार्बन डाय-ऑक्साइड (ड्राय बर्फ), कोजनरेशन, ग्रीन हायड्रोजन अशी अनेक मुख्य उत्पादने होत आहेत. केंद्र सरकारच्या “नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन” प्रमाणे 2030 पर्यंत देशांमध्ये 60 लाख मॅट्रिक टन प्रति वर्ष इतके हरित हायड्रोजनचे उत्पादन होणार आहे. त्यापैकी 10 लाख मेट्रिक टन हायड्रोजन उत्पादनामध्ये साखर उद्योगाचा सहभाग असणार आहे.
‘उसाची उत्पादकता वाढ’ ह्या विषयावर मार्गदर्शन करताना कृषिभूषण डॉ. संजीव माने ह्यांनी सांगितले की जमीनीची सुपीकता, लागण पध्दत, रासायनिक व सेंद्रिय खतांच्या मात्रा, पाण्याचे व्यवस्थापन व पीक संरक्षण हया पंचसुत्रांचा अवलंब केला पाहीजे. त्यांचा 1997 पासून सुरु असलेल्या संशोधन प्रक्रिया, अथक प्रयोग, प्रयत्न व मिळालेल्या यशाचा उल्लेख करून त्यांनी सखोल आकडेवारी सकट माहिती दिली. श्री. माने यांनी ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, कृषी विद्यापीठ, राहुरी तसेच विविध तज्ञ यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन स्वतःच्या शेतातील ऊसाचे उत्पादन टप्प्या टप्प्याने वाढवित प्रति एकर 168 टना पर्यंत नेले. त्यांनी सर्व गुरूंचा आवर्जून उल्लेख केला. त्यांचे हे बहुमोल कार्य पाहुन सतीश देशमुख यांनी त्यांना “बांधावरचा कृषि शास्रज्ञ” ही उपाधी बहाल करून गौरवपूर्ण उल्लेख केला.
‘ॲग्रो इनपुटस मॅन्यफॅक्चरर असोसिएशन ऑफ इंडिया’ चे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांनी खतांचा संतुलित वापर या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणात त्यांनी लहानपणापासून आढावा घेत, वडिलांच्या दूरदृष्टी संस्काराचे व शिक्षणाचे महत्व, त्यातून निर्माण झालेली सामाजिक जाणीव, यशस्वी व्यवसायाची भरारी तसेच त्यांच्या खताच्या प्रमाणिकरण बाबतच्या न्यायालयीन लढ्याचा परामर्ष घेतला. त्यांनी सांगितले की व्यापाऱ्याप्रमाणे शेतकऱ्यांनी पण जमा – खर्चाच्या नोंदी ठेवणे अत्यावशक आहे. त्यांनी परिश्रमाने तयार केलेल्या कृषी अर्थमेळ ह्या डायरीचे उपस्थिताना मोफत वाटप केले.
डॉ. दिपक गायकवाड, अर्थ कृषीतज्ञ ह्यांनी सांगितले की पाणी आणि निविष्ठांचा सढळ वापर होऊनही गेली काही वर्षे उसाच्या उत्पादकतेमध्ये स्थिरता आली नाही. त्यामुळे आता ऊस शेती तंत्र, प्रशिक्षण, पाणी, माती आरोग्य, वाफसा यासारख्या तांत्रिक पीक व्यवस्थापन कौशल्ये ऊस शेतीत वापरणे ही काळाची गरज आहे. नेमक्या याच मुद्यावर, केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जोर देऊन तांत्रिक आधुनिकता (TFP-Total Factor Productivity) याची परिणामकारकता साधूनच कृषी उत्पादकता येत्या काळात वृध्दींगत करता येईल, त्यासाठी आर्थिक तरतुदी अर्थसंकल्पात केल्या आहेत. डॉ. गायकवाड यांनी असे सुचवले की ह्या फोरम मध्ये कृषी क्षेत्रातील अभ्यासक, उस शेतकरी, साखर कारखानदार, अर्थशास्त्रज्ञ, प्रशासक, इंजिनीअर्स, कृषी क्षेत्रातील अनुभव समृद्ध असे लोक आहेत. त्यांनी एकत्रितपणे काम करून देशापुढे ऊस उत्पादकता वृध्दी साठी एक व्यवहार्य, शाश्वत व परिणामकारक मॉडेल मांडले पाहीजे.
‘कान बायोसिस रिसर्च ॲण्ड एज्युकेशन फाउंडेशनचे’ व्हाईस प्रेसिडेंट प्रशांत कुलकर्णी व अमेय जोशी यांनी जमीनीचे आरोग्य या विषयी माहिती देतांना समक्ष शेतात प्रयोग करून शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके दाखवित असल्याचे सांगितले. या वेळी एकरी शंभर टना पेक्षा जास्त उत्पादन घेतलेले शेतकरी खंडु भुजबळ व नितीन वरखडे यांनी त्यांची यशोगाथा सांगितली.
विस्माचे कार्यकारी संचालक अजित चौगुले ह्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमां बद्दल माहिती दिली. तसेच ह्या कार्यक्रमात शुगर टुडेचे संपादक नंदकुमार सुतार, अतुल माने पाटील, अध्यक्ष- महाराष्ट्र ऊस उत्पादक संघ ह्यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. नवदीप सोशल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष व थेऊरच्या यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक साहेबराव खामकर यांनी आभार प्रदर्शन केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.