कोकणकडा म्हणजे महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा शिरोमणी. त्याच्या एकंदर १८०० फूट उंचीच्या आणि साधारण ५०० मीटर म्हणजेच अर्धा किलोमीटर लांब वलयाच्या प्रेमात कोणी पडलं नसेल अस अशक्यच. कोकणकड्याचे ` सौंदर्य प्रत्येक ट्रेकरला किंवा गिर्यारोहकाला जागच्या जागी खिळवून ठेवतेच.
स्नेहल घेरडे
सदस्य,
पिंपरी – चिंचवड माउंटनिअरिंग असोसिएशिअन (PCMA)
चिंचवड, पुणे
मोबाईल – 7588492020
२०१९ मध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोकणकड्याला भेट दिली तेव्हा स्वतःला यात झोकून द्यावे अशी भावना मनात तरळली. जेव्हा नळीच्या वाटेने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा आयुष्यात कधीतरी कोकणकड्यावर चढाई करू असा स्वप्नविचार शिवून गेला. वरच्या दोनही विचारांचा मध्यबिंदू साधून रॅपलिंगचा विचार योग्य वाटला. या थरारक अनुभवासाठी २६ जानेवारी २०२१ भारताचा प्रजासत्ताकदिन निवडला गेला.
२०२१ च्या साहसांना सुरुवात झाली.महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या आणि उंच कड्यावरून म्हणजे १८०० फुटी सुळक्यावरून झेप घेणे म्हणजे क्षणीक गरुड झाल्याचा भास झाला. या दिवशी माझ्यासोबत ४४ जणांनी रॅपलिंग केलं. ही मोहीम माझे मॉन्टेनिअर लहू उघडे, कृष्णा मरगळे, मित्र तुषार दत्तात्रय दिघे पाटील, सोनाली वाघे, शंकर मरगळे, संदेश इवलेकर, मनोज वांगड तसेच महेश शिंदे यांच्या मदतीने पूर्ण केली.
२५ जानेवारीच्या रात्री १० वाजता पुण्याहून गाडी निघाली आणि मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास खिरेश्वर गावात पोहचलो. कुडकुडणाऱ्या थंडीत गरम चहा घेऊन साधारण पहाटे तीनच्या सुमारास खिरेश्वर ते कोकणकडा पायपीट सुरु झाली. चढ-उतार अनुभवत सकाळी साडेसहाच्या सुमारास सूर्याची उन्ह अंगावर घेत कोकणकडा नजरेस पडला. आता कोकणकड्याच्या कुशीत शिरायचं या विचाराने नास्ता गेला नाही कि चहा गोड लागला नाही, आनंद होता कि भीती हे देखील समजेना. मात्र स्वप्नपूर्ती होणार याची खात्री येत होती म्हणून एक वेगळच वार अंगात संचार होत. आजचा दिवस माझाच आहे, याची जाणीव पदोपदी होत होती.
आमच्या सोबत असलेल्या सर्वांच्या सुरक्षिततेची प्रार्थना करून इव्हेंटला सुरुवात झाली. सगळ्यांना खाली सोडताना हवे नको असलेल्या गोष्टी बघण्याची जबाबदारी माझी होती, त्यामुळे सगळ्यात शेवटी उतरण्याचा मान मला मिळाला. पहिला माणूस, दुसरा माणूस, तिसरा .. असं करत करत माझा नंबर यायला साधारण दुपारचे साडेबारा वाजले. कोकणकड्याचा पहिला टप्पा म्हणजे “ओव्हरहॅन्ग” उंची ४०० फूट. जमीन पायाला न लागल्यामुळे पोटात येणाऱ्या गोळ्याचा अनुभव या ठिकाणी अनेकांनी घेतला. ४०० फुटांवरून वर आणि आजूबाजूला पाहिले असता देवाने अजून दोन डोळे का नाही दिले असं वाटलं. उजव्या आणि डाव्या हाताला असलेले उंच कडे पाहिले. हे कडे इजिप्तमधील शिल्पांप्रमाणे मांडीवर हाथ ठेवलेले, उंच मुकुट परिधान केलेले आणि ध्यानस्थ बसलेल्या राजा राणी प्रमाणे भासत होते.
पहिला टप्पा उतरून खाली आल्यावर साधारण १०० ते १५० मीटर चालून गेले आणि दुसऱ्या टप्यावर पोहचले. तिथून खाली साधारण २०० ते २५० फुटाचा रॅपलिंगचा पॅच होता. तिथून तिसरा टप्पा सगळ्यात आव्हानात्मक आणि सगळ्यात मोठा म्हणजे ८०० फुटाचा होता. या ८०० फुटाच्या टप्प्याची एकच बाब समाधानाची होती ती म्हणजे हा टप्पा रॅपल करताना कातळाची सोबत आणि आधार दोन्ही लाभत होत, त्यामुळे आत्मविश्वास जास्त वाढत होता. आत्तापर्यंत मी जितका रॅपलिंगचा अनुभव घेतला, त्यातील सगळ्यात उत्तम रॅपलिंग कोकणकड्यावर झालं असे मला वाटते.
त्यानंतर पुन्हा २५० ते ३०० फुट खाली उतरून बेस कॅम्प होता. शेवटची व्यक्ती जोपर्यंत बेस कॅम्पला पोहचत नाही तोपर्यंत आम्हाला वाइंड उप करता येणार नव्हते. संध्याकाळचे साडेपाच वाजले होते. सूर्य देखील आता आमचा पराक्रम बघून थकला असावा. संध्याकाळच्या त्या शांततेत, थंड हवेच्या लहरीत कोकणकड्याकडे बघत बघत तंदरी लागली. रात्रभर खिरेश्वर मार्गी चाललेल्या ३ तासांचे रूपांतर डुलक्यांमध्ये होऊ लागले. एका भल्यामोठ्या दगडाचा आधार घेऊन त्याच्या सावलीत म्हणजेच कोकणकड्याच्या कुशीत क्षणभर सुखावले. निरभ्र आकाशाकडे बघत आणि नजरेत मावेल अशा त्या कातळकडे पाहत मी काही काळ ढगात पोहचले.संध्याकाळचे साडेसहा वाजले.
समोरची व्यक्ती बघण्यासाठी डोळे मोठे करण्याची वेळ येऊ लागली कारण अंधार वाढत होता. मी आणि माझे सगळे सहकारी झपझप खाली उतरलो. सोबत आणलेले सर्व सामान, रोप आटोपशीर घेई पर्यंत साडेसात वाजले. बॅगेतील, खिशातील हेडटॉर्च डोक्यावर चढल्या.
अवघ्या २ मिनिटातच चालू झाला खरा तो म्हणजे दुसरा थरार ! कोककणकड्याच्या दरीतून बैलपाड्यापर्यंतचा .. !! गेले कित्येक वर्ष माणसं काय पण गुरे देखील तिथे भटकायला आली नसल्याने झाडा -झुडपांची दाटीवाटी झाली होती. पायवाट नव्हती. त्यातून भर अंधारात, सटकन पाय खाली घसरणाऱ्या वाटेवरून चालताना आमचा चांगलाच कस निघत होता. तोच रस्ता पुढे जाऊन कोकण कड्याच्या नऊ मार्गांपैकी सगळ्यात कठीण अशा नळीच्या वाटेकडे ओढ्यातून जात होता. पाणी सुकल्यामुळे दगडांनी डोकी वर काढली होती. दर २ मिनिटांमधे उठाबाश्याचं सत्र चालू झालं. ती वाट पार करताना किमान २०० ते २५० उठाबशा सहज निघाल्या असतील. इतके मोठे धोंडे त्या मार्गात होते. ती वाट संपेपर्यंत रात्रीचे साडेनऊ वाजले होते. जेव्हा हा दगड धोंड्यांचा खडकाळ रस्ता संपला तेव्हा, जीव भांड्यात पडणे म्हणजे काय याची प्रचिती आली. पायाखाली लागलेली सरळ पायवाट बेलपाडाला घेऊन जात होती. चमकणारे दिवे देखील त्याची ग्वाही देत होते. मागे वळून पहिले असता कोकणकडतावर धुक्याची शाल पसरत चालली होती. हो देखील बघत होता कि आम्ही नीट पोचतोय का नाही. रात्रीच्या सव्वादहा वाजता हात करून त्याला सुखरूप पोहचण्याची हमी दिली.
हे रॅपलिंग का बरं सुरक्षित झालं किंवा कोकणकडा उतरण्यासाठी जो सेटअप लावण्यात आला, त्या साठी लागणारे बोल्टिंग (पेटझेल बोल्टिंग) कोणी बरं केलं असेल ? कसे लावले असतील ? कधी लावले असतील? का देवानेच कोकणकडा बनवताना हे बोल्टस बसवले असावेत ? येतात का असे विचार मनात ? कधी केलाय विचार ?तर मला अभिमानाने सांगावास वाटत कि गिर्यारोहकांना कोकणकड्यावर अशी सुरक्षा देण्याचे काम पुण्यातील पिंपरी चिंचवड माउंटेनिअरिंग असोसिएशनने २०१७ मध्ये केलं असून त्यात माझे मित्र विकी भालेराव, अमोल जोगदंड, अमोल रणदिवे, इरफान खान यांचा खारीचा वाटा होता. तब्बल १५ दिवसांची ही मोहीम जेष्ठ गिर्यारोहक आणि पीसीएमए ( पिंपरी चिंचवड मॉंटेनिअरिंग असोसिएशन) चे संस्थपाक सुरेंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली राबवली गेली होती. कोकणकडयांवर १५ दिवस !! अचाट करणारी ऐतिहासिक घटना असच मी म्हणेल.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.