राजाने संन्यास घेतल्यानंतर त्याच्या संन्यस्थ वारशांनाही राजाचे वारस आहोत असे सांगण्याची कधी गरज पडत नाही. कारण कर्तृत्त्वाने आपोआपच त्यांना जनता तो मान देते. संन्यस्थ असले म्हणून त्यांच्यात राजेशाहीचा गुण नसतो असे होत नाही.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
सांग पा धनुर्धरा । रावो रायपणें डोंगरा ।
गेलिया अपुरा । होय काई ।। 220 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा
ओवीचा अर्थ – राजा हा राजेपणानें डोंगरावर गेला असता, त्याच्या राजेपणांत कांही कमीपणा येईल काय ? अर्जुना, सांग बरे.
राजा हा पराक्रमाने, गुणांनी, आचरणांने छत्रपती होत असतो. त्याचे प्रजेसाठीचे योगदान, प्रजेला मिळवून दिलेला न्याय यातूनच त्याला हा मान मिळत असतो. अशा राजाचाच गौरव सदैव होत राहातो. त्याची किर्ती, पराक्रम याचे वारंवार स्मरण करून त्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा दिली जाते. नावापुढे छत्रपती जोडले म्हणजे ते छत्रपती होतात असे होत नाही. छत्रपती म्हणजे प्रजेवर सतत मायेच छत्र धारण करणारा असा राजा. म्हणजेच सदैव प्रजेला मदत करणारा व दुःख वेचून घेणारा, प्रजेच्या संरक्षणाची, पालन पोषणाची जबाबदारी व काळजी घेणारा प्रजेचे रक्षण करणारा असा राजा होय. अशा राजाचा गौरव जनता उत्स्फुर्तपणे करत असते. तो राजा मग राजगादीवर असो किंवा वनात, डोंगरात राहायला गेलेला असो. तो राजाच असतो. कारण तो राजा गुणांनी, पराक्रमांनी, कर्माने राजा असतो. असा गुण असणारा राजा गरीब जरी झाला तरी तो त्याच्या गुणांच्या अनुभुतीने प्रज्येत आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करतो. त्याच्या राजेपणात कधीही कमतरता जाणवत नाही.
पराक्रमी राजाच्या वंशजांना गादीवर बसून मानपान मिळतो. पण त्यांना आम्हीच खरेखुरे वंशज आहोत असे सांगण्याची वेळ येत असेल तर ते वंशज कसले? शाहीर आणि भाटांना राज दरबारात स्थान देऊन स्वतःची स्तुती, गोडवे गाणारे वारसदार कसे असतील.? राजाचा गादीचा वारसा हा त्याच्या कार्याने सांगावा. कर्तृत्वाने सांगावा. शाहीर आणि भाटांना घेऊन स्वतःची स्तुती करून घेणे म्हणजे वारसा चालवणे नव्हे. असा वारसा चालवणाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याचे नाव देखील कोणी घेत नाही. हा आत्तापर्यंतचा भारतीय संस्कृतीतील इतिहास आहे. जनतेच्या स्मरणात राहील असे कार्य करून राजगादीचा वारसा चालवला गेला तरच त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची आठवण जनता पुढच्या पिढीला सांगत राहाते. असे कार्य कर्तृत्व राजगादीवर बसून केल्यास खरेखुरे वारस आम्हीच म्हणून सांगण्याची गरज भासत नाही. अनुभुतीतून जनताच तो मान देते.
राजाने संन्यास घेतल्यानंतर त्याच्या संन्यस्थ वारशांनाही राजाचे वारस आहोत असे सांगण्याची कधी गरज पडत नाही. कारण कर्तृत्त्वाने आपोआपच त्यांना जनता तो मान देते. संन्यस्थ असले म्हणून त्यांच्यात राजेशाहीचा गुण नसतो असे होत नाही. राजेशाही थाट म्हणजे दिखाऊपणा नव्हे. रुबाबात चालणे, बोलणे नव्हे. छाती ताठ करून चालतो म्हणजे तो राजा होतो असेही नाही. असा रुबाबदार राजा कदाचित जनतेला आवडतही असेल. पण त्याचा थाट, रुबाब हा त्याच्या मृत्यूपर्यंतच स्मरणात राहातो. दुरदृष्टी ठेऊन राज्य कारभार हा राजेशाही गुण आहे. जनतेला न्याय देण्यासाठी सदैव लढत राहाणे हा राजेशाही गुण आहे. राजांचा वारसा सांगताना त्यांचा इतिहास शोधत बसायचे नसते. इतिहास लिहिणे किंवा त्याचे पुर्नलेखन करणे हे राजाच्या वारशांचे काम नाही, तर इतिहास घडवणे हे राजाच्या वारशांचे खरे कर्म आहे. राजाच्या पराक्रमाचा इतिहास लिहिला जातो. त्याच्या रुबाबाचा, थाटमाटाचा इतिहास होत नाही.
राजाचा वारसदार हा त्याच्यातील गुणांनी ओळखला जातो. त्याच्या रुबाबाने नाही. मग तो राजा वनात, डोंगरात, जनमानसात राहायला असला तरी तो त्याच्या गुणांनी जनतेला त्याची प्रचिती देतो, अनुभुती देतो. त्याच्या विचारात, आचरणात ते गुण दिसून येतात. प्रज्येच्या हितासाठी संघर्ष करण्यास तो सदैव तत्पर असतो. यामुळे तो जनतेला त्याच्या राजेशाही गुणांची अनुभुती देऊन स्वतःला सिद्ध करतो. कार्यकर्तृत्त्वाचा वारसा जपणारेच खरे वारसदार ठरतात. लोकांना दान देऊन, भाटगिरी करणाऱ्यांना हाताशी घेऊन स्वतःच्या कर्तृत्वाचा इतिहास लिहून घेणारे कधीही राजे ठरत नाहीत. अन् झालेच तर ते फार काळ जनतेच्या स्मरणात राहातही नाहीत. जनतेच्या हृदयात स्थान मिळवणारे कर्तृत्व केल्यास त्याचे पोवाडे पुढच्या पिढीसही प्रेरणादायी ठरतात. पराक्रमाची, कार्याची अनुभुती जनतेला देऊन स्वतःला सिद्ध करणाराच खरा वारसदार होतो. मग तो डोंगरावर, वनवासात किंवा संन्यस्थ असला तरीही तो राजा असतो. त्याचे गुण त्याने कितीही लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते प्रकट होतातच. त्याच्या राजेपणाच्या गुणात कधीही कमतरता जाणवत नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.