याचाच अर्थ देह आणि आत्मा हे वेगळे आहेत. हे वेगळेपण आपण अनुभवायचे आहे. अन् आत्म्याचे अस्तित्व जाणून घ्यायचे आहे. आत्म्याला जाणायचे आहे. त्याला नित्य जाणणे हेच आत्मज्ञान आहे. ही अनुभूती सदैव राहाणे म्हणजेच ब्रह्मज्ञानी होणे असे आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तैसें पांचहेतुमिळणीं । पांचेचि इही कारणीं ।
कीजे कर्मलतांचि लावणी । आत्मा सिना ।। ३१३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – त्याप्रमाणें हें पांच हेतु एकत्र झाल्यावर यां पांचच कारणांकडून कर्मरुपी वेलींची लावणी केली जाते. आत्मा त्या कारणांहून व क्रियेहून निराळा आहे.
उपनिशदानुसार पृथ्वी, आकाश, वायू, तेज (अग्नी), जल ही पंचतत्त्वे आत्म्यापासून निर्माण झाली. पण आत्मा पंचतत्त्वांच्या कार्यापासून, कर्मापासून वेगळा आहे. त्यामुळेच त्याला ही कर्मे बादत नाहीत. हे कसे ? हे समजावून सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी काही उदाहरणे दिली आहेत. इतकेच नव्हे तर तो कर्मासाठी सहाय्यही करत नाही. हेही या उदाहरणातून समजावून सांगितले आहे. सर्वसामान्यांना समजतील अशी उदाहरणे देऊन आत्मा आणि देह कसा वेगळा आहे हे सांगितले आहे.
कर्माची पाच कारणे आहेत त्यातील पहिले कारण असे, पृथ्वीवर आपणास रात्र आणि दिवस हा अनुभव येतो. आकाशात रात्र आणि दिवस उत्पन्न होतात. पण प्रत्यक्षात आकाशात गेल्यानंतर रात्र आणि दिवस याचा अनुभव घेता येत नाही. कारण आकाशात रात्रही नाही अन् दिवसही नाही. सुर्याचा उजेड तिथे नित्य आहे. तसे आत्म्याच्या ठिकाणी शुभ आणि अशुभ कर्मेही संबंधाशिवाय उत्पन्न होतात. प्रत्यक्षात मात्र आत्म्याच्या ठिकाणी कर्मेच नाहीत त्यामुळे शुभ आणि अशुभ कर्माचा संबंधच नाही.
दुसरे कारण असे, पाण्याला उष्णता मिळाल्यावर पाण्यापासून वाफ तयार होते. ही वाफ वर आकाशात जाते. तेथे त्याला थंड हवा लागल्यानंतर त्यापासून आकाशात ढगांची निर्मिती होते. प्रत्यक्षात आकाशाला याचे काहीही घेणे देणे नसते. हे कर्म आकाशात घडत असले तरी आकाशावर याचा काही परिणाम होतो का ? जोराचा वारा सुटला म्हणून आकाश मोठे होते का ? थंड हवेमुळे ढग निर्माण होते. मग त्यामुळे आकाश लहान होते का ? आकाश उष्णतेने नष्ट होते का ? या सर्व घटना आकाशात होत आहेत. पण याचा कोणताही परिणाम आकाशावर होत नाही.
तिसरे कारण असे, लाकडी नाव पाण्यावर तरंगते. या नावेला नावाडी पाण्यात नेतो. वाऱ्याच्या मदतीने ही नाव तो नावाडी पुढे हाकतो. हे सर्व पाण्यात घडते. या कर्मात पाण्याचा काहीच संबंध नाही. पण या सर्व घटना पाण्यावर घडत आहेत. पाणी फक्त इथे आधाराला आहे. चौथे कारण असे, मातीपासून कुंभार मडके तयार करतो. चिखलाला तो आकार देतो. आकार देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या चाकावर हा सर्व व्यवहार सुरु असतो. चाकावर मातीचा गोळा ठेवला जातो. त्या चाकाला गती दिली जाते अन् त्या गतीच्या जोरावर त्या मातीच्या गोळ्याला वेगवेगळे आकार दिले जातात. या चाकाला फक्त जमिनीचा अर्थात पृथ्वीचा आधार आहे.
सूर्याच्या उदयाने कामाची लगबग सुरु होते. दिवसा उजेडी सर्व व्यवहार हे होत असतात. सूर्याच्या उपस्थितीत या सर्व घटना घडत असतात. पण यात सूर्याचा प्रत्यक्ष संबंध आहे का ? सूर्य या कामात कोठे गुंतला आहे का ? पण सूर्यामुळे या सर्व हालचाली होत आहेत. तसेच आत्मा हा देहात आहे. देहातील सर्व व्यवहार हे त्याच्यामुळे सुरु आहेत. पण त्या कर्मात तो कोठेही गुंतलेला नाही. तो त्या कर्मापासून अलिप्त आहे. याचाच अर्थ देह आणि आत्मा हे वेगळे आहेत. हे वेगळेपण आपण अनुभवायचे आहे. अन् आत्म्याचे अस्तित्व जाणून घ्यायचे आहे. आत्म्याला जाणायचे आहे. त्याला नित्य जाणणे हेच आत्मज्ञान आहे. ही अनुभूती सदैव राहाणे म्हणजेच ब्रह्मज्ञानी होणे असे आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.