September 24, 2023
Home » मांसाहारी वनस्पती असणारा `हा` तलाव आहे कोठे ?
पर्यटन

मांसाहारी वनस्पती असणारा `हा` तलाव आहे कोठे ?

मध्यप्रदेशातील भोपाळ येथे एक आगळावेगळा तलाव आहे. तसा हा तलाव एक हजार वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेला आहे. पण या महाकाय तलावाने जैवविविधता जोपासली आहे. या तलावाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणजे काही मांसाहारी वनस्पती या तलावात आढळतात. डेंगु, मलेरिया सारखे आजार पसरवणाऱ्या डासांना खाऊन या वनस्पती वाढतात. या तलावाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व विचारात घेऊन या तलावाला 2002 मध्ये पाणथळ जागांचे संवर्धनातर्गत रामसर साईटचा दर्जा देण्यात आला आहे. भोपाळमधील या पाणथळ जागेचे नाव आहे भोज तलाव.

जगातील सर्वात लहान वनस्पती

तज्ज्ञांच्या मते भोज तलावाने सुमारे ३२ स्केअर किलोमीटर परिसर व्यापलेला आहे. त्यातील २६ स्केअर किलोमीटर क्षेत्र हे पाणथळ आहे. वोल्फिया ग्लोबोसा ही सर्वात लहान वनस्पती या तलावात आढळते. सुमारे 0.1 ते 0.2 मिलीमीटर इतक्या आकाराची ही वनस्पती आहे. थंडीच्या दिवसात या तलावात हजारो पक्ष्यांचे वास्तव्य पाहायला मिळते. तज्ज्ञांच्या मते या तलावाच्या परिसरात १६४ प्रकारचे पक्षी आढळतात तर २२३ प्रकारच्या वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. त्यातील १०३ प्रजाती या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या वनस्पतींच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

भोपाळच्या भोज या तलावात वोल्फिया ग्लोबोसा ही आकाराने लहान असणारी वनस्पती आढळते. जगभरात सध्या नष्ट होऊ लागलेल्या किंवा दुर्मिळ होऊ लागलेल्या वनस्पतीमध्ये हिचा समावेश होतो. पण जैवविविधतेच्या दृष्टीने या वनस्पतीचे संवर्धन हे गरजेचे आहे. विशेष म्हणजे ही वनस्पती पाण्याचे प्रदुषण कमी करते. यामुळे पर्यावरण संवर्धनाच्यादृष्टीने याचे महत्त्व आहे. पाण्यातील विषारी घटक ही वनस्पती नष्ट करते. यामुळे पाणी शुद्ध होते.

अशोक बिसवाल, पर्यावरण तज्ज्ञ

निसर्ग मित्र- जपतेय पर्यावरण संवर्धनाचा वसा

तीन प्रकारच्या मांसाहारी वनस्पती

तज्ज्ञांच्या मते युट्रीक्यूलैरिया ऑरिया, युट्रीक्युलैरिया स्टेलैरिस आणि ड्रोसेरा इंडिका या तीन मांसाहारी वनस्पती या तलावात आढळतात. या वनस्पतीची शरीर रचना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ही वनस्पती दिसायला सुंदर असल्याने याकडे किटक आकर्षित होतात. हे किडे या वनस्पतीवर बसल्यानंतर त्याला चिकटतात. त्यानंतर वैशिष्टपूर्ण असणारी या वनस्पतीची रचना या किटकाचे शोषण करते.

१९७१ मध्ये इराणमधील रामसर या शहरात पाणथळ जागांच्या संदर्भात एक परिषद भरवली होती. या परिषदेमध्ये पाणथळ जागांच्या संवर्धनासंदर्भात संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, विज्ञानिक तसेच सांस्कृतिक संघटनेसह (युनेस्को) काही देशांनी एका करारावर सह्या केल्या होत्या. त्यानुसार संवर्धनासाठी काही ठिकाणे या परिषदेमध्ये निश्चित केली होती. यामध्ये भोपाळमधील भोज या सरोवराचा समावेश केला आहे. या करारानुसार रामसर साईटचा दर्जा असणारे हे ठिकाण आणि त्याचे पाणलोट क्षेत्र संवर्धन करण्याची जबाबदारी सरकारची आहे.

– प्रा. बिपीन व्यास,

पाणथळ जागा विज्ञान विभागप्रमुख, बरकतउल्ला विद्यापीठ

जैवविविधता जपणारा एक सुंदर प्रदेश : तिलारी (व्हिडिओ) –

Related posts

माझीच कपाशी, मीच उपाशी…

बीदरचा किल्ला…

अक्कल काढा (ओळख औषधी वनस्पतीची)

Leave a Comment