पूर्वेला तांबडं फुटू लागलं होतं. मास्टर दीनानाथांपासून तेज ग्रहण केलेल्या लता नावाच्या सूर्याचा क्षितिजावर उदय होणार होता. ‘ हृदया’ पासून तर हृदयनाथपर्यंत हा प्रकाश फाकणार होता. ( लता मंगेशकरांचं नाव ‘ हृदया ‘ होतं ) आणि आपल्या सुरांनी अवघ्या सृष्टीला प्रकाशमान करणार होता.
विश्वास देशपांडे
चाळीसगाव.
९४०३७४९९३२
दीनानाथ नावाचा गानसूर्य अस्ताला गेला होता. दशदिशा अंधारल्या होत्या. हा गानसूर्य मावळल्यानंतर ऐश्वर्य, प्रतिष्ठा, मानसन्मान याही गोष्टी लोप पावल्या होत्या. ज्यांनी एकेकाळी प्रतिष्ठा, ऐश्वर्य उपभोगले होते अशा मंगेशकर कुटुंबियांवर आता गरिबी, पोटासाठी वणवण या संकटांना तोंड देण्याची वेळ आली होती. पण कोणत्याही संकटांनी कधीच खचून जायचं नसतं. रात्र झाली असली तरी पहाट होणारच असते.
कशास आई भिजविसी डोळे, उजळ तुझे भाळ
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
पूर्वेला तांबडं फुटू लागलं होतं. मास्टर दीनानाथांपासून तेज ग्रहण केलेल्या लता नावाच्या सूर्याचा क्षितिजावर उदय होणार होता. ‘ हृदया’ पासून तर हृदयनाथपर्यंत हा प्रकाश फाकणार होता. ( लता मंगेशकरांचं नाव ‘ हृदया ‘ होतं ) आणि आपल्या सुरांनी अवघ्या सृष्टीला प्रकाशमान करणार होता. पण सध्या तरी संकटाचा काळ होता. अशा या संकटाच्या वेळी मंगेशकर कुटुंबातील दोन व्यक्ती खंबीरपणे उभ्या राहिल्या. एक म्हणजे माई आणि दुसरी म्हणजे भावंडांमध्ये ज्येष्ठ असलेली लता. दीनानाथ बाबा म्हणून जो कल्पवृक्ष लावून गेले होते, त्या कल्पवृक्षाचं बी तर रुजलं होतं, पण ते बीज करपू नये म्हणून त्याला प्रकाश, सावली, पाणी देऊन सिंचन करावं लागणार होतं. तेच काम करण्यासाठी माई पदर खोचून उभ्या राहिल्या. परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवते. याच परिस्थितीने लताला तिच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. ‘ बाबा गेले म्हणून काय झालं ? मी आहे ना …’ अशा निर्धारानं ती उभी राहिली. वास्तविक तिचं वय ते किती ! बारा तेरा वर्षांची अल्लड पोर !
पहिली मंगळागौर चित्रपटात भूमिका
संकटाच्या प्रसंगी देव कोणत्या ना कोणत्या रूपाने धावून येतो. तो यावेळी मास्टर विनायकराव यांच्या रूपाने धावून आला. मास्टर विनायकराव हे त्याकाळचे अभिनेते आणि दिग्दर्शक. त्यांनी पित्याच्या मायेने मंगेशकर कुटुंबियांना आधार दिला. मास्टर विनायकराव हे अभिनेत्री नंदाचे वडील. त्यांची ‘ नवयुग ‘ नावाची एक कंपनी होती. त्या कंपनीमार्फत त्यांनी चित्रपटनिर्मितीला सुरुवात केली होती. त्या कंपनीत त्यांनी लहानग्या लताला काम करण्यासाठी बोलावून घेतलं. ‘ पहिली मंगळागौर ‘ या त्यांच्या चित्रपटात लताने भूमिका केली होती. ‘ नटली चैत्राची नवलाई ‘ हे गाणंही गायलं होतं.
मालक असे गात नव्हते….असे गायचे
आता दीनानाथांच्या गैरहजेरीत त्यांची भूमिका माईला पार पाडायची होती. आपली मुलं संगीतक्षेत्रात पुढे येऊन त्यांनी नाव कमवावं हे दीनानाथांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न तिला पूर्ण करायचं होतं. माई दीनानाथांसारखी संगीतातली तज्ज्ञ नव्हती. पण दीनानाथांच्या सहवासात राहिल्याने आपल्या मुलांना पुढे आणण्यासाठी काय करायचं हे तिला नेमकं ठाऊक होतं. नियमित रियाजचं महत्व तिला माहिती होतं. आपल्या मुलांना ती दररोज सकाळी उठवून त्यांच्या हातात तानपुरा देई आणि रियाज करायला बसवी. कधी धाक दाखवून तर कधी प्रेमाने समजावून सांगत असे. माईला दीनानाथांसारख्या महान गायकाच्या सहवासात राहिल्यामुळे काही राग, चिजा अवगत होत्या. मुख्य म्हणजे तिचा कान तयार होता. माई दीनानाथांना ‘ मालक ‘ असे संबोधत असे. मुले जेव्हा रियाज करत तेव्हा त्यांचे काही चुकले तर ते तिला लगेच लक्षात यायचे. त्यावेळी मुलांना ‘ मालक असे गात नव्हते किंवा मालक असे गायचे ‘ अशा शब्दात सांगून ती त्यांना दुरुस्त करायची.
‘भुकेनं शरीर मरतं पण भिकेनं आत्मा मरतो ‘
दीनानाथांनी लावलेल्या या कल्पवृक्षाला माई संस्कारांचं पाणी देखील नियमानं घालत होती. दीनानाथ लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते तर स्वातंत्र्यवीर सावरकरांसोबत त्यांनी काम केलं होतं या गोष्टी त्यांनी माई सांगे. दीनानाथांसाठी त्या काळातील मोठमोठ्या लेखकांनी नाटके कशी लिहिली हे ती सांगे. ती नाटके, त्यातील संवाद वाचून दाखवणे हे ती तिच्या परीने करत होती. या अनौपचारिक शाळेत अशा रीतीने या भावंडांचे शिक्षण होत होते. परिस्थिती गरिबीची असली तरी मंगेशकर कुटुंबीयांनी स्वाभिमानाशी कधीच तडजोड केली नाही. कधी कधी त्यांची कामवाली बाई मुलांसाठी पदरात लपवून खायला घेऊन येई. पण माईला ते आवडत नसे. ‘ भुकेनं शरीर मरतं पण भिकेनं आत्मा मरतो ‘ असं ती म्हणायची.
चांदीची भांडी विकून पुण्यतिथी
दीनानाथांसारख्या महान व्यक्तीची स्मृती , त्यांचा आदर्श कायम डोळ्यांसमोर राहावा म्हणून माईने त्यांची पुण्यतिथी दरवर्षी एखादा संगीताचा कार्यक्रम करून साजरी करायची ठरवले. परिस्थिती जरी नव्हती तरी प्रसंगी घरातील चांदीची भांडी गहाण ठेवून किंवा विकून त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केलं. या पहिल्या पुण्यतिथीचा कार्यक्रम कोल्हापूरच्या पॅलेस थिएटरमध्ये झाला. या वेळी नामवंत गायक उपस्थित होते. लतानेही या कार्यक्रमात गीते सादर केली. कुंदनलाल सैगल यांचं ‘ मै क्या जानू क्या जादू हैं …’ हे गीत तिने या कार्यक्रमात म्हटलं. सर्व उपस्थितांनी तिचं कौतुक केलं. पण कार्यक्रमाहून घरी परतताना माई लताला म्हणाल्या, ‘ कार्यक्रमात गाताना चेहरा फारच वेडावाकडा करीत होतीस. मालक असे करत नव्हते. त्यांना असं आवडलं नसतं. ‘ माईने एखाद्या कसलेल्या गुरुचं काम क्षणार्धात पार पाडलं होतं. त्याच क्षणी लताला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तिनं ठरवून टाकलं की यापुढे गाताना चेहऱ्यावर संयत भाव हवेत. मुद्रा अनावश्यक वेडीवाकडी करता कामा नये.
सुखदुःखाचे अनेक कडूगोड क्षण
मास्टर विनायकरावानी मंगेशकर कुटुंबियांना कोल्हापूरला बोलावून घेतलं होतं. ‘ नवयुग ‘ संस्थेतून बाहेर पडून त्यांनी कोल्हापूरला प्रफुल्ल पिक्चर्स या नावाची संस्था स्थापन केली होती. कोल्हापूर हे कलेचं माहेरघर होतं. कोल्हापूरला चित्रपट स्टुडिओ, चित्रपट क्षेत्रात काम करणारे कलाकार, संगीतकार, गायक, लेखक आदी मंडळी राहत होती. मंगेशकर कुटुंब कोल्हापूरला आल्यानंतर एका जुन्या दुमजली घरात राहत होतं. या घरातील वरच्या मजल्यावरच्या दोन खोल्या त्यांनी भाड्याने घेतल्या होत्या. वरती पत्र्याचं छप्पर होतं. या घरात ते बरेच दिवस राहिले. या घरात राहताना उपभोगलेले सुखदुःखाचे अनेक कडूगोड क्षण मंगेशकर भावंडांना आजही आठवतात.
अनाथ मुलीची भूमिका
मास्टर विनायकरावांनी त्यावेळी वि. स. खांडेकर यांच्या कादंबरीवर आधारित ‘ माझं बाळ ‘ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात अनाथ मुलीची भूमिका लताने केली होती. या चित्रपटात अनाथालयातील मुलं आश्रमासाठी वर्गणी गोळा करायला जातात असे एक दृश्य होते. या दृश्यात लता सोबतच मीना आणि आशा यांनीही भाग घेतला होता. पण परिस्थितीमुळे आपल्या भावंडांना असे काम करावे लागते या गोष्टीचे लताला वाईट वाटले होते. मात्र विनायकरावांचा उदार आश्रय नसता तर चित्रपटातील ही भूमिका प्रत्यक्ष जीवनात जगण्याची वेळ आली असती हेही तिला जाणवले.
सायकल चालविण्याची आवड
त्या काळातील प्रख्यात गायिका आणि नायिका सुद्धा असलेली नूरजहाँ ही त्या काळात कोल्हापूरलाच होती. विनायकरावांच्या ‘ बडी बहन ‘ या चित्रपटात ती भूमिका करत होती. लता दररोज कामासाठी म्हणून स्टुडिओत जाई. आपले काम आटोपले की स्टुडिओत इतरत्र ती भटकत असे. कलाकारांची ओळख करून घेत असे. तिला सायकल चालवणे खूप आवडायचे. एक दिवस अशीच सायकल चालवत ती नूरजहाँ राहत असलेल्या खोलीजवळ आली. तोंडाने गाणे म्हणणे सुरूच होते. तिच्या गाण्याची लकेर नूरजहाँच्या कानावर पडली. एवढं सुस्वर कोण गातंय हे पाहण्यासाठी ती बाहेर आली. छोट्या लताला पाहून तिला आश्चर्य वाटले. तिने तिला आपल्या रूममध्ये बोलावून घेतले आणि गायला लावले. लताला तर काय कोणी गाणं म्हण म्हटलं की ती आनंदाने तयारच असायची. अशा रीतीने त्या काळातील ‘ मलिका-ए-तरन्नुम ‘ असलेल्या नूरजहाँ आणि भविष्यात स्वरसम्राज्ञी झालेल्या लताचा स्नेह जुळला तो कायमचाच. नूरजहाँ मग कधी कधी लताला चित्रपटाच्या सेटवरही बोलावून घ्यायची. तिथे वेळ असला की दोघी गाणं म्हणायच्या. त्या दोघींच्या गाण्याची जुगलबंदी उपस्थितांचं मन मोहून टाकत असे. एकदा बोलता बोलता नूरजहाँ मास्टर विनायकरावांना म्हणाली, ‘ देखिये विनायकराव, मै अभीसे आपको बता देती हूँ की ये छोटी लता एक दिन बहुत बडी गायिका बनेगी. ‘ नूरजहाँचे उद्गार अक्षरशः खरे ठरले. लता मंगेशकर या नावाने पुढे संगीतक्षेत्रात, चित्रपटाच्या गायन क्षेत्रात अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून राज्य केले.