कशामुळे आलं असेल हे सामर्थ्य या सुरांमध्ये ? सगळ्यांना आपल्या स्वरांनी आनंदाने न्हाऊ घालणारा हा अमृताचा घनु म्हणजेच लतादीदी . या आनंदघनाची इथवरची वाटचाल सोपी नाही. या वाटा उजळताना या मार्गावरून वाटचाल करण्याऱ्या दीदींना सुरुवातीच्या अंधाराला, खाचखळग्यांना तोंड देत वाटचाल करावी लागली.
विश्वास देशपांडे
चाळीसगाव
९४०३७४९९३२
तुम्हाला आवडणारा स्वर किंवा गाणी यांच्यात तुम्हाला प्रेरणा देण्याचे सामर्थ्य असते. एखादं गीत तुमचा उदास मूड घालवून तुम्हाला आनंदी बनवू शकतं. काही गाणी तर जीवन जगण्याचं सामर्थ्य देतात. महान गायकांच्या सुरांमध्ये हे सामर्थ्य भरलेलं असतं म्हणून तर स्वराला, आवाजाला किंवा संगीताला नादब्रह्म म्हणत असावेत. हे असे सामर्थ्य असलेला सूर लतादीदींचा आहे. या स्वरात अशी जादू आहे की ती तुमचं कंटाळवाणं काम आनंदी बनवून टाकते. मी शिक्षक म्हणून काम करीत असताना माझ्या वर्गात कधी कधी सत्तर ऐंशी ते शंभरपर्यंत विद्यार्थिसंख्या असायची. परीक्षा झाली की या विद्यार्थ्यांच्या पेपरचे गठ्ठे माझ्याकडे तपासणीसाठी यायचे. एकाहून एक सगळे हुशार विद्यार्थी. सुरुवातीचे पाच दहा पेपर्स तपासून झाले की कंटाळा यायचा. मग अशा वेळी मी माझी आवडती गाणी ऐकत असे. त्यात जास्तीत जास्त गाणी दीदींचीच असायची. दीदींची गाणी ऐकता ऐकता माझे काम सहज होऊन जात असे. माझ्यासारखे असे हजारो लाखो लोक असतील की जे आपली कामे करताना दीदींची गाणी ऐकत असतील. कोणाला आनंद देण्याचे, कोणाच्या जखमेवर हळुवार फुंकर घालण्याचे सामर्थ्य या स्वरांमध्ये आहे.
चांदणं होऊन बरसलं दीदींचं गाणं…
बांगला देश युद्धाच्या वेळी शेकडो भारतीय सैनिक जखमी झाले होते. अशाच सैनिकांना भेटण्यासाठी दीदी एकदा एका हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. हातपाय तुटलेले, गंभीर जखमा झालेले शेकडो जवान पडलेले होते. पण आपण आपल्या देशासाठी लढलो याचा अभिमान त्यांना होता. या सैनिकांमध्ये एक मराठी सैनिक होता. त्याला युद्धात झालेल्या स्फोटात खूपच भाजले होते. त्याचा देह कपड्यात गुंडाळून ठेवला होता. पण पाहू, बोलू शकत होता. दीदींना पाहताच त्याला कोण आनंद झाला. तो त्यांना म्हणाला, ‘ दीदी, माझ्यासाठी एक गाणं म्हणाल का ? ‘ त्या भयानक, उदास वातावरणातही दीदींनी त्याची मागणी पूर्ण केली. काही क्षणांचा सोबती असलेल्या त्या जवानाचे डोळे आनंदाने चमकले. दीदींचं गाणं त्याच्यासाठी जणू चांदणं होऊन बरसलं. आता त्याचा चेहरा तृप्त, शांत होता.
हा माझा मार्ग एकला…
कशामुळे आलं असेल हे सामर्थ्य या सुरांमध्ये ? सगळ्यांना आपल्या स्वरांनी आनंदाने न्हाऊ घालणारा हा अमृताचा घनु म्हणजेच लतादीदी . या आनंदघनाची इथवरची वाटचाल सोपी नाही. या वाटा उजळताना या मार्गावरून वाटचाल करण्याऱ्या दीदींना सुरुवातीच्या अंधाराला, खाचखळग्यांना तोंड देत वाटचाल करावी लागली. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही या म्हणीप्रमाणे दीदींना असंख्य संकटांचा, अडचणींचा सामना करावा लागला आहे. पण त्यांच्या स्वभावातील शांती, संयम कधी ढळला नाही. दुसऱ्याला दोष देणे, नावे ठेवणे त्यांच्या स्वभावातच नाही. ‘ हा माझा मार्ग एकला ‘ याप्रमाणे त्या काम करीत राहिल्या. नवनवीन गोष्टी शिकत राहिल्या. जे जे चांगले आहे ते आत्मसात करत गेल्या. त्यातूनच त्यांच्यातील कलाकार घडत गेला. हिऱ्यालाही पैलू पडावे लागतात तसेच त्यांच्या गायकीला पडत गेले आणि दिवसेंदिवस हा हिरा अधिकच तेजाने झळाळू लागला.
असा प्रेमळ गुरु विरळाच !
मास्टर दीनानाथ गेल्यानंतर मंगेशकर भावंडांचे संगीत शिक्षण जणू थांबलेच होते. पण मास्टर विनायकरावांसोबत मुंबईला आल्यानंतर त्यांनी दीदींना शिकवण्यासाठी एका ज्येष्ठ मास्तरजींची नेमणूक केली. ते १९४५ साल होते. दीदींना संगीत शिक्षण देणारे हे महान गुरु होते भेंडीबाजार घराण्याचे महान गायक उस्ताद अमान अली खाँ. उस्ताद अमान अली खाँ हे उत्तर प्रदेशातून आलेले आणि मुंबईत भेंडीबाजार या ठिकाणी स्थायिक झाले होते. त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात अनेक कर्नाटकी राग आणले. त्यांचे काळेभोर मोठे डोळे, त्या डोळ्यांमध्ये काजळ आणि भरदार झुपकेबाज मिशा असलेले व्यक्तिमत्व होते. पण दीदींसाठी त्यांच्या काळजात पित्याची माया होती. त्या वेळी दीदींची असलेली लहान चण, सडपातळ अंगकाठी पाहून त्यांना तिची काळजी वाटायची. शिकवणीसाठी येताना दीदींसाठी ते काहीतरी खायला घेऊन यायचे. शिकवणी सुरु होण्याआधी त्यांना ते आग्रहाने खायला लावायचे. असा प्रेमळ गुरु विरळाच ! गंडा बांधण्याच्या दिवशी त्यांनी दीदींना राग हंसध्वनी शिकवला. आजही हा राग दीदींच्या आवडत्या रागांपैकी एक आहे. अमान अली दीदींना खूप प्रेमाने शिकवत. त्यांनी एकदाच शिकवलेले कोणतेही राग, चिजा ग्रहण करायला ही त्यांची शिष्या आनंदाने तयार असायची. पण दुर्दैवाने दीदींची ही संगीत शिकवणी जास्त काळ सुरु राहू शकली नाही. ते काही काळासाठी आपल्या गावी जायचे म्हणून गेले पण आठ दहा महिने झाले तरी परत येऊ शकले नाहीत.
देवासवाले अमानत खान
यानंतर दीदींना शिकवण्यासाठी आले ते अमानत खान देवासवाले. ते तरुण आणि उत्साही होते. ते स्वतः गात आणि शिकवतही. लयीवर कसं गावं हे दीदी अमान अली खान आणि अमानत खान देवासवाले या दोघांकडून शिकल्या. दीनानाथांमुळे सुरांचं ज्ञान झालेलं होतं पण पुढे दीदींचं गाणं आणखी प्रगल्भ होण्यासाठी या दोघांच्या शिकवणीचा खूप उपयोग झाला. अमानत खान तर आपल्या या शिष्येवर बेहद खुश होते. त्यांनी दीदींची तारीफ करताना आपल्या एका संगीतकार मित्राजवळ असे उद्गार काढले की या मुलीला जितकं शिकवावं त्याच्यापेक्षा ती अधिकच आत्मसात करते. तिला एकदाच सांगावं लागतं. कठीण संगीताचे तुकडे देखील ती सहज गाऊ शकते. संगीतातली अशी कोणतीही गोष्ट नाही की जी ती आत्मसात करू शकत नाही. पण दुर्दैवाने अमानत खान यांचाही सहवास गुरु म्हणून जास्त काळ दीदींना लाभला नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाले होते आणि त्याबरोबरच देशाची फाळणी झाली होती. त्या फाळणीचा परिणाम कलाकारांवरही झाला होता. काही कलाकारांना आपला देश, काहींना आपले गाव सोडावं लागलं होतं . याच गडबडीत अमानत खान आपल्या मूळ गावी देवासला गेले. पण एवढ्या महान कलाकाराच्या नशिबी तेथे जाऊनही आनंद, सुरक्षितता नव्हती. काही दिवसांनी अमानत अलींचा मृतदेह राहत्या घरात लोकांना सापडला. कोणी म्हणाले की ते फाळणीचा बळी ठरले तर कोणाच्या मते त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला. त्यांनी मुंबई सोडली नसती तर… ? पण नियतीच्या कार्यात जरतर ला काही अर्थ नसतो.
आप की सेवा में…
या सगळ्या कालावधीत दीदींचं चित्रपटासाठी निरनिराळ्या संगीतकारांकडे जाणं, काम मिळवणं आणि पार्श्वगायन करणं हे प्रयत्न सुरूच होते. बऱ्याचदा दिवसभर स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंगसाठी किंवा संगीतकारांच्या भेटीसाठी उपाशी बसून राहावं लागे. कधी कधी ट्रायलच्या नावाखाली त्यांच्याकडून गाणी गाऊन घेतली जात पण काम मिळेलच याची शाश्वती नसायची. आप की सेवा में हा दीदींचं गाणं असलेला पहिला हिंदी चित्रपट. या चित्रपटाचे संगीतकार होते दत्ता डावजेकर. त्यांच्याजवळूनही दीदी खूप गोष्टी शिकल्या. खरं तर त्यांना भेटलेल्या प्रत्येक संगीतकारांकडून त्यांनी काही ना काही आत्मसात केले आहे. नवनवीन शिकण्याची उर्मी त्यांना कधीही स्वस्थ बसू देत नाही. दत्ता डावजेकर दीदींबद्दल बोलताना म्हणतात, ‘ मी जेव्हा लताचं गाणं प्रथम ऐकलं तेव्हा तिची प्रतिभा पाहून चकितच झालो. मी जे गायचो ते ती तसंच अगदी हुबेहूब गाऊन दाखवायची. त्यामुळे तिला जास्त शिकवायची गरजच पडली नाही. ‘
धाव सख्या गिरिधारी
पण एकदा मात्र एक प्रसंग घडला. ‘ गजाभाऊ ‘ या चित्रपटातील ‘ धाव सख्या गिरिधारी ‘ या गीताचं रेकॉर्डिंग सुरु होतं . हे गीत एक छोटी मुलगी म्हणते. तिची सावत्र आई तिचा छळ करते. तेव्हा ती मुलगी परमेश्वराचा धावा करताना हे गीत म्हणते असा सीन होता. पण त्या दिवशी गीत रेकॉर्डिंग करताना त्या गीतात दिग्दर्शक आणि संगीतकार यांना हवे तसे कारुण्य उमटत नव्हते. शेवटी विनायकरावांनी एक युक्ती केली. त्यांनी पाण्याने भरलेली एक जड घागर दीदींना कमरेवर घ्यायला लावली. त्या अत्यंत कष्टदायी प्रसंगी दीदींना ते गीत गावं लागलं आणि सगळ्यांनाच ते आवडलं. त्यामध्ये अपेक्षित तो भाव प्रकट झाला होता. पण आश्चर्याची गोष्ट अशी की त्या घागरीचे एवढे वजन पेलून गाणं म्हणताना दीदींचा एकही सूर किंवा एखादीही तान इकडची तिकडे झाली नाही.
अभिनेत्रीला डोळ्यासमोर ठेऊन गाणं
चित्रपट संगीतात दीदींना सर्वात उत्तम संधी मिळवून देण्याचं आणि गायनातले बारकावे शिकवण्याचं श्रेय जातं ते गुलाम हैदर साहेब. त्यांनी दीदींना एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली. ती म्हणजे, ‘ गायकीच्या कारागिरीकडे लक्ष न देता गाण्याच्या बोलांवर लक्ष केंद्रित कर. तसेच ते गीत पडद्यावर कोण सादर करणार आहे ते पण लक्षात घे. ‘ या त्यांच्या उपदेशाचा दीदींना खूपच फायदा झाला. पडद्यावर अभिनय करणाऱ्या अभिनेत्रीला डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी गाणं सुरु केलं. त्यामुळे अगदी मीनाकुमारीपासून ते माधुरी दीक्षितपर्यंतच्या अभिनेत्रींच्या अभिनयाला साजेशी गीतं त्यांच्याकडून साकार झाली आणि ती प्रचंड लोकप्रियही झाली.
गायनातील काही खुब्या…
संगीतकार अनिल विश्वास यांनी दीदींना गायनातील काही खुब्या सांगितल्या. दोन शब्दांच्यामध्ये श्वास घेताना हळूच माइकपासून दूर होऊन श्वास घ्यावा आणि परत गाणं सुरु करावं. माइकपासून दूर होताना जो शेवटचा शब्द असेल त्याच्या अंताला जरा जोर द्यावा आणि नवीन शब्दाची सुरुवात पण जरा जोरातच करावी. असं केल्यानं श्वासोश्वासाचा आवाज ऐकू येत नाही. दीदींचा श्वास तर मुळातच दीर्घ आहे. आणि अनिलदांनी सांगितलेल्या पद्धतीने गाणं हे दीदींचं आजही वैशिष्ट्य मानलं जातं . गाण्याची सुरुवात हलकेच करावी आणि ओळीचा अखेरचा सूर म्हणतानाही त्या सुरांची कोमलता कशी टिकवून ठेवावी हेही अनिलदांनी दीदींना शिकवले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.