नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रांगोळी कलाकार प्रमोद माळी (आर्वी) यांनी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भव्य आणि सुंदर रांगोळी साकारली आहे. यापुर्वी अनेक रांगोळीच्या माध्यमातून त्यांनी आपल्या या अनोख्या कलेने सर्वांना आपलेसे केले आहे.
निकेत पावसकर
मालेगाव नाशिक येथील प्रमोद आर्वी गेल्या नऊ वर्षापासून रांगोळी कलेचे मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी चित्रकलेमध्ये, पेन्सिल स्केच, ऑइल कलर, रांगोळी, लहान मोठ्या मुलांना ह्या चित्रकलेचे प्रशिक्षण दिले आहे. परंतु त्यांना रांगोळीमध्ये त्यांना खूप आवड आहे. रांगोळी कलाकार म्हणूनच नावलौकीक मिळावा असे त्यांना नेहमी वाटते.
रांगोळीमध्ये त्यांनी शून्यातून सुरुवात केली. त्यांना रांगोळीचे मार्गदर्शन करणारे कुणीही नव्हते, तरी देखील हताश न होता प्रमोद यांनी सुप्रसिद्ध रांगोळीकार असा नावलौकिक मिळविला आहे. प्रमोद यांनी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर देखील रांगोळी कलेने रसिकांची मने जिंकली आहेत.
रांगोळी कला ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. रांगोळीमध्ये अनेक सामाजिक, राजकीय व समाज प्रबोधन विषय मांडता येतात.आज रांगोळी कलेने मोठे शिखर गाठले आहे.या रांगोळी कलेला साकारण्यासाठी आपल्या सर्वांचे शुभ आशीर्वाद आणि हार्दिक शुभेच्छा पाठीशी आहेत, म्हणूनच आजपर्यंत रांगोळी कला क्षेत्रात कार्य करू शकलो.
प्रमोद माळी (आर्वी)
आत्तापर्यंत प्रमोद आर्वी यांनी अनेक देव देवतांच्या , नावाजलेल्या थोर कलावंतांच्या भव्य दिव्य रांगोळी कलाकृती साकारलेल्या आहेत. आता तर त्यांनी सुप्रसिद्ध गायिका, भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भव्य रांगोळी साकारली आहे. त्यांनी या भव्य रांगोळीचे शीर्षक “श्यामालहरी” असे ठेवले आहे. ही रांगोळी साकार करण्यासाठी त्यांना 48 तास लागले.