आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
‘ दिवाळीत पाऊस, पण किरकोळच ‘
ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या व शेवटच्या पावसाच्या आवर्तनातून, मंगळवार दि.२९ ऑक्टोबर (धनत्रयोदशी) ते सोमवार दि. ४ नोव्हेंबर पर्यन्तच्या दिवाळीच्या सप्ताहात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात ढगाळ वातावरणसहित वीजा, गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.
मंगळवार दि.२९ (धनत्रयोदशी) ला ढगाळ वातावरण-
मुंबई, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील ४ जिल्ह्यात फक्त ढगाळ तर उर्वरित जिल्ह्यात केवळ स्वच्छ वातावरण जाणवेल.
बुधवार दि.३० ऑक्टोबरला फक्त विदर्भातच पाऊस-
रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर अश्या तीन जिल्ह्यात फक्त ढगाळ वातावरण तर अकोला वर्धा नागपूर येथील तीन जिल्ह्यात ढगाळ वातावरणसहित किरकोळ पाऊस तर तीस उर्वरित जिल्ह्यात केवळ स्वच्छ वातावरण जाणवेल.
गुरुवार दि.३१ ऑक्टोबर( नरक चतुर्दशी)ला कोकण, विदर्भात पाऊस-
रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सम्पूर्ण विदर्भ (नागपूर अमरावती वगळता), उत्तर नगर व उत्तर सं.नगर, आणि पुणे व सातारा (घाटमाथा) येथील १५ जिल्ह्यात ढगाळ वातावरणसहित किरकोळ पाऊस तर उर्वरित २१ जिल्ह्यात केवळ स्वच्छ वातावरण जाणवेल.
शुक्रवार दि.१ नोव्हेंबर(लक्ष्मीपूजन)ला महाराष्ट्राच्या निम्म्यापेक्षा कमी जिल्ह्यातच पाऊस –
रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग, नगर व उत्तर सं.नगर, लातूर, नांदेड, परभणी, आणि नाशिक पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथा अश्या १२ जिल्ह्यात ढगाळ वातावरणसहित किरकोळ पाऊस तर उर्वरित २४ जिल्ह्यात केवळ स्वच्छ वातावरण जाणवेल.
शनिवार दि.२ नोव्हेंबर(दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा)ला निम्म्या महाराष्ट्रात उघडीपच-
मुंबई, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग, नाशिक पुणे, कोल्हापूर घाटमाथा, सातारा बीड धाराशिव नांदेड लातूर परभणी अश्या १३ जिल्ह्यात ढगाळ वातावरणासहित किरकोळ पाऊस तर उर्वरित २३ जिल्ह्यात केवळ स्वच्छ वातावरण जाणवेल.
रविवार दि. ३ नोव्हेंबर(भाऊबीजे)ला मिश्र वातावरण-
रत्नागिरी सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड येथील १२ जिल्ह्यात ढगाळ वातावरणासहित किरकोळ पाऊस तर उर्वरित २४ जिल्ह्यात केवळ स्वच्छ वातावरण जाणवेल.
सोमवार दि. ४ नोव्हेंबरला बऱ्याच भागात स्वच्छ वातावरण-
पुणे, सातारा, नगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड येथील ७ जिल्ह्यात फक्त ढगाळ वातावरण तर उर्वरित २९ जिल्ह्यात केवळ स्वच्छ वातावरण जाणवेल.
उत्तर महाराष्ट्रात पाऊस नाही.
दरम्यानच्या सप्ताहातील(मंगळवार दि.२९ ऑक्टोबर (धनत्रयोदशी) ते सोमवार दि. ४ नोव्हेंबर पर्यन्तच्या) काळात ठाणे पालघर नाशिक व खान्देशातील अश्या ६ जिल्ह्यात तसेच संपूर्ण विदर्भात शुक्रवार दि. १ नोव्हेंबरनंतर वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता असल्यामुळे येथे थंडीची चाहूल लागू शकते.
सध्या ऑक्टोबर हिट जाणवते पण लवकरच थंडीची चाहूल –
सध्या महाराष्ट्रात दुपारचे कमाल तापमान सरासरी इतके म्हणजे ३३ डिग्री से. ग्रेड च्या आसपास आहे तर पहाटेचे किमान तापमान मात्र भाग बदलत सरासरीपेक्षा २ ते ४ डिग्री से. ग्रेड ने अधिक म्हणजे २२ डिग्री से. ग्रेड च्या आसपास आहे. त्यामुळे अजुन ऑक्टोबर हिट चा परिणाम टिकून आहे. परंतु मंगळवार दि. ५ नोव्हेंबर पासून निरभ्र आकाशासहित संपूर्ण महाराष्ट्रात हळूहळू थंडीला सुरवात होवु शकते, असे वाटते.
रब्बीसाठी उपयुक्त पाऊस
पडणारा पाऊस किरकोळ व हलकासा पाऊस असुन नुकसान देणारा नाही. उलट रब्बी हंगामास उपकारक ठरु शकतो, असे वाटते.
महाराष्ट्रात कशामुळे पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे?
समुद्र सपाटीपासून दिड किमी. उंचीवर उत्तर भारतातून येणारे उत्तरी व पूर्व भारतातून येणारे ईशान्यई असे कोरडे वारे तर बं. उपसागरातून येणारे आर्द्रतायुक्त पूर्वीय वारे ह्यांचा दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यात होणाऱ्या मिलाफातून सध्या महाराष्ट्रात आठवडाभरासाठी पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.